Wednesday, November 13, 2013

कलिंगड उत्पादनात पापरीच्या भोसले यांचा हातखंडा

पापरी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील बाबूराव भोसले हे परिसरात प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. गेल्या सहा वर्षांपासून भोसले कलिंगडाची लागवड करीत आहेत. बाजारपेठेनुसार लागवडीचे नियोजन, सुधारित तंत्राने लागवड, एकात्मिक पीक व्यवस्थापन आणि गटशेतीतून कलिंगडाचे किफायतशीर उत्पादन मिळते असा त्यांचा अनुभव आहे. किरण जाधव 
इतरांपेक्षा काही तरी नवीन करून दाखविण्याचे, त्या विषयाबाबत आपली स्वतः ओळख निर्माण करायची, अशी जिद्द बाळगणारे अनेक शेतकरी राज्यात आहेत. या शेतकऱ्यांपैकीच एक आहेत कलिंगड लागवडीतून स्वतःची ओळख निर्माण करणारे पापरी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील बाबूराव राऊ भोसले. दहावीपर्यंत शिक्षण झाल्यावर त्यांनी घरच्या शेतीकडे लक्ष देण्यास सुरवात केली. कायम पाण्याची टंचाई असलेल्या भागात शेती असल्याने कमी कालावधीत, कमी खर्चात उत्पादन देणाऱ्या पिकांच्या शोधात ते असतात. त्यांच्या प्रयत्नांना घरच्यांचीही तेवढीच मोलाची साथ असल्याने टोमॅटो, काकडी, ढोबळी मिरची, खरबूज आणि कलिंगडाचे चांगले उत्पादन त्यांनी घेतले आहे. शेतीमधील नवीन प्रयोग पाहण्यासाठी त्यांच्या शेतावर परिसरातील शेतकऱ्यांचा कायम राबता असतो. 

अभ्यासातून साधले कलिंगडाचे पीक कलिंगड लागवडीबाबत अनुभव सांगताना भोसले म्हणाले, की माझी अठरा एकर शेती आहे. संपूर्ण क्षेत्र मी ठिबकखाली आणले आहे. सध्या माझ्याकडे दोन एकर टोमॅटो, एक एकर ढोबळी, दोन एकर कलिंगड, डाळिंब अडीच एकरावर आहे. मी पहिल्यापासून परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर भेटी देऊन पीक लागवड, व्यवस्थापन आणि बाजारपेठांचा अभ्यास करायचो. आमच्याकडे लिंबाची बाग होती, त्यामुळे विविध बाजारपेठांत लिंबू विक्रीसाठी मी जात असे. त्या वेळी मला कलिंगड, टरबूज फळांच्या मागणीचा आणि दराचा अंदाज आला. सन 2007 मध्ये पहिल्यांदा एक एकरावर जानेवारी महिन्यात कलिंगड लागवडीला सुरवात केली. चांगल्या उत्पादनाच्यादृष्टीने पहिल्यापासून गादीवाफा पद्धतीने लागवड, मल्चिंग पेपरचा वापर आणि ठिबक सिंचनावर भर दिला. त्यातून मग टप्प्याटप्प्याने लागवड क्षेत्र वाढवीत गेलो. मी जूनमध्ये दोन एकर कलिंगड लागवड करतो. त्याची फळे रमझान सणाच्यावेळी मिळतात. परंतु हे उत्पादन पावसाच्या भरवशावर असते. पण दर चांगला मिळतो. त्यानंतर दुसऱ्या क्षेत्रात डिसेंबरमध्ये दीड एकराचे टप्पे करून दर 15 ते 20 दिवसांच्या अंतराने सरासरी दहा एकरावर कलिंगड लागवड करतो. ही लागवड मार्चपर्यंत चालू असते. गेल्या वर्षी मी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात एक एकरावर सुधारित पद्धतीने कलिंगडाची लागवड केली होती. या लागवडीसाठी डिसेंबरमध्ये शेताची चांगली नांगरट करून एकरी 20 गाड्या शेणखत मिसळून दिले. त्यानंतर दोन गादीवाफ्यात तीन फुटाचे अंतर येईल या प्रमाणे पॉवर टिलरच्या साहाय्याने अडीच फूट रुंदीचा आणि 10 इंच उंचीचा गादीवाफा तयार केला. गादीवाफ्यामध्ये एकरी 100 किलो 18ः46ः0, 50 किलो पोटॅश, 250 किलो निंबोळी पेंड,10 किलो झिंक सल्फेट, पाच किलो फेरस सल्फेट,10 किलो मॅग्नेशिअम सल्फेट, तीन किलो फोरेट, 10 किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये मिसळून दिली. गादीवाफा एकसमान करून मधोमध ठिबकची लॅटरल अंथरली. दोन दिवस ठिबक संचातून पाणी सोडून लॅटरल तपासून घेतल्या. त्यानंतर गादीवाफ्यावर चार फूट रुंदीचा 30 मायक्रॉन जाडीचा मल्चिंग पेपर अंथरला. पेपर गादीवाफ्याला बेडला समांतर राहील, तो ढिला पडणार नाही याची काळजी घेतली. कारण मल्चिंग पेपर ढिला राहिला तर वाऱ्यामुळे फाटण्याची शक्‍यता असते. परागीभवनासाठी शेतात मधमाश्‍यांच्या दोन पेट्या ठेवलेल्या आहेत. 

रोप लागवडीच्या आदल्या दिवशी लॅटरलच्या दोन्ही बाजूंस 15 सें.मी. अंतरावर रोप बसेल अशी छिद्रे पाडली. एका ओळीतील दोन छिद्रांमधील अंतर दोन फूट ठेवले. छिद्रे पाडून झाल्यावर ठिबक सिंचन संच सुरू करून गादीवाफा ओला करून घेतला. वाफसा आल्यावर नंतर छिद्रे पाडलेल्या ठिकाणी 12 दिवस वयाच्या रोपांची लागवड केली. एकरी 6000 रोपे बसली. लागवडीनंतर पहिले सहा दिवस रोज 10 मिनिटे पाणी देण्यास सुरवात केली. त्यानंतर पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार पाणी नियोजन ठेवले. तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार लागवडीनंतर आठव्या दिवसापासून दोन किलो 19-19-19 सलग 15 दिवस दिले. त्यानंतर 15 दिवस 12ः61ः0 हे खत दोन किलो दिले. त्यानंतर 15 दिवस 0-52-34 दोन किलो ठिबकमधून दिले. फळे तयार होताना 50 ते 60 दिवसांच्या दरम्यान जर फळामध्ये साखरेचे प्रमाण कमी वाटले आणि फळास चकाकी येत नसेल, तर गरजेनुसार 0-0-50 या खताची दोन किलो मात्रा एक किंवा दोन दिवस देतो. 

एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापनावर भर - कलिंगडावर प्रामुख्याने मावा, फुलकिडे व नाग अळी या किडींचा, तसेच भुरी, करपा, केवडा या रोगांचा प्रादुर्भाव दिसतो. त्यामुळे लागवडीनंतर सात ते आठ दिवसांनंतर किडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी शिफारशीत कीडनाशकांची फवारणी करतो. त्यानंतर कीड, रोगांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या सल्ल्याने शिफारशीत कीडनाशकांच्या फवारण्या घेतो. फळमाशीच्या नियंत्रणासाठी एकरी आठ कामगंध सापळे लावतो. फुलकिडी, मावा किडीच्या नियंत्रणासाठी शेतात आठ ठिकाणी पिवळ्या आणि निळ्या रंगाच्या 1 x 1.5 फूट आकाराच्या पट्ट्या लावतो. त्यावर ग्रीस लावून ठेवतो. त्यावर किडी चिकटतात. एकात्मिक पद्धतीने कीड, रोगनियंत्रणावर माझा भर असतो. 

प्रतवारी करूनच विक्री - फळाची पहिली तोडणी ही लागवडीपासून 60 ते 65 दिवसांनी केली. काढणी करण्यापूर्वी फळांची पक्वता, बाजारपेठ, रंग, आकार या गोष्टींचा विचार करून तोडणी केली. फळांचा आकार तसेच फळांची प्रतवारी करून चांगल्या प्रतीची फळे मोठ्या बाजारपेठेत (मुंबई, पुणे या ठिकाणी) पाठविली, तर मध्यम व कमी दर्जाची फळे स्थानिक बाजारपेठांमध्ये पाठविली. फळांचे वजन सरासरी तीन ते पाच किलोच्या दरम्यान असते. सरासरी प्रति किलो सात ते दहा रुपये असा दर मला मिळाला. प्रति एकरी 32 टन उत्पादन मिळाले. जमिनीची मशागत ते काढणीपर्यंतचा एकरी पीक व्यवस्थापनाचा खर्च 82,500 इतका आला. खर्च वजा जाता निव्वळ नफा मला दोन लाखांपर्यंत राहिला. 

शेतकरी गटातून प्रगती -- कृषी विज्ञान केंद्र आणि नाबार्डच्या सहकार्याने "शिवकृपा नाबार्ड फार्मर्स क्‍लब' अडीच वर्षापासून कार्यरत. 
- कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. ला. रा. तांबडे, प्रा. गोंजारी, प्रा. अली यांचे मार्गदर्शन.
- गटशेतीवर भर. खरबूज, आले, कलिंगड, ढोबळी मिरचीची गटशेती. एकत्रित विक्रीचे नियोजन, व्यापारी शेतावर येऊन खरेदी करतात. 
- गावात गटाचे कार्यालय, दररोज सकाळी पीक व्यवस्थापनावर चर्चा. 
- "शिवकृपा' हा ब्रॅण्ड तयार केला, त्यामुळे बाजारपेठेत गटातील शेतकऱ्यांच्या फळांना वेगळी ओळख, त्यामुळे चांगला दर. 
- एकत्रित बियाणे, खते, कीडनाशकांची खरेदी. 
- प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतावर शिवारफेरी, त्यातून पीक व्यवस्थापन आणि बाजारपेठेचे नियोजन. 

संपर्क - बाबूराव भोसले, 9822920642, 
किरण जाधव, 0217-2350359 

(लेखक कृषी विज्ञान केंद्र, सोलापूर येथे कार्यरत आहेत.)

Tuesday, November 12, 2013

अभ्यासातून उंचावत गेला ऊस उत्पादनाचा आलेख

एकरी 30 टन ऊस उत्पादनापासून सातत्याने अभ्यास आणि सुधारणांच्या माध्यमातून काले (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथील प्रदीप आणि प्रमोद शांताराम पाटील या भावंडांनी उसाचे 42 गुंठ्यांत 121 टन 750 किलो उत्पादन घेतले आहे. अभ्यासातून सुधारणा होत चढत गेलेला त्यांचा आलेख अन्य शेतकऱ्यांनाही मार्गदर्शक ठरू शकेल. हेमंत पवार 
काले (ता. कऱ्हाड, जि. सातारा) येथील शांताराम पाटील हे पोलिस खात्यामध्ये नोकरीस होते. घरी दहा एकर शेती; मात्र नोकरीमुळे घरच्या शेतीकडे लक्ष देता येत नव्हते. म्हणून 32 वर्षांपूर्वी नोकरी सोडून ते पूर्णवेळ शेती करू लागले. पारंपरिक पद्धतीने शेती करत असल्याने ऊस शेती फारशी परवडत नव्हती. त्यांची मुले प्रदीप आणि प्रमोद शेतीत लक्ष देऊ लागले. त्यांनी वडिलांच्या सूचनेनुसार हळूहळू शेतीमध्ये सुधारणा राबविण्यास सुरवात केली. अन्य लोकांना उसाचे अधिक उत्पादन मिळते, मग आपल्याला का नाही? या प्रश्‍नातून शेतीतील माती, पाणी, खते वापर यांचा अभ्यास सुरू केला, त्यासाठी विविध लोकांचे मार्गदर्शन मिळाले. हळूहळू ऊस पिकाचे तंत्र त्यांना उमगत गेले. कष्ट तर ते आधीपासून करतच होते, उत्पादनातही लक्षणीय वाढ होत गेली. 2012 मध्ये 42 गुंठे क्षेत्रातून 121 टन 750 किलो ऊस उत्पादन त्यांनी घेतले आहे, त्याच पिकात घेतलेल्या आंतरपीक सोयाबीनचे 15 क्विंटल उत्पादन मिळाले आहे. 

असा आहे ऊस शेतीचा चढता आलेख वर्ष --ऊस जात --लागवडीची पद्धत व काय सुधारणा केल्या-- एकरी उत्पादन (टनामध्ये) 
1) 1981-- को 740 --पारंपरिक पद्धतीने लागवड - तीन फुटी सरी - ओरंबा पद्धत, तीन डोळ्यांच्या कांडीची सहा इंचावर लागवड --30 टन. 
2) 1998-- को 7219 --पारंपरिक पद्धतीमध्ये बदल केला. - शेतामध्ये विहीर घेतली. चार फुटी सरी ठेवली. दोन डोळे ऊस कांडीची सहा इंचांवर लागवड, सरी ओरंबा पद्धत, --50 ते 60 टन. 
3) 2001-- फुले 265 -- लागवड तंत्रज्ञानात सुधारणा- चार फुटी सरी व एक डोळ्याच्या कांडीची 1.25 फुटांवर लागवड, माती परीक्षण केले तरी खताचे प्रमाण अधिक असे, शुद्ध बियाणे विद्यापीठ किंवा ऊस संशोधन केंद्रातून आणून स्वतःसाठी पाच गुंठे क्षेत्रावर रोपवाटिका करण्यास सुरवात --70 टन. 
4) 2005-- फुले 265-- मातीमध्ये सुधारणा करण्यासाठी सेंद्रिय खताचे प्रमाण वाढवले. हिरवळीची खते ताग- धैंचा लागवड, चार फुटी सरी व एक डोळा कांडी 1.25 फुटावर लागवड, माती परीक्षणानुसार पहारीने खते देणे, पट्ट्यामध्ये सोयाबीनचे आंतरपीक एकरी पाच क्विंटल उत्पादन --ऊस उत्पादन 80 टनांपर्यंत पोचले. 
5) 2008 -- फुले 265-- एक डोळा पद्धत, चार फुटी सरी व दोन रोपांतील अंतर दोन फूट, जैविक खते व कीडनाशकांची कांडी प्रक्रिया करण्यास सुरवात-- मजूर टंचाईमुळे खते पहारीऐवजी पॉवर टिलरच्या साह्याने मातीआड करणे. -- 100 टन 
6) 2009 -- फुले 265-- प्लॅस्टिक पिशवीत एक डोळा रोपे तयार करण्यास प्रारंभ, 4.25 फुटी सरी व दोन रोपांतील अंतर दोन फूट-- 105 टन. 
7) 2012-- को 86032 --4.50 फुटी सरी व दोन रोपांतील अंतर 2.25 फूट, पट्ट्यामध्ये सोयाबीन आंतरपीक एकरी 15 क्विंटल उत्पादन --एकरी 116 टन. (42 गुंठ्यांत 121 टन 750 किलो) 

2012 मधील ऊस पिकाचे नियोजन - प्रदीप पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे, 
- एप्रिल महिन्यात नांगरट केली. शेत एक महिना उन्हात दिले. किडींचे अवशेष आणि तणांचे त्यामुळे नियंत्रण होते. 
- त्यानंतर घरचे सहा ट्रॉली शेणखत शेतामध्ये टाकून पुन्हा नांगरट केली. मे महिन्यात ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने साडेचार फूट रुंदीच्या सऱ्या सोडल्या. माती परीक्षण अहवालानुसार युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश, निंबोळी पेंड, करंज पेंड व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा लागणीपूर्व बेसल डोस दिला. 
- को - 86032 या वाणाचे बेणे पाडेगाव येथील ऊस संशोधन केंद्रातून आणून पाच गुंठे क्षेत्रावर दहा महिने वाढवले होते. या बेण्याच्या एक डोळा कांड्या तयार करून घेतल्या. 
- या कांड्यांवर प्रथम कीडनाशकाची बीजप्रक्रिया केली. कांड्या 15 मिनिटे वाळल्यानंतर ऍसेटोबॅक्‍टर, ऍझेटोबॅक्‍टर आणि ट्रायकोडर्मा, पीएसबी, गूळ अर्धा किलो, बेसनपीठ एक किलो, गोमूत्र पाच लिटर, चुना, शेण वीस किलो यांची जैविक प्रक्रिया केली. 
- सव्वादोन फूट अंतरावर एक कांडी प्रमाणे एकरी सहा हजार पाचशे कांड्या लावण्यात आल्या. बेसल डोस देऊन घेतला. काही दिवसांनंतर फुटवे फुटण्यास सुरवात झाली. 
- लागणीनंतर एक महिन्याने युरिया पन्नास किलो, पोटॅश शंभर किलो आणि सुपर फॉस्फेटच्या गोळीची दोनशे किलो असा पहिला डोस दिला. दोन महिन्यांनी दुसरा हप्ता दिला. 
- अडीच महिन्यांनंतर बाळबांधणी करून ताग मध्यभागी टाकला. 
- या दरम्यान उसावर 19-19-19 हे 100 ग्रॅम, कीटकनाशक 20 मि.लि. आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये 100 मि.लि. ही पहिली, 12-61-0 खत 100 ग्रॅम, कीटकनाशक 20 मि.लि. व सूक्ष्म अन्नद्रव्ये 100 मि.लि. ही दुसरी, तर 12-61-0 खत 100 ग्रॅम, 19-19-19 हे 100 ग्रॅम पाण्यामध्ये मिसळून तिसरी फवारणी केली. ताग फुलोऱ्यात येण्यापूर्वी मोठी भर देण्याच्या वेळी ताग उपटून सरीमध्ये गाडला. 
- त्यानंतर डीएपी 100 किलो, पोटॅश पन्नास किलो, युरिया 90 किलो असा खतांचा तिसरा डोस दिला. 
- एनपीके आणि सूक्ष्मद्रव्यांच्या दोन फवारण्या घेतल्या. 
- दरम्यान बीजप्रक्रियेसारखीच जैविक घटकांची स्लरी टप्प्याटप्प्याने देण्यात आली, त्यामुळे पाने जाड व रुंद झाली. 
- चार महिन्यांचा कालावधी झाल्यानंतर पहिल्यांदा ऊस भांगलून व कुळवून घेतला.
- ऊस पाच महिन्यांचा झाल्यानंतर 10-26-26 खत 200 किलो, युरिया 100 किलो आणि निंबोळी पेंड 200 किलो याचा चौथा हप्ता दिला. 
- त्यानंतर लगेच 19-19-19, 12-61-0 आणि 0-0-50 प्रत्येकी एक किलो 350 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करून घेतली. 
- या वेळेपर्यंत उसाची उंची, कांड्यांची संख्या आणि जाडी वाढली. त्यानंतर मजुरांकडून उसाचा पाला काढून तो एका आड एक सरीत घातला. 
- त्यानंतर एक महिन्यानंतर 50 किलो युरिया आणि पन्नास किलो पोटॅश पाला नसलेल्या एका आड एक सरीत टाकला. 
- मोठ्या बांधणीनंतर 20 दिवसांनी 15 पोती जैविक खत मिसळलेले कंपोस्ट घातले. 
- त्यानंतर उसाला खत टाकणे बंद करून 35 लिटर गोमूत्र 300 लिटर पाण्यात मिसळून ठिबकद्वारे दिले. 
- ऊस अकरा महिन्यांचा झाल्यानंतर खते देणे पूर्णपणे बंद केले. जानेवारीमध्ये उसाला तोड आली. 
- नियोजनबद्ध आणि काटेकोर नियोजन केल्यामुळे एकरी 116 टन उसाचे उत्पादन मिळाले. 

सोयाबीनचे आंतरपीक उसामध्ये वरंब्यावरती एका ओळीत सोयाबीन लागण केली. सोयाबीनसाठी स्वतंत्र खते टाकली नाहीत. त्यातून 105 दिवसांत 42 गुंठ्यांतून 15 क्विंटल सोयाबीन झाले. 

जमा- खर्च मशागतीसाठी ट्रॅक्‍टर भाडे तीन हजार 200 रुपये, ऊस बियाण्यासाठी तीन हजार 600 रुपये, सोयाबीन बियाण्यासाठी 400 रुपये, लागण करण्यासाठी दोन हजार रुपये, भांगलण व मशागतीसाठी सात हजार 900 रुपये, रासायनिक खतांसाठी 11 हजार 300 रुपये, द्रवरूप खतासाठी तीन हजार 440 रुपये, ठिबक सिंचन संचासाठी सहा हजार रुपये, पाला काढण्यासाठी चार हजार रुपये व पाण्यासाठी सहा हजार रुपये असा 42 गुंठ्यांसाठी एकूण 45 हजार 840 रुपये खर्च आला. 
ऊस उत्पादन 121.750 टन उसाचे प्रति टन दोन हजार 500 रुपयांच्या हप्त्याप्रमाणे तीन लाख चार हजार 375 आणि सोयाबीनच्या 15 क्विंटलमधून दोन हजार 350 रुपये दराने 35 हजार 250 रुपये मिळाले. 

मार्गदर्शन ठरले उपयुक्त "ऍग्रोवन'मधील ऊस शेतीसंदर्भातील लेख व माहिती तंतोतंत खरी ठरते, याची प्रचिती येत गेली. ऊस पिकाविषयी माहिती व कृषी विभागाचे अधिकारी एम. एस. यादव, सुजय पवार, शशिकांत मोहिते, शिवाजी बाबर, यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील सर्कल अधिकारी अजय दुपटे यांचे मार्गदर्शन मिळाले. साखर कारखान्याचे चेअरमन अविनाश मोहिते यांनी प्रोत्साहन यामुळे दरवर्षी अधिक उत्पादन घेण्याचा हुरूप वाढत गेल्याचे प्रदीप पाटील यांनी सांगितले.

संपर्क - 
प्रदीप पाटील - 9860371052, 7588061352 
अजय दुपटे - 9850608309

निकमांनी पिकवलं उसाचं एक नंबरी बेणं

सांगली जिल्ह्यातील शेणे (ता. वाळवा) येथील धनाजी निकम यांनी ऊस शेतीची पारंपरिक पद्धत बाजूला ठेवून सुधारित लागवड तंत्रज्ञानाची कास धरली आहे. त्यामध्ये त्यांनी यांत्रिकीकरणाला प्राधान्य दिले आहे. ऊस शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांची शेती आदर्श ठरावी. आपल्या उसाची बेणे म्हणून ते विक्री करतात. त्यातून समाधानकारक उत्पन्नाची आशा त्यांनी निर्माण केली आहे.

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कासेगावपासून पश्‍चिमेला दोन किलोमीटर अंतरावर शेणे परिसरात निकम यांची दोन ठिकाणी विभागून 32 एकर शेती आहे. त्यातील बहुतांश जमीन खडकाळ व चढ-उताराची होती. पुणे - बंगळूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आठ-दहा वर्षांपूर्वी सुरू होते. त्या रस्त्याला भरावासाठी खडकाळ जमिनीतील मुरूम दिला. त्या बदल्यात रस्ताविस्तारीकरण करताना ज्यांच्या जमिनी गेल्या त्यातील सुपीक माती रस्त्यासाठी काढली जात होती. ती माती मुरुमाच्या बदल्यात घेऊन मुरूम नेलेल्या खडकाळ जमिनीत चार ते पाच फुटाचा थर देऊन अंथरली. त्या ठिकाणी सिंचनाची सोय केली. सध्या या जमिनीतून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न निकम यांनी केला आहे.

ऊस बियाणे विक्रीतून मिळवला फायदा
निकम आडसाली व पूर्वहंगामी ऊस लागवडीचे नियोजन करतात. त्यांचे को 86032 या जातीच्या उसाचे शेत व उसाची गुणवत्ता पाहून परिसरातील अनेकजण बेणे म्हणून त्याची मागणी करू लागले. ऊस कारखान्याला देण्यापेक्षा बेणे म्हणून वजनावर त्याची विक्री करण्याचे निकम यांनी ठरवले. त्याप्रमाणे मागील वर्षी एक एकर क्षेत्रात त्यांनी ऊस घेतला. त्याचे वाढ्यासह 155 टन वजन भरले. साडेतीन हजार रुपये प्रति टन या दराने बेणेविक्री केली. सुमारे दहा महिन्यांमध्ये पाच लाख 42 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले. खर्च 1,19,000 रुपये वजा जाता चार लाख 23 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न त्यांना मिळाले.

उसाची सुधारित लागवड पद्धत
निकम यांनी पट्टा पद्धतीच्या लागवडीवर भर दिला आहे. सुरवातीला सहा फूट, त्यानंतर आठ फूट या पद्धतीने लागवड केली. या पद्धतीमुळे भांगलण सुलभ होते. बऱ्याच वेळा छोट्या ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने आंतरमशागत चांगल्या प्रकारे करता येते. निकम यांचा "ग्रीन हार्वेस्ट" खत पेरून देण्यावर भर असतो. पट्टा पद्धत असूनही निकम कोणते आंतरपीक घेत नाहीत याचे कारण म्हणजे मजूरटंचाई. येत्या काळात इस्राईल तंत्रज्ञानावर आधारित रोबो विकत घेण्याचे त्यांचे नियोजन आहे. आपल्या गरजेनुसार रोबोची निवड ते करणार आहेत.

सबसरफेस ठिबक आणि यांत्रिकीकरण
उसाला पाणी देण्यासाठी ठिबक पद्धतीचा वापर होत असताना सबसरफेस ही नवी पद्धत पुढे आली आहे. निकम यांनी संपूर्ण शेतावर सबसरफेस योजना राबवली आहे. यांत्रिकीकरणाला प्राधान्य देणाऱ्या निकम यांच्याकडे सुमारे 50 लाख रुपयांची शेती अवजारे व दोन ते तीन ट्रॅक्‍टर अशी यंत्रसामग्री आहे. आंतरमशागतीसाठी ते छोट्या ट्रॅक्‍टरचा वापर करतात. कीडनाशक फवारणी, खुरटणी, भरणी यासाठी त्याचा उपयोग होतो. सबसॉयलर हे अवजारही त्यांच्याकडे आहे. त्या आधारे जमिनीचा तीन फुटापर्यंतचा थर भुसभुशीत केला जातो.

व्यवस्थापन
मागील वर्षीच्या ऊस व्यवस्थापनाची माहिती देताना निकम म्हणाले, की जमिनीत सबसॉयलरचा वापर केल्यानंतर आडवी- उभी नांगरट केली. जोडओळीतील अंतर दोन फूट ठेवले. सबसरफेस ठिबक पाइप पुरून घेतली. पट्टा सहा फुटाचा ठेवला. एक सप्टेंबरला दोन डोळ्यांच्या टिपरीचा वापर केला. लागवडीआधी बेणेप्रक्रिया केली. किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी डायमिथोएटचा वापर केला. सुरवातीला दहा बॅग "ग्रीन हार्वेस्ट", चार पोती सिंगल सुपर फॉस्फेट, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये, दाणेदार गंधक यांचा वापर केला. फिप्रोनील हे दाणेदार कीटकनाशक मातीतून दिले. पुढील टप्प्यात 19-19-19, 12-61-0 आदींचा वापर केला. एकूण व्यवस्थापनातून पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होऊन आठ महिन्यांत वीस ते तेवीस कांड्यांचा ऊस तयार झाला. शेतकऱ्यांना बेण्यासाठी हा ऊस प्रति टन साडेतीन हजार रुपये या दराने तोडण्यात आला.

निकम यांनी या वर्षी बेणे विक्रीसाठी म्हणून नऊ एकरावर ऊस घेतला आहे. त्यांच्या उसाची गुणवत्ता पाहण्यासाठी सुमारे 20 हजारांपर्यंत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताला भेट दिली आहे. सूर्यप्रकाश आणि पुरेशी हवा पिकाला अत्यंत आवश्‍यक असते. त्यावर आपला अधिक भर असल्याचे निकम यांनी सांगितले. बेण्यासाठी अनेक शेतकरी सतत मागणी करतात. मात्र बुकिंग पद्धत वापरत नाही. इच्छुक शेतकऱ्यांचे संपर्क क्रमांक घेतले असून त्यांना संपर्क साधून बेणे तयार असल्याचे कळवले जाते. अशा पद्धतीमुळे योग्य नियोजन साधले जाते. यंदाच्या वर्षी प्रति टन चार हजार रुपये दराने बेणे विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निकम यांच्या ऊस शेतीतील काही वैशिष्ट्ये
- अडीच ते तीन किलो वजनाचा ऊस बेण्यासाठी वापरतात
- दोन डोळ्यांच्या टिपरीचा लागवडीसाठी वापर
- जोडओळ व पट्टा पद्धतीचा वापर
- को 86032 जातीचीच प्राधान्याने निवड
- बेणेप्रक्रिया करूनच लागवड
- "ग्रीन हार्वेस्ट" व रासायनिक खते असा संतुलित वापर
- विद्राव्य खतांवरही भर
- उसात लावणी व खोडव्यातही पाचटाचा वापर
- वाढलेल्या उसाची वाळलेली पानेही शेतात पसरवतात.
- गेल्या काही वर्षांत एकरी उत्पादन सरासरी 100 टनांपर्यंत
- स्वयंचलित पद्धतीच्या वापरावर भर
- शेतीतील पैसा शेतीत यांत्रिकीकरण करण्यासाठीच गुंतवण्याकडे कल,
त्यातूनच विविध प्रकारचे ट्रॅक्‍टर घेतले.

धनाजी निकम, 9158164965

"ओल्या भुईमूग शेंगां'चे आंतरपीक देतेय नगदी उत्पन्न

वाळवा तालुक्‍यात उसात सोयाबीनऐवजी भुईमूग हे आंतरपीक म्हणून पुढे येत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. भुईमुगाच्या ओल्या शेंगांना मुंबईची बाजारपेठ उपलब्ध झाल्याने चांगला भाव मिळत असल्याने शेतकरी समाधानी आहेत. सोयाबीनच्या तुलनेत नुकसानीचे कमी "टेन्शन', कमी श्रम व कमी खर्च यामुळे शेतकरी तालुका भागात याच पिकाचे नियोजन चांगल्या प्रकारे करू लागला आहे. श्‍यामराव गावडे 
कृष्णा आणि वारणा नद्यांच्या सान्निध्यात वाळवा संपन्न तालुका म्हणून ओळखला जातो. उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक शेतकरी सोयाबीन, भुईमूग अशी आंतरपिके घेतात. परंतु सोयाबीनवरील तांबेरा तसेच काढणी-मळणीची अडचण व हंगामादरम्यान घसरणारा दर यामुळे शेतकरी अनेकवेळा अडचणीत येतो. त्या तुलनेत भुईमुगाच्या ओल्या शेंगा विकून नफा मिळवण्याचे तंत्र त्याने आत्मसात केले आहे. 

वाळवा तालुक्‍यातील स्थिती तालुक्‍यात सुमारे दोन हजारांहून अधिक एकर क्षेत्रावर भुईमुगाचे आंतरपीक घेतले जाते. सुमारे तीन महिन्यांत सोयाबीनच्या तुलनेत कमी श्रमात हे पीक ऊस पिकातील बहुतांश उत्पादन खर्च भरून काढते. त्याचबरोबर तणांचे नियंत्रण होण्यासही मदत होते. मुख्य म्हणजे त्याचा बेवड चांगला असल्याचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. 

शेंगांना मिळाली मुंबईची बाजारपेठ वाळवा तालुक्‍यातील इटकरे येथे शिवसाई भाजीपाला संघ आहे. त्याद्वारे तालुक्‍यातील भाजीपाला मुंबईला विक्रीसाठी जातो. शेताच्या बांधावर संघाची वाहतूक गाडी येत असल्याने शेतकऱ्यांची सोय झाली आहे. मागील चार वर्षांत प्रायोगिक स्वरूपात शेतकऱ्यांनी ओल्या भुईमुगाच्या शेंगा विकल्या. त्याला चांगला भाव मिळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी या पिकाकडे जाणीवपूर्वक लक्ष पुरवले. यंदाच्या हंगामात तर ओल्या शेंगांना प्रति किलो 50 ते 51 रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. 

शेतकऱ्यांचे अनुभव येलूर येथील अनिल रंगराव महाडीक यांची सहा एकर शेती आहे. वर्षाला ते सुमारे दोन एकरांवर उसात भुईमूग घेतात. ते बीजोत्पादनही करतात. शेंगा वाळवणे, निवडणे व फोडून बियाण्यांची विक्री करणे हे काम फायदेशीर असले तरी त्रासदायक आहे. त्यामुळे महाडीक यांनी गेल्या दोन वर्षांपासून भुईमुगाच्या ओल्या शेंगा मुंबई बाजारपेठेत पाठविण्याचा नवा मार्ग शोधला आहे. त्यांनी विकलेल्या शेंगांना यंदा प्रति किलो 48 ते 51 रुपये दर मिळाला आहे. ते म्हणाले, की सोयाबीनप्रमाणे या पिकात शेंगा काढणीचा त्रास नाही. सोयाबीनपेक्षा जास्त नफा या पिकातून होतो. यंदा प्रतिकूल पाऊसमानामुळे उत्पादन फारसे समाधानकारक नाही. तरीही चांगले लक्ष देऊन दरवर्षी पीक व्यवस्थापन केल्यास एकरी 30 पोती (प्रति 50 किलो) उत्पादनापर्यंत पोचता येते. 

दिलीप धोंडिराम घोरपडे (बहादूरवाडी) अनेक वर्षांपासून भुईमुगाचे खरीप व उन्हाळी अशा दोन टप्प्यांत भुईमुगाचे उत्पादन घेतात. उन्हाळ्यात ऊस तुटून गेल्यानंतर व त्यानंतर खरिपात उसात हे पीक असते. या वर्षी दोन्ही हंगामांत मिळून 120 पोती ओल्या शेंगाची त्यांनी विक्री केली. उन्हाळी हंगामात 60 गुंठ्यांत 80 पोती उत्पादन मिळाले. 

शिवसाई संघातर्फे मुंबईत विक्री केली. प्रति क्विंटल सरासरी 4500 ते 5100 रुपयांपर्यंत दर मिळाला. 
अर्थात, एरवी सरासरी दर किलोला 30 रुपये असतो. घोरपडे म्हणाले, की भुईमुगाचा बेवड चांगला राहतो. भुईमुगाच्या वेलांचा उसाच्या मुळाजवळ खत म्हणून चांगला वापर होतो. सुमारे तीन महिन्यांच्या कालावधीत यंदा खर्च वजा जाता सुमारे पन्नास हजार रुपयांपर्यंत नफा झाला. 
माझ्या भागातील हवामान, ठिबक सिंचन, जमीन या गोष्टी अनुकूल ठरल्याने उत्पादकता चांगली असते. 
उसाच्या एकरी 40 ते 45 हजार रुपये खर्च भुईमूग भरून काढतो. ओल्या शेंगाच विकायच्या असल्याने वाळवणी तसेच अन्य "टेन्शन' नाही. 

प्रमोद धोंडिराम शेवडे यांना अडीच एकर क्षेत्रावरील भुईमुगाच्या आंतरपिकातून सुमारे 45 क्विंटल उत्पादन मिळाले. शिवसाई खरेदी विक्री संघामुळे शेतकऱ्यांना मुंबईच्या बाजारपेठेची माहिती मिळाली. आपल्या नजरेसमोर वजन केले जाते. पारदर्शक व्यवहारामुळे शेतकऱ्यांशी त्या संघाचे नाते घट्ट झाले आहे. 

नवेखेड येथील गुरुनाथ चव्हाण यांच्या भुईमुगाच्या शेंगांना बाजारात 35 ते 38 रुपये प्रति किलो 
दर मिळाला. पुणे येथील बाजारपेठेत त्याची विक्री झाली. चव्हाण हे सहकारी साखर कारखान्यात नोकरी करतात. आई व पत्नी यांच्या मदतीने शेती करतात. ते म्हणाले, की जूनच्या अखेरीस फुले प्रगती वाणाची टोकण केली. ठिबक सिंचन असल्यामुळे पिकाची चांगली वाढ झाली. सुमारे दीड एकर क्षेत्रात 20 क्विंटल शेंगांचे उत्पादन मिळाले. पुढील वर्षी लवकर नियोजन करून भुईमुगाचे उत्पादन घेण्याचा प्रयत्न आहे. सध्या उसाची परिस्थिती चांगली आहे. 

भुईमुगाचे मोठे क्षेत्र वाळवा तालुक्‍यात बहुतांशी ठिकाणी ठिबक सिंचनाची सोय असल्याने भुईमूग चांगला पोसतो. तांदूळवाडी, मालेवाडी, येलूर, इटकरे, येडेनिपाणी, कामेरी, गोटखिंडी, कोरेगाव, नागाव, भडकंबे, बागणी, बावची, शिगाव, वशी, कुरळप, ऐतवडे खुर्द या परिसरातील जमीन भुईमुगाला पोषक आहे. या ठिकाणी पिकाचे चांगले उत्पादन मिळत असल्याचे शेतकरी म्हणतात. शेंगांचा आकार मोठा, एका शेंगेत सुमारे चार दाणे व कडक अशा वाणांची निवड केल्याने मुंबईत बाजारपेठेत चांगला दर मिळतो. 15 जूनच्या दरम्यान टोकणी गरजेची असते. गणेश चतुर्थी दरम्यान भुईमूग निघाल्यास शेंगांना चांगली मागणी राहते. 

विशेष म्हणजे शेंगा तोडणीसाठी महिला मजुरांची उपलब्धता असते. मजुरी पैशाऐवजी शेंगांच्या स्वरूपात दिली जाते. मजुरांनी दिवसभरात तोडलेल्या शेंगांचे समान दोन भाग केले जातात. त्यातील एका भागाचे पुन्हा समान सात भाग केले जातात व एक भाग मजुरी म्हणून दिला जातो. 

सोयाबीन पिकापेक्षा हे पीक शेतकऱ्यांना अनेक बाबतीत सुलभ वाटत आहे. त्याचे कारण म्हणजे सोयाबीनचा उत्पादन खर्च सुमारे 10 ते 11 हजार रुपयांपर्यंत येतो. एकरी 10 ते 12 क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. 

हंगामात प्रति क्विंटल 2200, 2500 ते तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळतो. त्या तुलनेत सुमारे 90 दिवसांच्या कालावधीत ओल्या भुईमूग शेंगा किफायतशीर रक्कम हाती देऊन जातात. घोरपडे यंदाच्या वर्षीची परिस्थिती सांगताना म्हणाले, की दोन हंगामांत मिळून दोन लाख रुपयांपर्यंत रक्कम या पिकातून हाती पडली आहे. 

आंतरपीक भुईमुगाचे फायदे -भुईमुगाचा बेवड ऊस पिकाला चांगला. 
-भुईमुगाच्या वेलांचा कंपोस्ट खत म्हणून वापर. 
-किडी-रोगांचा प्रादुर्भाव सोयाबीनच्या तुलनेने कमी राहतो. 
-मळणी व तोडणीसाठी मजुरांची उपलब्धता सहजगत्या होते. 
-माल साठवणूक करून ठेवावा लागत नाही. 
-ओल्या शेंगांची विक्री असल्याने उन्हात वाळवण करावी लागत नाही. 

विक्री व्यवस्था चांगली आहे शिवसाई भाजीपाला संघ विक्री व्यवस्था पाहतो. त्याचे फायदे असे. 

* शेतकऱ्यांच्या मालाला मुंबई-पुणेची बाजारपेठ उपलब्ध. 
* सध्याच्या कार्यालयात वजने करण्याची सोय आहे. 
* विक्रीनंतर सुमारे आठवड्याने शेतकऱ्यांना पेमेंट केले जाते. 
* शेतकऱ्यांचा माल कितीही असो, मागणी आली की संघाचे वाहन शेतकऱ्यांच्या शेतावर येते. 
* पुणे - बंगळूर महामार्गावर येडेनिपाणी नजीक संघाचे कार्यालय. 

संपर्क- 
अनिल महाडीक, 9975188316 
दिलीप घोरपडे, 9421303714 
प्रवीण शेवडे, 9011188121