Tuesday, February 17, 2015

१२ गुंठ्यांत वर्षभर पालक

खाद्या पिकाचे योग्य नियोजन केले तर अवघ्या काही गुंठे क्षेत्र असलेल्या शेतीतूनही प्रगतीचा मार्ग कसा सुकर होतो, याचा आदर्श अकोला जिल्ह्यातील चांदूर (खडकी) गावच्या मुरलीधर निलखन आणि त्यांच्या कुटुंबाने घालून दिला आहे. बारा गुंठे क्षेत्रातील पालक भाजीपाला पिकात वर्षभर सातत्य ठेवल्याच्या परिणामीच ही किमया साधता आल्याची प्रामाणिक कबुली ते देतात. विनोद इंगोले 
अकोला महानगरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरील चांदूर गाव हे मोर्णा नदीच्या काठावर वसलेले असल्याने गावात पाण्याचे स्रोत भक्‍कम आहेत. विहीर, बोअरवेल यासारख्या पर्यायांचा वापर करीत गावातील शेतकऱ्यांनी शेतीचा वारसा जपला आहे. 

निलखन कुटुंबीयांची शेती सिंचन सुविधांच्या बळावर समृद्धीच्या वाटेवर असलेल्या चांदूर गावातील बहुतांश शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीऐवजी फुले व भाजीपाला शेतीकडे वळले आहेत. याच गावचे मुरलीधर निलखन त्यापैकीच एक. बारमाही भाजीपाला म्हणून पालक घेण्यावर त्यांचा भर राहतो. त्यांची जेमतेम बारा गुंठे जमीन धारणा. त्यांचे वडील सूर्यभान कधीकाळी गहू, खरीप ज्वारी यासारखी पिके घेत; परंतु बारा गुंठ्यांतून मिळणाऱ्या उत्पादनातून कुटुंबात पत्नी, पाच मुली, दोन मुलांसह असलेल्या संसारात उदरनिर्वाह कसाबसा शक्‍य होत होता. मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैशांची सोय सूर्यभान यांना पत्नीसह मजुरीला जाऊन मिळणाऱ्या उत्पन्नातून करावी लागे. 

बदलाचे निमित्त.. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात काही वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी मेळाव्यात सूर्यभान यांना भाजीपाला पिकातून होणाऱ्या प्रगतीविषयी माहिती मिळाली. त्यानंतर पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला पिकाकडे वळताना त्यांनी पालकाची निवड केली. त्याची शेती चांगली केली. उत्पन्न कमावले. त्यामुळे त्यांच्या दोन मुलांनीही या पिकात सातत्य ठेवले. विशेष म्हणजे सूर्यभान निलखन यांनी सायकलने अकोल्यात पालकाचे मार्केटिंग रोज केले. 

निलखन यांच्या पालक लागवडीचा पॅटर्न - एकूण शेती सुमारे 12 गुंठे, त्यातच पालक घेतला जातो. 
- बारा गुंठ्यांचे प्रत्येकी चार गुंठे याप्रमाणे तीन भाग केले आहेत. 
- प्रत्येक भागातील लागवडीत सुमारे आठ ते दहा दिवसांचे अंतर 
- त्यामुळे एका प्लॉटमधील काढणी संपते, त्या वेळी दुसऱ्या प्लॉटमध्ये उत्पादन सुरू असते व ते विकण्यास उपलब्ध होत असते. 
- अशा रीतीने वर्षभर हे चक्र सुरू राहते. 

लागवड पद्धत - पालकाची लागवड वाफे पद्धतीने केली जाते. उन्हाळ्यात नागमोडी पद्धतीचे वाफे असतात. 
शेणखत - वर्षातून 12 गुंठ्याला चार ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळले जाते. घरी जनावरे नसल्याने शेणखत 2500 रुपये प्रति ट्रॉलीप्रमाणे विकत घेतले जाते. शेणखताच्या वापरावर अधिक भर असल्याने रासायनिक खतांचा वापर शक्‍यतो कमी केला जातो. पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास कीडनाशकाची फवारणी करावी लागते. 

उत्पादन कसे असते? - सुमारे चार गुंठ्यांचा प्लॉट 
- एक महिना पिकाचा कालावधी 
- प्रति महिना 500 ते 600 किलो पालक मिळतो. 
- उन्हाळा व हिवाळ्यात उत्पादन चांगले, तर पावसाळ्यात खराब होत असल्याने 300 किलोपर्यंतही खाली येते. 

बाजारपेठ - - अकोला बाजारपेठ सुमारे आठ किलोमीटर अंतरावर आहे. प्लॅस्टिक गोणपाटाचे भारे तयार करून त्यातून पालकाची वाहतूक केली जाते. 
- हंगामनिहाय प्रति किलो सरासरी पाच रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंतचा दर मिळतो. 
- वर्षभर होत असलेल्या आवकेनुसार दरात चढ-उतार राहतात. सध्या पालकाला किलोला 40 रुपये दर सुरू असल्याचे मुरलीधर म्हणाले. 
- महिन्याला सुमारे नऊ हजार ते कमाल 12 हजार, 15 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. 
- मुख्य खर्चामध्ये बियाणे चार गुंठ्याला दोन किलो लागते. किलोला 120 रुपये या दराने ते घेतले जाते. 
- बाकी मुख्य खर्च खतांवर होतो. दररोज 20 ते 25 रुपये रिक्षा वाहतुकीला दिले जातात. 
-- वर्षाला बारा गुंठे क्षेत्रात वर्षभर पीक सुरू ठेवून एक ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. 

मार्केट मुरलीधर म्हणाले, की उन्हाळ्यातील मे ते जुलै या काळात, तसेच पावसाळ्याच्या सुरवातीला पालकाला दर चांगले मिळतात. पावसाला सुरवात झाल्याने जादा पावसाच्या परिणामी पालक सडण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे तो खराब होतो, परिणामी त्याचे दरही वधारतात. अकोला भाजी बाजारात व्यापाऱ्यांमध्ये निलखन कुटुंबाच्या पालकाने दर्जेदार अशी ओळख निर्माण केली आहे. 

आर्थिक स्थैर्याकडे नेणारे पीक पालक हेच पीक निलखन कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याचे कारण ठरले आहे. यातून मुरलीधर निलखन यांना आपल्या पाच बहिणींचे लग्न चांगल्या प्रकारे करणे शक्‍य झाले. मुरलीधर यांच्यासह त्यांचा भावाचा विवाह देखील याच पीक पद्धतीतून आलेल्या उत्पन्नातून होऊ शकला. हलाखीच्या परिस्थितीत मातीच्या घरात राहणारे हे कुटुंब आज टुमदार बंगलावजा घरात स्थलांतरित झाले आहे. गाठीशी पैसा जुळू लागल्याने सुमारे 50 गुंठे क्षेत्र त्यांनी खरेदी केले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनीही या कुटुंबाप्रमाणे आपल्या शेतीचे नियोजन व गुणवत्तेत सातत्य ठेवले, तर त्यांच्या प्रगतीचे दालन नक्कीच खुले होऊ शकते. 

शेतीत राबते संपूर्ण कुटुंब पालकाच्या शेतीत संपूर्ण कुटुंब राबते. विशेषतः पालकाची काढणी घरचे सर्व सदस्य करतात. काढणीपासून ते त्याची स्वच्छता, हाताळणी, वाहतूक अशा प्रत्येक टप्प्यावर घरच्यांकडून योग्य दक्षता घेत असल्यानेच 
पालकाची गुणवत्ता टिकवणे शक्‍य होते, असे मुरलीधर म्हणाले. आई पार्वताबाई, बंधू किशोर आदी सर्वांची मदत मोलाची ठरते. मजुरीवर होणारा खर्च कुटुंबाने कमी केला आहे. 

निलखन यांच्या शेती नियोजनातील वैशिष्ट्ये - 1) दरवर्षी शेणखताचा वापर, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत. 
2) पालक पिवळसर दिसत असल्यास, जमिनीत नत्राची कमतरता असल्याचे लक्षात आल्यास थोड्या प्रमाणात युरिया खताचा वापर. 
3) मजुरांऐवजी कुटुंबीयांद्वारे पालकाची काढणी प्रतवारी करून केली जाते. 
4) पालक पिकाला पाण्याची चांगली गरज असते. उन्हाळ्यात एक दिवसाआड, तर हिवाळ्यात तीन ते पाच दिवसांआड पाटाने पाणी दिले जाते. 

संपर्क 
निलखन 
9850597031

काकडीच्या लागवडीचे नियोजन

पाण्याचे नियोजन, मेहनत व अनुभवाच्या जोरावर दैठणे गुंजाळ (ता. नगर) येथील सुभाष अहिलाजी गुंजाळ यांनी डाळिंबात काकडीचे आंतरपीक घेऊन हा प्रयोग चांगलाच यशस्वी केला आहे. 
नगर शहरापासून साधारण पंधरा किलोमीटर अंतरावर व आदर्शगाव हिवरेबाजारच्या उशाला दैठणे गुंजाळ हे गाव आहे. येथील सुभाष गुंजाळ यांची वडिलोपार्जित २३ एकर व आदर्श गाव हिवरेबाजारच्या परिसरात दहा एकर अशी ३३ एकर शेती आहे. त्यातील बहुतांश शेती माळरान व खडकाळ आहे. मुळात नगर व पारनेर तालुक्‍यात पाण्याचे कायम दुर्भिक्ष. गुंजाळ यांची शेती असलेल्या भागात पावसाळ्यातही पर्जन्यमान अल्प असते, त्यामुळे या भागातील 
शेती पावसावरच अवलंबून असते. बाजरी, ज्वारी, मटकी, मूग, कपाशी, फार तर तूर अशी पावसावर येणारीच पिके प्रामुख्याने घेतली जातात. गुंजाळ गेल्या अठरा वर्षांपासून वेगळ्या व फायदेशीर पिकांचा शोध घेऊ लागले. स्वतः निरक्षर असले तरी पुणे, सातारा, कोल्हापूर आदी भागांत शेतीत वेगळा प्रयोग करणा-या शेतक-यांच्या शेतीला त्यांनी भेटी दिल्या. पिकांचे नियोजन, व्यवस्थापन, उत्पादित केलेल्या मालाला बाजार कोठे व कसा मिळवायचा आदींची माहिती त्यांनी घेतली. प्रयोगशील शेतक-यांच्या प्रयोगांतूनच त्यांना प्रगतीची वाट सापडली. सुरुवातीला संत्रा- मोसंबीची लागवड त्यांनी केली. खडकाळ जमिनीतूनच ते नवी वाट शोधत राहिले. 
काकडीच्या लागवडीचे नियोजन 
गुंजाळ तसे सुमारे ११ वर्षांपासून काकडीचे पीक घेतात. एकरी १५ टनांपर्यंत उत्पादन त्यांना मिळते. काही वेळा त्याहून अधिक उत्पादनही त्यांनी घेतले आहे. यंदाची परिस्थिती मात्र दुष्काळी होती, पीक जगवणेही मुश्‍कील होते, तरीही मागील अनुभव पणास लावून काकडीचे नियोजन गुंजाळ यांनी केले. डाळिंबाची लागवड करायची होतीच, त्यातच काकडीचे आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला. फेब्रुवारीत सुरुवातीला तीन एकर शेताची नांगरट करून रोटाव्हेटर फिरवल्यानंतर ठिबक सिंचनचे पाईप अंथरले. आठ ब्रास शेणखत, दोन क्विंटल डीएपी, एक क्विंटल यूरिया, दोन क्विंटल पोटॅश, दोन क्विंटल सूक्ष्म अन्नद्रव्य घटकयुक्त खत, चार क्विंटल निंबोळी पेंड टाकली. त्यानंतर बेड तयार केले. त्यावर ठिबक पसरून डाळिंबाची लागवड केली. त्यानंतर आंतरपीक म्हणून चार दिवसांनी काकडीच्या बियाणांची लागवड केली. 
लागवड झाल्यानंतर सुमारे चाळीस दिवसांनी काकडी तोडणीसाठी आली. वाढीसाठी सुरुवातीला १९-१९-१९ हे विद्राव्य खत दिले. फुले व कळी येऊन ते पोसण्यासाठी १२- ६१-० हे खत ठराविक दिवस दिले. तोडणी सुरू असतानाही पुढे अन्य विद्राव्य खतांचा वापर सुरू ठेवला. 
उन्हाळ्याचे दिवस असल्याने काकडीला पुरेसे पाणी 
मिळावे, भर उन्हात गारवा कायम राहावा, यासाठी 
सुरुवातीला महिनाभर सकाळी आठ वाजता ठिबकच्या 
माध्यमातून पाणी दिले. 
तीन एकराला एक तासात दिवसाला साठ हजार लिटर पाणी दिले जायचे. काकडीची तोडणी सुरू झाल्यावर सकाळी- संध्याकाळी असे तीन तास पाणी दिले जायचे. पूर्ण पीक हाती येईपर्यंत पाणी किती लागेल याचे गुंजाळ यांनी नियोजनच केले होते. काकडीवर किडी-रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कीडनाशकांच्या फवारण्याही केल्या. एकूण नियोजनातून गुंजाळ यांनी दुष्काळात माळरानावर काकडी फुलवली. 
उत्पादन व उत्पन्न- डाळिंबाची झाडे लहान असेपर्यंत काकडीचे आंतरपीक घेण्याचा निर्णय घेतला होता, त्यादृष्टीने तीन एकरांवर काकडी घेताना प्रारंभी नांगरटीला ३००० रु., रासायनिक खते १८ हजार, शेणखत २० हजार रु., जैविक खते- कीडनाशके १३ हजार रु., रोटाव्हेटर, बेड तयार करणे, लागवड व इतर मजुरीला ४०,००० रुपये असा खर्च आला. बियाणाच्या एका पॅकेटचा दर ४५० रुपयांप्रमाणे १० हजार ८०० रुपये खर्च आला. तीन एकरांत काकडीचे पीक हाती येईपर्यंत वाहतुकीसह एकूण खर्च सुमारे एक लाख १० हजार रुपये झाला. तीन एकरांत सुमारे ५५ टन काकडीचे उत्पादन 
मिळाले.

नगरच्या बाजारातच मागणी गुंजाळ यांनी रासायनिक खतापेक्षा शेणखताच्या वापरावरच भर दिला. प्रत चांगली असल्याने नगरच्या बाजारातच काकडीला चांगली मागणी राहिली. प्रति किलो सरासरी 12 रुपये दर मिळाला. यंदाच्या दुष्काळात अन्य ठिकाणी मालाचे शॉर्टेज असल्याने दर चांगला मिळाला. किमान दर 11 रु., तर कमाल दर 22 रुपये मिळाला. तीन एकरांत सहा लाख साठ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. खर्च वाया जाता साडेपाच लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळाला. एकरी नफा सुमारे एक लाख 83 हजार रुपये मिळाला. उन्हाळ्यात काकडीला अधिक मागणी असते हे हेरूनच घेतलेले काकडीचे पीक गुंजाळ यांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरले. शेतात तोडणी होत होती तशी लगेच बाजारात विक्री होत राहिली. लग्न व अन्य समारंभातील जेवणावळीसाठी थेट गुंजाळ यांच्या शेतातूनच अनेकांनी काकडीची खरेदी केली. 

सव्वादोन कोटी लिटरचे शेततळे उन्हाळ्यात पाणीटंचाईशी तोंड द्यावे लागत असताना पिके पाण्यावाचून वाया जातात, हा गुंजाळ यांचा अनुभव असल्याने त्यांनी सव्वा एकरावर सव्वादोन कोटी लिटर क्षमतेचे शेततळे बांधले आहे, त्यासाठी 16 लाख 76 हजार रुपयांचा खर्च केला. पावसाळ्यात विहिरीतून सलग दीड महिन्यात विद्युतपंपातून पाणी सोडून शेततळे भरून घेतले. त्याच पाण्याचा यंदाच्या उन्हाळ्यात वापर करून काकडीसह डाळिंब, संत्रा अशी फळबाग जगवली. दोन विहिरी व तीन बोअरही त्यांच्याकडे आहेत, त्याचेही काही पाणी उपयोगी ठरले. 

तेवीस एकर फळबागेला ठिबक सिंचन गुंजाळ यांच्याकडे असलेल्या तेवीस एकर डाळिंब, संत्र्याच्या फळबागेला ठिबक सिंचन केले आहे. त्यांच्याकडील शेततळ्यातून फळबागेला ठिबकच्या माध्यमातून दिवसाला किती लिटर पाणी लागेल याचा आराखडाच तयार केलेला आहे. त्याच नियोजनातून ते पिकांना पाणी देतात. त्यांचे बंधू राजू गुंजाळ हे देखील त्यांच्या निर्णयानुसार नियोजन करतात. 

परिसरातील शेणखताची खरेदी शेणखताचा वापर केला तर शेतीमालाची गुणवत्ता सुधारते, त्याला मागणीही राहते. याची कल्पना असल्याने शेणखताचा वापर करण्यावर गुंजाळ भर देतात. आपल्याकडे एवढ्या प्रमाणात शेणखत उपलब्ध नसल्याने दैठणे गुंजाळ, हिवरेबाजार व परिसरातील गावात कोणी शेणखत विक्री करत आहे का, याचा शोध घेत ते खरेदी करतात. 

ऍग्रोवन वाचून घेतो माझ्या घरी दररोज ऍग्रोवन येतो. मी स्वतः निरक्षर आहे; मात्र आदर्श शेती, शेतकऱ्यांच्या यशकथा "ऍग्रोवन'मधून दररोज प्रसिद्ध होतात. मला वाचता येत नसले तरी त्यातील यशकथांची तसेच फळबागांविषयीची माहिती माझ्या मुलांकडून माहीत करून घेतो. ऍग्रोवनमधील मार्गदर्शन उपयुक्त ठरले आहे. 
- सुभाष गुंजाळ 

गुंजाळ यांचा शेतकऱ्यांना सल्ला - पाणीबचतीतून, कमी पाण्यावर चांगले 
उत्पादन व उत्पन्न मिळेल अशा नियोजनावर भर हवा. 
- पावसाळ्यात पाण्याची साठवण करण्यावर भर द्यावा. 
- ठिबकचा वापर करत पाणीबचतीचे सूत्र स्वीकारावेच लागेल. 
- दोन तास विद्युत मोटार चालली तर ठिबकवर दोन एकर डाळिंब, 
पाच एकर सीताफळ, तीन एकर संत्रा, दहा एकर आंबा जगू शकतो. 


संपर्क - सुभाष गुंजाळ - 9422187617 
दैठणे गुंजाळ (ता. नगर) 

वर्षभर काकडीची शेती

वर्षभर काकडीची शेती नाशिक तालुक्‍यातील वंजारवाडी हे सिन्नर व त्र्यंबकेश्‍वर तालुक्‍याच्या सीमेलगत असलेलं गाव काकडीसह अन्य भाजीपाल्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथील निवृत्ती व रामनाथ हे शिंदे बंधू मागील 13 वर्षांपासून काकडीचे नियमित व एक-दोन एकरांवर उत्पादन घेतात. दारणा नदीवरील नांदगाव धरणाच्या पाण्याचा शेतीसाठी उपयोग होतो. उन्हाळी लागवड 15 फेब्रुवारीला सुरू होते. सुमारे 40 दिवसांनंतर उत्पादन सुरू होते. दरम्यान, त्याचवेळी दुसऱ्या जागेत दुसरी लागवड झालेली असते. 15 फेब्रुवारी, 15 मार्च, 15 एप्रिल, 15 मे अशी दर महिन्याच्या अंतराने लागवड होते. पावसाळ्यात जुलै आणि ऑगस्टमध्ये लागवड होते. प्रत्येक पीक एक ते दीड महिना चालते. प्रतिपिकाचे सरासरी 20 तोडे होतात. पावसाळ्यात प्रतितोड्यातून सरासरी 100 क्रेट माल मिळतो. उन्हाळ्यात हेच उत्पादन निम्म्याने कमी होते. अशा पद्धतीने वर्षातील 7 ते 8 महिने शिंदे बंधूंच्या काकडीची आवक नाशिक बाजार समितीत नियमित सुरू राहते. मागील वर्षभर त्यांना प्रतिक्रेटला (प्रति 20 किलोचा) 150 ते 450 रुपये सरासरी 225 रु. मिळाला. 

काकडीउत्पादकांचे अनुभव 1) रामनाथ म्हणाले की, योग्य पद्धतीने लागवड, अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी नियोजन, डाऊनी, भुरी यांसारख्या रोगांपासून; तर अळी, पांढरी माशी या किडींपासून पीक संरक्षण या बाबी सर्वांत महत्त्वाच्या आहेत. लागवड साडेचार बाय दीड फूट अंतरावर असते. या आधीच ठिबक सिंचन लावून घेतो. त्यावर मल्चिंग पेपर अंथरतो. त्या अगोदर शेणखत, डीएपी, 10:26:26 या खतांचा बेसल डोस देतो. लागवडीच्या 10 दिवसांनी ठिबकद्वारे विद्राव्य खते देतो. काटेकोर व्यवस्थापनातून काकडीची वर्षातून सहा पिके घेतली जातात. त्यातून चांगले आर्थिक उत्पन्न मिळते. 
रामनाथ शिंदे-9922625753) 
वंजारवाडी 


2) मखमलाबाद (ता. जि. नाशिक) येथील राजेंद्र तिडके पाच वर्षांपासून नियमित हे पीक घेतात. दोन एकरांवर वाफा पद्धतीने लागवड असते. ठिबक सिंचन, मल्चिंग पेपरचा वापर आवर्जून होतो. मल्चिंग पेपरमुळे निंदणीचा खर्च कमी होतो. कीड आटोक्‍यात येते, पाण्याचीही बचत होते असे ते म्हणतात. एकरी 500 ते 700 क्रेटपर्यंत उत्पादन त्यांना मिळते. मागील वर्षभर त्यांच्या काकडीला नाशिक बाजार समितीत क्रेटला 150 ते 350 रु., तर सरासरी 250 रुपये दर मिळाला. 
राजेंद्र तिडके-9850054095 
मखमलाबाद 


पॉलिहाऊसमध्ये घेतली काकडी दिंडोरी तालुक्‍यातील जानोरी येथील रुपेश वाघ यांनी 25 गुंठे हरितगृहात गुलाब पिकानंतर काकडीचा प्रयोग केला आहे. एक जानेवारीला उत्पादन सुरू झाले. महिनाभरात 25 गुंठ्यांतून 500 क्रेटचे (प्रति 20 किलोचा) उत्पादन निघाले. थंडीच्या काळात आवक 60 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत घटलेली असते. या काळात मागणी वाढलेली असते. त्याचा फायदा रुपेश यांना झाला. त्यांना प्रतिक्रेटला 300 ते 400 व सरासरी 350 रु. दर मिळाला. अजून उत्पादन सुरू आहे. अजून 500 क्रेट उत्पादन निघेल, असा रुपेश यांचा अंदाज आहे. 
रुपेश वाघ- 7030615514 

""मध्यम आकाराचे हिरव्या रंगाचे वाण शेतकरी आणि व्यापाऱ्यांत लोकप्रिय आहे. या पाठोपाठ "चायना' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिरवट लांबट आकाराच्या काकडीलाही चांगली मागणी होते. नाशिक बाजार समितीतील 15 आडत कंपन्यांतून 200 व्यापारी काकडीची खरेदी करतात. हा माल पुढे पुणे, मुंबईबरोबरच गुजरात, मध्य प्रदेश, दिल्ली, कर्नाटक येथील बाजारपेठेत पाठवला जातो. 
शांताराम धात्रक 
आडतदार, नाशिक बाजार समिती 

नाशिक जिल्हा भाजीपाला उत्पादनात अग्रेसर असून, राज्यात भाजीपाल्याची सर्वाधिक उलाढाल नाशिक बाजार समितीत होते. भाजीपाला व्यवहारात शेतकऱ्यांची कोणतीही फसवणूक होणार नाही याची बाजार समितीकडून काळजी घेतली जाते. शेतकरी, खरेदीदारांनाही जास्तीत जास्त मुलभूत सुविधा पुरवण्यावर आम्ही भर दिला आहे. 
अरुण काळे-9881174646) 
सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, नाशिक 

नाशिक बाजार समितीतील काकडीची आवक, वर्षः 2014, 
दर- प्रतिक्विंटलचे 

महिना--- आवक (एकूण क्रेट)----किमान दर---कमाल दर---सरासरी दर जानेवारी---3750---- 1725---2400-----2000 
मार्च------2674--- 750---1750---1450 
मे------48281------1075---1700----1250 
जून---26892------1575---3125----2525 
सप्टेंबर----32603----500----1000----700 
ऑक्‍टोबर---42160----1275----2850---1750 
डिसेंबर----6107----2500---3500---3000