Friday, May 17, 2013

शेततळ्याने दिला आधार

सुनील यांच्या दुष्काळी भागातील शेतीला शेततळ्याने आधार दिला. 2002 मध्ये बांधलेल्या शेततळ्याला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. नऊ वर्षांत एकदाही या तळ्याचा कागद बदलला नाही, की तळ्याची कोणतीही दुरुस्ती केली नाही. शेततळे का अयशस्वी होते याचा अगोदर अभ्यास करून सुनील यांनी जाणीवपूर्वक वेगळ्या पद्धतीने आयताकृती तळे बनविले. 83 मीटर लांब, 30 मीटर रुंद आणि नऊ मीटर खोल या आकाराच्या तळ्याची सहा लाख 34 हजार लिटर पाणी साठवणुकीची क्षमता आहे. तळ्याची रचना करताना त्याचा उतार तिरपा न करता सरळ उभा केल्यामुळे सूर्यप्रकाशाच्या तीव्रतेपासून कागदाचा बचाव झाला आहे. शेततळ्याच्या चारही बाजूने जनावरे, लहान मुले तळ्यात उतरणार नाहीत यासाठी सहा फूट उंच संरक्षित जाळी उभारली असून, या जाळीच्या तळाशी तीन फूट उंच जाड पत्रा बसविलेला आहे. यामुळे उंदीर, खेकडे यांच्यापासून तळ्याचा बचाव होतो. सुरवातीला खेकड्याने तळ्यातील महागडा कागद फाडून खराब केला होता, त्या अनुभवातून हा प्रयोग केल्याचे सुनील सांगतात. तळ्याच्या भोवतालची जागा, तळ्यात उतरण्यासाठी मजबूत शिडी, या बाबी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. कागदाला धक्काही न लावता जलपरी पंप पाण्यात काम करतो. पंपाच्या तळाशी असलेला बॉल स्वच्छ करण्यासाठी तळ्यात जावे लागत नाही. जमिनीपासून पाण्यात सोडलेला एलडीपीई कागद स्थिर राहावा म्हणून सिमेंटचे रॉड त्यावर तारेच्या साह्याने बांधले आहेत. 

2004 या वर्षी इचलकरंजी (जि. कोल्हापूर) येथील कृषी प्रदर्शनात सुनील यांनी स्वतः तयार केलेल्या शेततळ्याचा "डेमो' मांडला होता, त्यात दुष्काळी परिस्थितीत बागेला पाणी कसे पुरवता येईल, याबाबतची मांडणी करण्यात आली होती. या प्रयोगाचे शेतकरी व तज्ज्ञांकडून विशेष कौतुक झाले. 

शेततळ्यातून मत्स्यपालनही! 
तळ्यात गेल्या सात ते आठ वर्षांपासून मत्स्यपालनही केले जाते. कटला, रोहू, मृगळ, कार्प (कोंबडा) या जातींचे बीज जुलै - ऑगस्ट महिन्यात टाकले जाते. फेब्रुवारीमध्ये पाणी कमी पडते. तोपर्यंत माशांपासून साधारण पाच हजार रुपये उत्पन्न मिळते. त्यातून शेतीसाठीच्या वीजबिलाचा प्रश्‍न कमी होण्यास मदत होते. बीजांसाठी 450 रुपये खर्च येतो. तळ्यातील शेवाळ हे माशांचे खाद्य असते. याशिवाय आठवड्यात एकदा एक पाटी शेण, दोन किलो तांदळाचा कोंडा, पाच किलो मुरमुरे हे खाद्यही दिले जाते. तळ्यात माशांच्या वाढीसाठी जागा (स्पेस) कमी मिळत असल्याने प्रत्येक मासा 250 ग्रॅम वजनापेक्षा अधिक शक्‍यतो होत नाही. या वर्षापासून मत्स्यपालनात काहीसा बदल करून तळ्यात शहरातील फिश टॅंकमध्ये वापरल्या जाणाऱ्या शोभिवंत रंगीत माशांची पैदास करण्याचे सुनील यांनी ठरविले आहे. त्यासाठी युरोपातील लुथुनिया या देशात मत्स्यपालनात संशोधन करणाऱ्या पंकज कापसे या भाच्याची त्यांना मदत होते. तळ्याच्या काठावर पाइपातून तळ्यातील पाणी तुषार पद्धतीने पुन्हा तळ्यातच पडेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. यातून सातत्याने पाणी पडत असल्याने तळ्यातील माशांना अधिक ऑक्‍सिजन पुरवला जातो, त्याबरोबरच शेत परिसरात आल्हाददायक गारवा निर्माण होत असल्याचे जाणवते. 

सुनील शिंदे यांच्या शेतीचे अर्थशास्त्र 
पीक कर्जाबाबत कधीही थकीत न राहता नियमित व्यवहार केल्याबद्दल 2007 मध्ये सुनील आणि त्यांची आई अंजनाबाई यांचा बॅंक ऑफ महाराष्ट्र यांच्याकडून विशेष सत्कार करण्यात आला. शेततळ्यासाठी घेतलेले सव्वा लाखाचे कर्ज मुदतीच्या आत फेडले. दरवर्षी डाळिंब बागेतून किमान एक लाख रुपये निव्वळ नफा मिळत असल्याचे ते सांगतात. उत्पादन खर्च आटोक्‍यात असल्याने त्याचा विशेष लाभ होतो. 

उत्पादनात सातत्याने वाढ - एक दृष्टिक्षेप 

वर्ष --- उत्पादन (20 किलोचे क्रेट) * मिळालेला दर = उत्पन्न (रुपये) 
2007 --- 200 700 = 1,40,000 
2008 ---- 200 800 = 1,60,000 
2009 ------ 250 900 = 2,25,000 
2010 ----- 300 1000 = 3,00,000 
2011 ----- 250 1100 = 2,75,000 
(या वर्षी पाणीटंचाई अधिक असल्याने एकूण 150 क्रेट मालाचे क्रॅकिंग होऊन पूर्ण नुकसान झाले.) 
------- 
डाळिंब उत्पादनातील नियमित खर्च (रुपये) 
शेणखत -- 10,000 
विद्राव्य खते व कीडनाशके --- 22,000 
मजुरी ---- 12,000

No comments:

Post a Comment