Tuesday, February 17, 2015

१२ गुंठ्यांत वर्षभर पालक

खाद्या पिकाचे योग्य नियोजन केले तर अवघ्या काही गुंठे क्षेत्र असलेल्या शेतीतूनही प्रगतीचा मार्ग कसा सुकर होतो, याचा आदर्श अकोला जिल्ह्यातील चांदूर (खडकी) गावच्या मुरलीधर निलखन आणि त्यांच्या कुटुंबाने घालून दिला आहे. बारा गुंठे क्षेत्रातील पालक भाजीपाला पिकात वर्षभर सातत्य ठेवल्याच्या परिणामीच ही किमया साधता आल्याची प्रामाणिक कबुली ते देतात. विनोद इंगोले 
अकोला महानगरापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरील चांदूर गाव हे मोर्णा नदीच्या काठावर वसलेले असल्याने गावात पाण्याचे स्रोत भक्‍कम आहेत. विहीर, बोअरवेल यासारख्या पर्यायांचा वापर करीत गावातील शेतकऱ्यांनी शेतीचा वारसा जपला आहे. 

निलखन कुटुंबीयांची शेती सिंचन सुविधांच्या बळावर समृद्धीच्या वाटेवर असलेल्या चांदूर गावातील बहुतांश शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीऐवजी फुले व भाजीपाला शेतीकडे वळले आहेत. याच गावचे मुरलीधर निलखन त्यापैकीच एक. बारमाही भाजीपाला म्हणून पालक घेण्यावर त्यांचा भर राहतो. त्यांची जेमतेम बारा गुंठे जमीन धारणा. त्यांचे वडील सूर्यभान कधीकाळी गहू, खरीप ज्वारी यासारखी पिके घेत; परंतु बारा गुंठ्यांतून मिळणाऱ्या उत्पादनातून कुटुंबात पत्नी, पाच मुली, दोन मुलांसह असलेल्या संसारात उदरनिर्वाह कसाबसा शक्‍य होत होता. मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी पैशांची सोय सूर्यभान यांना पत्नीसह मजुरीला जाऊन मिळणाऱ्या उत्पन्नातून करावी लागे. 

बदलाचे निमित्त.. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात काही वर्षांपूर्वी झालेल्या शेतकरी मेळाव्यात सूर्यभान यांना भाजीपाला पिकातून होणाऱ्या प्रगतीविषयी माहिती मिळाली. त्यानंतर पारंपरिक पिकांऐवजी भाजीपाला पिकाकडे वळताना त्यांनी पालकाची निवड केली. त्याची शेती चांगली केली. उत्पन्न कमावले. त्यामुळे त्यांच्या दोन मुलांनीही या पिकात सातत्य ठेवले. विशेष म्हणजे सूर्यभान निलखन यांनी सायकलने अकोल्यात पालकाचे मार्केटिंग रोज केले. 

निलखन यांच्या पालक लागवडीचा पॅटर्न - एकूण शेती सुमारे 12 गुंठे, त्यातच पालक घेतला जातो. 
- बारा गुंठ्यांचे प्रत्येकी चार गुंठे याप्रमाणे तीन भाग केले आहेत. 
- प्रत्येक भागातील लागवडीत सुमारे आठ ते दहा दिवसांचे अंतर 
- त्यामुळे एका प्लॉटमधील काढणी संपते, त्या वेळी दुसऱ्या प्लॉटमध्ये उत्पादन सुरू असते व ते विकण्यास उपलब्ध होत असते. 
- अशा रीतीने वर्षभर हे चक्र सुरू राहते. 

लागवड पद्धत - पालकाची लागवड वाफे पद्धतीने केली जाते. उन्हाळ्यात नागमोडी पद्धतीचे वाफे असतात. 
शेणखत - वर्षातून 12 गुंठ्याला चार ट्रॉली शेणखत जमिनीत मिसळले जाते. घरी जनावरे नसल्याने शेणखत 2500 रुपये प्रति ट्रॉलीप्रमाणे विकत घेतले जाते. शेणखताच्या वापरावर अधिक भर असल्याने रासायनिक खतांचा वापर शक्‍यतो कमी केला जातो. पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास कीडनाशकाची फवारणी करावी लागते. 

उत्पादन कसे असते? - सुमारे चार गुंठ्यांचा प्लॉट 
- एक महिना पिकाचा कालावधी 
- प्रति महिना 500 ते 600 किलो पालक मिळतो. 
- उन्हाळा व हिवाळ्यात उत्पादन चांगले, तर पावसाळ्यात खराब होत असल्याने 300 किलोपर्यंतही खाली येते. 

बाजारपेठ - - अकोला बाजारपेठ सुमारे आठ किलोमीटर अंतरावर आहे. प्लॅस्टिक गोणपाटाचे भारे तयार करून त्यातून पालकाची वाहतूक केली जाते. 
- हंगामनिहाय प्रति किलो सरासरी पाच रुपयांपासून ते वीस रुपयांपर्यंतचा दर मिळतो. 
- वर्षभर होत असलेल्या आवकेनुसार दरात चढ-उतार राहतात. सध्या पालकाला किलोला 40 रुपये दर सुरू असल्याचे मुरलीधर म्हणाले. 
- महिन्याला सुमारे नऊ हजार ते कमाल 12 हजार, 15 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळते. 
- मुख्य खर्चामध्ये बियाणे चार गुंठ्याला दोन किलो लागते. किलोला 120 रुपये या दराने ते घेतले जाते. 
- बाकी मुख्य खर्च खतांवर होतो. दररोज 20 ते 25 रुपये रिक्षा वाहतुकीला दिले जातात. 
-- वर्षाला बारा गुंठे क्षेत्रात वर्षभर पीक सुरू ठेवून एक ते सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. 

मार्केट मुरलीधर म्हणाले, की उन्हाळ्यातील मे ते जुलै या काळात, तसेच पावसाळ्याच्या सुरवातीला पालकाला दर चांगले मिळतात. पावसाला सुरवात झाल्याने जादा पावसाच्या परिणामी पालक सडण्याचे प्रमाण वाढते, त्यामुळे तो खराब होतो, परिणामी त्याचे दरही वधारतात. अकोला भाजी बाजारात व्यापाऱ्यांमध्ये निलखन कुटुंबाच्या पालकाने दर्जेदार अशी ओळख निर्माण केली आहे. 

आर्थिक स्थैर्याकडे नेणारे पीक पालक हेच पीक निलखन कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याचे कारण ठरले आहे. यातून मुरलीधर निलखन यांना आपल्या पाच बहिणींचे लग्न चांगल्या प्रकारे करणे शक्‍य झाले. मुरलीधर यांच्यासह त्यांचा भावाचा विवाह देखील याच पीक पद्धतीतून आलेल्या उत्पन्नातून होऊ शकला. हलाखीच्या परिस्थितीत मातीच्या घरात राहणारे हे कुटुंब आज टुमदार बंगलावजा घरात स्थलांतरित झाले आहे. गाठीशी पैसा जुळू लागल्याने सुमारे 50 गुंठे क्षेत्र त्यांनी खरेदी केले आहे. विदर्भातील शेतकऱ्यांनीही या कुटुंबाप्रमाणे आपल्या शेतीचे नियोजन व गुणवत्तेत सातत्य ठेवले, तर त्यांच्या प्रगतीचे दालन नक्कीच खुले होऊ शकते. 

शेतीत राबते संपूर्ण कुटुंब पालकाच्या शेतीत संपूर्ण कुटुंब राबते. विशेषतः पालकाची काढणी घरचे सर्व सदस्य करतात. काढणीपासून ते त्याची स्वच्छता, हाताळणी, वाहतूक अशा प्रत्येक टप्प्यावर घरच्यांकडून योग्य दक्षता घेत असल्यानेच 
पालकाची गुणवत्ता टिकवणे शक्‍य होते, असे मुरलीधर म्हणाले. आई पार्वताबाई, बंधू किशोर आदी सर्वांची मदत मोलाची ठरते. मजुरीवर होणारा खर्च कुटुंबाने कमी केला आहे. 

निलखन यांच्या शेती नियोजनातील वैशिष्ट्ये - 1) दरवर्षी शेणखताचा वापर, त्यामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत. 
2) पालक पिवळसर दिसत असल्यास, जमिनीत नत्राची कमतरता असल्याचे लक्षात आल्यास थोड्या प्रमाणात युरिया खताचा वापर. 
3) मजुरांऐवजी कुटुंबीयांद्वारे पालकाची काढणी प्रतवारी करून केली जाते. 
4) पालक पिकाला पाण्याची चांगली गरज असते. उन्हाळ्यात एक दिवसाआड, तर हिवाळ्यात तीन ते पाच दिवसांआड पाटाने पाणी दिले जाते. 

संपर्क 
निलखन 
9850597031

No comments:

Post a Comment