Tuesday, November 12, 2013

दुष्काळानंतर फुललेल्या ढोबळीने दिला दिलासा

पीक पद्धतीत बदल म्हणून वाखरी (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) येथील धनंजय बागल या तरुणाने ढोबळी मिरची पिकासाठी रासायनिक खते कमी करून जैविक खतांचा अधिकाधिक वापर करून मिरचीचे यशस्वी उत्पन्न घेतले आहे. दुष्काळातील पाणीटंचाईचे महत्त्व ओळखून त्याने ठिबक सिंचनाचा वापर केला आहे. त्याने शेतीमध्ये राबवलेल्या वेळवगेळ्या प्रयोगांमुळे कमी पाण्यात, कमी क्षेत्रात अधिक उत्पादन घेतले आहे. भारत नागणे 
संतांचे माहेर घर अशी वाखरी परिसराची (जि. सोलापूर) वारकरी संप्रदायामध्ये ओळख आहे. "कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी' असे वर्णन संत सावता माळी यांनी आपल्या अभंग रचनेतून करून शेती आणि विठ्ठल भक्तीचे अतूट नाते सांगितले आहे. आषाढी वारीचे शेवटचे रिंगण वाखरी येथेच होते. आपल्या घरातही वारकरी परंपरा जोपासणाऱ्या धनंजय बागल यांची वाखरी येथे पंढरपूर-सातारा रस्त्यालगत सुमारे 15 एकर शेती आहे. नियमित उसाचे पीक घेत आलेल्या धनंजय यांनी या वेळी पीक पध्दतीत बदल करून सुमारे पावणेदोन एकर क्षेत्रावर ढोबळी मिरची घेतली आहे. 

दुष्काळातून घेतला बोध गेल्या दोन वर्षांपासून वाखरी परिसराला अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागला, त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची पिके पाण्याअभावी जळून गेली. बागल यांचा सुमारे 12 एकरांवरील ऊसही वाळून गेला, त्यामुळे एवढ्या क्षेत्रावर त्यांना काही लाख रुपयांचे आर्थिक नुकसान सोसावे लागले. काही क्षेत्रावरील उसाची चाऱ्यासाठी विक्री केली. चालू वर्षी मात्र समाधानकारक पाऊस झाला. विहिरी व विंधन विहिरींची पाणीपातळी काही प्रमाणात वाढली, तरीही दुष्काळी परिस्थितीपासून धडा घेतलेल्या धनंजय यांनी ठिबक सिंचन व पॉली मल्चिंगचा वापर करून यंदाच्या ऑगस्टमध्ये संकरित ढोबळी मिरचीचे पीक घेण्याचे निश्‍चित केले. 

धनजंय यांचा समविचारी शेतकरी गट असून, एकत्रितपणे विचार-विनिमय करून अनेक निर्णय घेतले जातात. ढोबळीचा निर्णय त्यातूनच पुढे आला. 
पारंपरिक शेती न करता वेगळ्या पद्धतीने शेती करण्याचा विचार धनंजय यांच्या मनात आला खरा; पण त्यांच्या वडिलांनी या पीक पद्धतीत बदल करण्यास विरोध केला. मात्र अन्य शेतकरी करीत असलेले पीक पद्धतीतील बदल व त्याचे फायदे समजावून दिल्यानंतर वडिलांचे मन वळवण्यात धनंजय यशस्वी झाले. 

लागवडीचे नियोजन लागवडीपूर्वी ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने उभी-आडवी नांगरट केली. त्यानंतर दोन वेळा फणपाळी करून घेतली. एकरी वीस गाड्या शेणखत सर्वत्र पसरून घेतले. त्यानंतर पॉवर टिलरच्या साहाय्याने प्रत्येकी सहा फूट अंतरावर दीड इंच उंचीचे गादीवाफे (बेड ) तयार केले. जोराच्या वाऱ्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून प्लॉटच्या चारही बाजूने हिरव्या नेटचा वापर केला. 

धनंजय यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी शेडनेटमध्ये हे पीक घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पुरेसा अनुभव नसल्याने व काही तांत्रिक बाबी अनुकूल न ठरल्याने या पिकातून नफा झालाच नाही, केवळ खर्च बाहेर पडला. यंदाचा प्रयोग मात्र खुल्या शेतात केला. 

मिरचीचे दर्जेदार उत्पादन मिळावे, यासाठी रासायनिक खतांच्या वापराला जैविक, सेंद्रिय खतांचीही जोड दिली, त्यामुळेच पुढे मिरचीला इतर शेतकऱ्यांच्या तुलनेत एक ते दोन रुपये जादा दर मिळणे शक्‍य झाले. 

कीड व रोग प्रतिबंधात्मक उपाय- ढोबळी मिरचीतून चांगल्या उत्पादनाची आशा असली तरी पिकावर येणाऱ्या विविध कीड रोगांचा बंदोबस्तही योग्य वेळी करावा लागतो. प्रामुख्याने मररोग, विषाणूजन्य रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो. बागल केवळ रासायनिक बुरशीनाशकांच्या फवारण्या करून थांबले नाहीत, तर विषाणूजन्य रोगांचा प्रसार करणाऱ्या रसशोषक किडींना रोखण्यासाठी पिकाच्या सभोवताली नेटचा कल्पकतेने वापर केला. 

ढोबळी ठरली फायदेशीर सुमारे एक ऑक्‍टोबरच्या सुमारास पहिला तोडा केला. पीक जोमदार आल्यामुळे मिरचीचे वजनही सुमारे 150 ते 200 ग्रॅमपर्यंत मिळणे शक्‍य झाले. रसरसीत आणि तजेलदार मिरची असल्याने राजस्थानातील व्यापाऱ्यांनी 25 रुपये किलो दराने जागेवर मिरचीची खरेदी केली. आठ ऑक्‍टोबरच्या सुमारास केलेल्या दुसऱ्या तोड्यास तीन टन माल निघाला. तिसरा तोडा 16 ऑक्‍टोबरच्या दरम्यान करून त्यातून मिळालेल्या मालाची प्रतिकिलो 25 रुपये दराने विक्री केली. चौथ्या तोड्याला प्रति किलो 24 रुपये दर मिळाला. आत्तापर्यंत एकूण क्षेत्रातून सुमारे 25 टन उत्पादन मिळाले आहे. यातून आतापर्यंत साडेचार लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मिरचीला 20 रुपयांहून अधिक दर मिळाला असला तरी सद्य:स्थितीत मात्र हा दर 18 रुपयांवर आला आहे. 

पावणेदोन एकर क्षेत्रासाठी चार ट्रेलर शेणखतासाठी 25 हजार रुपये खर्च करावे लागले. मशागतीच्या कामासाठी 20 हजार रुपये खर्च झाला. मल्चिंग पेपरचे 10 बंडल वापरण्यात आले. 2200 रुपये प्रतिबंडल प्रमाणे त्याला 22 हजार रुपये खर्च करावे लागले. 1 रुपये 60 पैसे प्रमाणे 24 हजार रोपे खरेदी केली. रासायनिक खतांसाठी 15 हजार रुपये द्यावे लागले. प्रति तोडणीसाठी 3 हजार रुपये मजुरी द्यावी लागते. ठिबक संचासाठी 25 हजार रुपये गुंतवावे लागले आहेत. याशिवाय रसायने व अन्य असा आत्तापर्यंत एकूण क्षेत्रासाठी सुमारे दोन ते सव्वादोन लाख रुपये खर्च झाला आहे. 

शेडनेटमधील ढोबळीतून न मिळालेला फायदा, दोन वर्षे दुष्काळात उसातून झालेले नुकसान या पार्श्‍वभूमीवर यंदाच्या ढोबळीतून मात्र धनंजय यांना दिलासा मिळाला आहे. शेतीतील उत्साह त्यांचा वाढला आहे. 

ठळक बाबी - मिरचीच्या झाडांत कळ्यांची संख्या वाढावी यासाठी परागीभवन वाढावे यासाठी मिरची पिकाच्या बाजूने झेंडूची लागवड केली आहे. झेंडूमुळे मधमाश्‍या येण्याचे प्रमाण वाढते. साहजिकच परागीकरणाची प्रक्रिया चांगल्या प्रकारे होते. त्यातून उत्पादनात वाढ होण्यास मदत होते. 
- धनंजय यांनी आडसाली एक एकर उसातील क्षेत्रातही आंतरपीक म्हणून ढोबळी मिरचीचा प्रयोग केला आहे. त्यातील मिरचीचे उत्पादनही सुरू झाले आहे. पंढरपूर येथील स्थानिक बाजार पेठेत त्याला 25 रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. 

- ऍग्रोवन ठरला मार्गदर्शक राज्यातील विविध भागांतील शेतकऱ्यांचे प्रयोग पाहण्याची आवड धनंजय यांनी जोपासली आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून दैनिक ऍग्रोवनचे नियमित वाचन सुरू असल्याने शेतीत वेगवेगळे प्रयोग करण्याची प्रेरणा धनंजय यांना मिळाली. पाण्याचा समंजसपणे वापर कसा करावा, कोणती खते कशी व कोणत्या वेळी द्यावीत याचीही दिशा ऍग्रोवनमधून मिळाली. शेतकऱ्यांच्या यशोगाथा वाचून प्रोत्साहन मिळाले असे त्यांनी सांगितले. 

संपर्क - धनंजय बागल - 9561262773 
रा. वाखरी, ता. पंढरपूर

No comments:

Post a Comment