Tuesday, November 12, 2013

उच्चशिक्षित तरुणाने केली फ्लॉवर शेती फायदेशीर

उच्चशिक्षित तरुणाने काही काळ नोकरीची प्रतीक्षा केली. मात्र अपेक्षित यश मिळाले नाही म्हणून निराश न होता त्याने वडिलोपार्जीत शेतीतच प्रगती करण्याचे ठरवले. सुमारे 40 वर्षांहून अधिक काळ घेत असलेल्या फ्लॉवरची शेती सुरेश यांनी अभ्यासातून व काटेकोर व्यवस्थापनातून फायदेशीर केली आहे. प्रदीप अजमेरा 
बीएसी, पुढे एमए (इंग्रजी) व बीएडपर्यंत शिक्षण पूर्ण करून सुरेश काळे यांनी शिक्षकी पेशाच्या नोकरीची प्रतीक्षा केली. मात्र अपेक्षित यश काही मिळाले नाही. अखेर त्यांनी पूर्ण वेळ वडिलोपार्जीत शेतीतच उतरण्याचे ठरवले. लहानपणापासूनच वडिलांसोबत बाजारपेठेत जाणे, तिथले वातावरण, उलाढाल सुरेश यांनी प्रत्यक्ष अनुभवली होती. आज हेच शेतीचे संस्कार घेऊन त्यांची पुढील वाटचाल सुरू आहे. सन 1984-85 पासून वडील करीत असलेली फ्लॉवरची शेती सुरेश यांनी आजही कायम ठेवीत ती यशस्वी केली आहे. 

जायकवाडी कालव्याला लागून व डांबरी सडकेला खेटूनच सुरेश यांची शेती आहे. त्यांची सुमारे 14 एकर शेती असून, त्यातील सहा एकर शेतीतील उत्पन्नातून घेतली आहे. आई, वडील, दोन भाऊ व बहीण असा सुरेश यांचा परिवार आहे. वडील पूर्ण वेळ शेतीकडेच लक्ष देतात. मोठा भाऊ ट्रॅक्‍टरचे काम तर सुरेश शेतीचे व्यवस्थापन व विशेष करून मार्केटिंग पाहतात. 

एकूण क्षेत्रापैकी आठ एकर कापूस, साडेचार एकर मोसंबी व मोसंबीच्या नव्या दोन एकर बागेत आंतरपीक म्हणून फ्लॉवर आहे. मोसंबीचे उत्पादन सुरू होण्यासाठी कालावधी असल्याने आंतरपिकाचा खटाटोप केला आहे. 
दोन एकरांवर ऊस आहे. 

फ्लॉवर शेतीत ठेवले सातत्य गोलटगावचे केशवराव साळुंके हे सुरेश यांचे मामा. त्यांचा आग्रह व प्रोत्साहनातून काळे यांच्याकडे फ्लॉवर पिकू लागला. गेल्या अनेक वर्षांपासून या पिकात सातत्य राखत आल्याने त्यातील अनेक बारकावे अवगत झाल्याचे सुरेश सांगतात. मात्र एकाच भागात सतत हे पीक न घेता प्रत्येक वेळी जमिनीची फेरपालट केली जाते. जमीन भारीची व काळी असून सततच्या मशागतीमुळे व चांगल्या खत व्यवस्थापनामुळे जमिनीचा पोत चांगला राखला आहे. कमी कालावधीत फ्लॉवरपासून नगदी उत्पन्न मिळत असल्याने त्याचा फायदा अन्य पिकांच्या व्यवस्थापनासाठी होतो. 

फ्लॉवरची लागवड - दर वर्षी किमान दोन एकर क्षेत्र या पिकाचे असते; परंतु या वर्षी एकूण 60 गुंठ्यांत म्हणजे प्रत्येकी तीस गुंठ्यांत व 28 दिवसांच्या अंतराने अशी दोन टप्प्यांत लागवड केली आहे. पहिल्या टप्प्याचे रोप लागवडीसाठी तयार झाले, की दुसऱ्या टप्प्याच्या फ्लॉवरचे बियाणे टाकण्यात आले. 

यंदाचा प्रातिनिधीक अनुभव असा सांगता येईल. सर्वप्रथम 3 x 8 फूट आकाराचे गादीवाफे तयार करून घेतले. त्यात प्रत्येकी दोन घमेले चांगले कुजलेले शेणखत व तीन किलो डीएपी खत टाकले. बियाण्यास बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केली. 

रोपाची पुनर्लागवड - फ्लॉवर रोपांची लागवड मोसंबीच्या 17 बाय 17 फूट लागवडीच्या नव्या बागेत आंतरपीक म्हणून केली आहे. बागेतील दोन ओळीत 2.5 x 1.5 फूट अंतरावर फ्लॉवर रोपाची पुनर्लागवड केली, त्या वेळी रोपांची मुळे प्रथम बुरशीनाशक द्रावणात व त्यानंतर शेण-गोमूत्र काल्यात बुडवून घेतली. पहिल्या टप्प्यातील 30 गुंठे लागवड जूनच्या शेवटच्या आठवड्यात तर दुसऱ्या टप्प्यातील 30 गुंठे लागवड ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात केली. 

पीकसंरक्षण - भाजीपाला पिकाला वेळेवर पाणी देणे तेवढेच महत्त्वाचे असते. या वर्षी ऑगस्ट वगळता वेळोवेळी पाऊस पडत राहिला. फक्त ऑगस्ट मध्येच दोन संरक्षित पाणी द्यावे लागले. सततचा पाऊसही फ्लॉवरला चालत नाही व पाण्याच्या दोन पाळ्यांमधील अंतरही जास्त चालत नाही. जास्त पावसात फ्लॉवर सडण्यास सुरवात होते, तसेच किडींचाही प्रादुर्भाव जास्त होतो. लागवडीच्या सुरवातीपासूनच या वर्षी वातावरण ढगाळ होते, त्यामुळे दर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने कीटकनाशकांच्या फवारण्या केल्या. अळी पानाच्या मागील बाजूस जास्त प्रमाणात असते, त्यामुळे ती लवकर दिसत नाही; पण पानावर चट्टे पडलेले दिसले की अळीचा प्रादुर्भाव आहे हे इतक्‍या वर्षांच्या अनुभवावरून लक्षात आले. 

उत्पादन व विक्री - आत्तापर्यंत फ्लॉवरची एकूण क्षेत्रातून सुमारे 700 पोती एवढी विक्री झाली आहे. प्रति पोत्यात सुमारे 15 ते 17 किलो माल बसतो. सुरवातीला दर 300 ते 500 रुपये प्रति पोते याप्रमाणे मिळाला. 
कमाल दर पाचशे ते साडेपाचशे रुपयांपर्यंत पोचला होता. सरासरी दर 400 ते 450 रुपयांपर्यंत राहिला. 
वडीगोद्रीच्या आसपास अंबड, पाचोड, विहामांडवा, रोहीलागड, जामखेड हे प्रमुख व मोठे बाजार भरतात. तेथील किरकोळ व्यापाऱ्यांना फ्लॉवरची विक्री केली जाते. काही ठराविक व्यापारी तर बाजाराच्या एक दिवस अगोदरच मालाची आगाऊ नोंदणी करतात. त्यांच्या मागणीप्रमाणे माल काढला जातो. 

चांगल्या अनुभवातून मिळते यश सुरेश म्हणतात, की पावसाळी व हिवाळी अशा दोन हंगामांत आम्ही हे पीक घेतो. पावसाळी हंगामात एकरी 450 पोत्यांपर्यंत माल मिळतो. अर्थात या हंगामातील वाण हे पुनर्लागवडीनंतर 60 ते 70 दिवसांत पक्व होणारे असतात. प्रतिगड्ड्याचे वजन 700 ग्रॅम ते एक किलोपर्यंतही भरते. हिवाळी हंगामातील वाण मात्र 85 ते 95 दिवसांत पक्व होणारे असल्याने पावसाळी हंगामापेक्षा उत्पादनाही दुुपट्टीपर्यंत मिळते. गड्ड्याचे वजन कमाल तीन ते चार किलोपर्यंत भरते. हिवाळी हंगामातील फ्लॉवरला पावसाळी हंगामाच्या तुलनेत दर मात्र कमी मिळतात. प्रत्येक हंगामात अडचणींचे स्वरूप वेगळे असते. किडी-रोगांचा प्रादुर्भाव ही समस्या पावसाळ्यात महत्त्वाची असते, त्यामुळे या पिकात चांगला अनुभव झाला, तर हे पीक नक्कीच यशस्वी करता येते असे सुरेश म्हणाले. 

काळे यांच्या शेतीतील ठळक बाबी 1) सन 2009-10 मध्ये "नॅशनल हॉर्टीकल्चर बोर्ड'द्वारे सुमारे 16 लाखांचा प्रकल्प मंजूर झाला आहे. त्याअंतर्गत विहीर, पाइपलाइन, ठिबक, ट्रॅक्‍टर व ट्रॅक्‍टरचलित औजारे खरेदी केली. मोसंबीचीही लागवड केली. 

2) लहान व मोठी मिळून एकूण 25 शेळ्या आहेत. दर वर्षी एका शेळीपासून किमान दोन करडे मिळतात. केवळ नरांचीच विक्री करण्यात येते. प्रति नग चार ते साडेहजार रुपयांना विकला जातो. लेंडीखतही मोठ्या प्रमाणात मिळते. त्याचा उपयोग शेतीत केला जातो. 

शेतातच बांधला टुमदार बंगला - गावापासून सुमारे पाच किलोमीटरवर शेती असून पूर्ण वेळ शेतीतच लक्ष देता यावे यासाठी तेथेच राहण्याचा निर्णय घेतला. शेतातच टुमदार बंगला बांधला आहे. 
सामाजिक कार्याची आवड व बोलणे लाघवी असल्याने कृषी विभागाशी, बॅंकांशी सुरेश यांचे चांगले संबंध जुळले आहेत. कृषी विभागाचे मंडल कृषी अधिकारी माणिक जाधव, कृषी पर्यवेक्षक रमेश चांडगे, कृषी सहायक कृष्णा गटटूवार यांचे मार्गदर्शन त्यांना होते. ऍग्रोवनमधील यशोगाथा आणि तांत्रिक माहितीचा शेतीकामांत खूप फायदा होतो. शेतकऱ्यांचा सखा असलेल्या "ऍग्रोवन'चे धन्यवाद द्यावेत तेवढे कमीच पडतात असे ते म्हणतात. 

सुरेश यांच्याकडून शिकण्यासारखे बरेच काही -- बाजारपेठेचा अभ्यास प्रथम करूनच शेतीतील पीक नियोजन. 
- शेतीला शेळीपालनाची जोड. 
- सेंद्रिय तसेच कंपोस्ट खतावर जास्त भर. 
- 100 टक्के ठिबक. 
- कृषी विभागाशी सतत संपर्क तसेच कृषीविषयक माहिती मिळेल तेथून संकलित करण्याची आवड. 
- काटेकोर शेती करण्यावर भर 

संपर्क - सुरेश काळे- 9822719255 
वडीगोद्री, ता. अंबड, जि. जालना

No comments:

Post a Comment