Tuesday, November 12, 2013

दुष्काळाशी दोन हात केले काकडीसह फ्लॉवर यशस्वी केले -

जालना जिल्ह्यात अल्पभूधारक शेतकऱ्याचा प्रयोग शेतीत सकारात्मक दृष्टिकोन ठेवला जालना जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले, तसेच भूजल पातळी खोलवर गेल्याने विविध पिकांचे नियोजन करणेही अशक्‍य झाले; मात्र तीर्थपुरी (ता. घनसावंगी) येथील युवा शेतकरी विठ्ठल देविदास रगड यांचे उदाहरण वेगळे आहे. जिद्द, नियोजनाच्या जोरावर कमी क्षेत्रात आलटून पालटून फ्लॉवर, काकडी यासारखी भाजीपाला पिके घेऊन उत्पन्न मिळवीत शेतीतील सकारात्मकता त्यांनी कायम ठेवली आहे. तुकाराम शिंदे 
रगड यांची आर्थिक परिस्थिती जेमतेम आहे. विद्युत मोटार दुरुस्तीचा व्यवसाय ते गेल्या बारा वर्षांपासून करतात. मात्र, व्यवसाय सांभाळताना आपल्या शेतीकडे त्यांनी जराही दुर्लक्ष केलेले नाही. शेतीकामे व शेतीमाल विक्रीत त्यांना वडील देविदास, आई वत्सलाबाई व पत्नी सौ. प्रियंका यांची मदत होते. सारे कुटुंब शेतात राबत असल्याने मजुरांवरील अवलंबित्व व खर्च कमी केला आहे. 

मेहनतीच्या जोरावर विठ्ठल यांनी सत्तावन्न गुंठे जमीन खरेदी केली. यातील सुमारे 37 गुंठ्यांत मोसंबी, तर उर्वरित वीस गुंठे क्षेत्रात शेवगा आणि कपाशीचे पीक आहे. शेतीत नेहमी विविध प्रयोग करण्यात ते आघाडीवर असतात. मागील वर्षी मे महिन्यात त्यांनी पन्नास गुंठे क्षेत्र करार पद्धतीने कसण्यास घेतले आहे. या क्षेत्रात आतापर्यंत काकडी, फ्लॉवर, मुळा, कारले अशी विविध पिके त्यांनी घेतली. 

फ्लॉवर पिकाने दुष्काळातही उभारी दिली यंदाचा त्यांचा फ्लॉवरचा प्रयोग दुष्काळी पार्श्‍वभूमीवर प्रेरणादायक आहे. कराराने घेतलेल्या क्षेत्रात फ्लॉवर पीक घेण्याचे निश्‍चित केले होते. लागवडीपूर्वी पाण्याचे नियोजन महत्त्वाचे ठरले. यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात चार बोअरवेल घेण्यात आले होते. त्यांचे एकूण पंधरा हजार लिटर संरक्षित पाणी उपलब्ध झाले. मात्र, ते काटेकोर पुरवणे गरजेचे होते. लागवडीदरम्यान जून महिना असल्याने पाऊस पडेल या आशेने सुरवातीला अधिक क्षेत्र न वापरता वीस गुंठ्यांतच फ्लॉवर घेतला. प्रत्येकी चार फूट अंतराचे बेड तयार करून एक बाय एक फूट अंतरावर बेडच्या दोन्ही बाजूने लागवड करण्यात आली. त्यानंतर पाण्याची परिस्थिती पाहून सुमारे वीस ते बावीस दिवसांच्या फरकाने बेड पद्धतीने अन्य वीस गुंठ्यांतही फ्लॉवरची लागवड केली. आतापर्यंत या परिसरात प्रथमच बेडवर हे पीक घेतले आहे. 

नियोजन ठरले फायदेशीर पहिल्या 20 गुंठ्यांतील कोबीबाबत सांगायचे तर बोअरवेलमधील पाणी हौदात साठवून ते ठिबक सिंचनाद्वारे एक दिवसाआड पिकाला देण्यात आले. जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून पावसास सुरवात झाल्याने पाणीपाळ्या कमी झाल्या. एकूण बारा पाणीपाळ्या झाल्या. रासायनिक खतांचा वापर जमिनीतून करण्याबरोबरच ठिबक सिंचनाद्वारेही करण्यात आला. ह्यूमिक ऍसिडचाही वापर झाला. अळीच्या नियंत्रणासाठी क्‍लोरपायरिफॉससारख्या कीटकनाशकाचा वापर करण्यात आला. लागवडीनंतर दर पंधरा दिवसांच्या फरकाने एकूण तीन खुरपणी करण्यात आल्या, त्यामुळे तणांचे प्रमाण कमी करता आले. 

फ्लॉवरचे उत्पादन व ताळेबंद पहिले 20 गुंठे क्षेत्र - उत्पादन - 23 क्विंटल - सुमारे 90 कट्टे 
एकूण उत्पन्न - सुमारे 70 हजार रु. 
खर्च - 16 हजार रु. 
नफा - 

नंतरचे 20 गुंठे - उत्पादन - 165 कट्टे (प्रति कट्टा सुमारे 25 किलो) 
एकूण उत्पन्न - 79 हजार रु. 
खर्च - 20 हजार 700 रु. 
नफा - 

गेवराई, तीर्थपुरी, परतूर, पाथ्री- मानवत, घनसावंगी, कुं. पिंपळगाव आदी बाजारपेठांमध्ये कोबीची विक्री केली. 
प्रति कट्टा दर विविध बाजारपेठांत 500, 750 ते 850 रुपयांपर्यंत मिळाले. 
जूनमधील लागवड केलेल्या कोबीला प्रति कट्टा 350 ते 550 रुपये तर कमाल रेट एक हजार रुपयांपर्यंत मिळाला. 
त्यानंतर लागवडीतील कोबीला प्रति कट्टा दर 500 रुपये मिळाला. 

आता पहिल्या कोबी प्लॉटच्या जागी मिरचीची लागवड केली आहे, त्याची काढणी पंधरा दिवसांतच सुरू होणार आहे. 

दहा गुंठे काकडीने सांभाळले गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेती अडचणीत आली. पावसाने पूर्ण पाठ फिरवली होती, त्यामुळे आर्थिक परिस्थिती नाजूक झाली. पाणी उपलब्ध नसल्याने बोअरवेलमधीलच अल्प पाण्याचे नियोजन केले. दहा गुंठ्यांत काकडीचे नियोजन केले. दहा फूट अंतराचे बेड तयार करून पॉलिमल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला, त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन कमी करता आले. काकडीचे एकूण तीनशे पंधरा गोणी (प्रति गोणी 35 ते 37 किलो) उत्पादन मिळाले. आवक कमी असल्याने व रमझान सणाचा कालावधी असल्याने दर समाधानकारक राहिले. 170 गोण्यांच्या विक्रीपर्यंत प्रति गोणी 350 रुपयांपासून ते 375 रुपयांपर्यंत दर मिळाले, त्यानंतर उर्वरित गोण्यांसाठी 150 ते 175 रुपयांपर्यंत दर मिळाले. एकूण उत्पन्न सत्तर हजार रुपयांपर्यंत मिळाले. खर्च 6,700 रुपये आला. 

रगड यांच्याकडून शिकण्यासारखे - - करार पद्धतीची शेती करून उत्पन्नाला जोड दिली 
- उपलब्ध अल्प प्रमाणात पाण्याचे नियोजन, सर्व पिकांना ठिबक सिंचन 
- थोड्या- थोड्या क्षेत्रात विविध भाजीपाला घेत उत्पन्नाची भर 
- गेल्या दोन वर्षांपासून काकडी व कोबीची लागवड मे- जून काळात, त्यामुळे दर चांगला मिळतो. 
- काकडी, टोमॅटोला पॉलिमल्चिंग 

दुष्काळात हार मानली नाही रगड यांनी पाण्यासाठी एकूण सतरा बोअरवेल घेतले, त्यापैकी चार बोअरवेलना अल्प पाणी लागले. त्याचा उपयोग फ्लॉवर, काकडीसाठी केला. यासाठी एकूण खर्च सुमारे दोन लाख रुपये झाला. 

विठ्ठल यांचा दिवस पहाटे चार ते पाच वाजता सुरू होतो. शेतीची कामे करून ते विद्युत मोटार दुरुस्ती व्यवसायाकडे लक्ष देतात. शेतीतील मशागत, फवारणी, खते देणे आदी कामे ते स्वतः करत असल्याने मजुरांची बचत करणे त्यांना शक्‍य झाले आहे. 

शेती परवडत नाही हे विधान खरे नाही. पूर्णवेळ शेतीला दिला, अन्य कोठेही फुकट वेळ घालवला नाही, तर शेती नक्कीच फायदेशीर करता येते. कोणत्या मालाला कोणत्या काळात दर चांगला दर मिळतो याचा अभ्यास करून लागवडीचे नियोजन केल्यास नुकसानीची जोखीम कमी करता येते. 
"ऍग्रोवन' दररोज न चुकता वाचतो. शेतीतील नवे तंत्रज्ञान त्यामुळेच समजते, त्याचा वापर करता येतो. 
कोणत्या शेतकऱ्याने कोणता प्रयोग कसा यशस्वी केला ते त्यावरून समजते. अंकाची किंमत वाढली असली तरी अंकातील माहितीची उपयुक्तता जास्त असल्याने तीन रुपये किमतीचे काही वाटत नाही. 

संपर्क - विठ्ठल रगड - 9423729943

No comments:

Post a Comment