Tuesday, November 12, 2013

गटशेतीतून तरुणाईने आणली ढोबळी मिरची फायद्यात

सांगली जिल्ह्यातील समडोळी येथील सुमारे 50 युवा शेतकरी एकत्रितपणे ढोबळी मिरचीची गटशेती करतात. रोपवाटिका ते विक्रीपर्यंतचे व्यवस्थापन सामूहिकपणे करून त्यांनी खर्चात बचत साधली आहे व त्यातून अर्थकारण सुधारले आहे. तंत्रज्ञान देवाणघेवाणही सोपी होऊन ही शेती आधुनिक झाली आहे. श्‍यामराव गावडे 
वाढती महागाई, पर्यायाने वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेती समूहाने केली तर ही समस्या कमी करता येईल, हा विचार सर्वत्र चांगला रुजू लागला आहे. त्यामुळे राज्यात विविध ठिकाणी गटशेतीची उदाहरणे पाहण्यास मिळतात. सांगली जिल्ह्यातील समडोळी (ता. मिरज) येथे असेच उदाहरण पाहण्यास मिळते. गावातील सुमारे 45 ते 50 युवा शेतकरी एकत्र येऊन सुधारित तंत्रज्ञान वापरून ढोबळी मिरचीची शेती करू लागले आहेत. 

पेठ- सांगली रस्त्यावर सांगलीजवळ समडोळीचे शिवार लागते. वारणेच्या पाण्याने समृद्ध झालेला हा पट्टा पूर्वीपासून उसाबरोबर भाजीपाल्यासाठी प्रसिद्ध आहे. सांगली, मिरज ही शहरे जवळ असल्याने मार्केटच्या दृष्टीने येथील शेतकऱ्यांचा पूर्वीपासून भाजीपाला शेतीकडे व त्यातही ढोबळी मिरचीकडे कल आहे. त्यामध्ये सतत सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करीत गेल्याने शेतीचे नियोजन अधिक परिपक्व होत गेले. 

पारंपरिक मिरची शेतीचा ट्रेंड बदलला समडोळी गावात ढोबळी मिरची पिकाचे नेतृत्व आता युवा शेतकऱ्यांकडे आले आहे असे म्हटल्यास हरकत नाही. बियाणे खरेदीपासून रोपे तयार करणे, पुनर्लागवडीपासून ते काढणी व ते अगदी बाजारपेठेत माल पाठविण्यापर्यंत हे शेतकरी सामूहिक नियोजन करतात. पूर्वी पाटपाणी, पारंपरिक पद्धतीने लागवड व्हायची. मिरचीवरील प्रभावी पीक संरक्षणाविषयीही शेतकऱ्यांना सविस्तर माहिती नव्हती. चांगला माल पिकला तरी एकाच मार्केटला त्याची आवक होत असल्याने व्यापारी मालाचे दर पाडत. परिणामी हाती काहीच लागत नव्हते. अनेक जण निसर्गावर हवाला ठेवूनच शेती करीत होते. 

सुशिक्षित तरुणाई शेतीकडे जुन्या, अनुभवी शेतकऱ्यांची सध्याची पिढी सुशिक्षित आहे. मात्र वाढत्या बेरोजगारीमुळे नोकरी मिळण्यास अडचणी येत होत्या. शेतातीलच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून यात प्रगती करण्याकडे अनेकांनी वाटचाल सुरू केली. चर्चासत्रे, गटाच्या माध्यमातून ते फायदेशीर शेतीचा मार्ग शोधू लागले. शेतीत होत असलेले नवे प्रयोग त्यांच्या बघण्यात आले. व्यापारी पद्धतीचा दृष्टिकोन ठेवून शेती केल्यास आपणही यशस्वी होऊ असा विश्‍वास त्यांना वाटू लागला. 

चिट्टे- पाटील संघाची स्थापना एकत्र आलेल्या तरुणाईने व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेती करताना विक्रीची अडचण येऊ नये यासाठी भाजीपाला संघाची स्थापना केली. चिट्टे- पाटील या नावाने हा गट कार्यरत आहे. 

गटशेतीची सुरवात रोपवाटिकेपासून गटातील सदस्य सुमारे 30 ते 40 वयोगटातील आहेत. त्यांनी एकत्रित शेती करताना मिरचीचे उत्पादन व्यवस्थापन, विक्री याचा बारकाईने अभ्यास केला. रोपांच्या खरेदीत बरीच रक्कम खर्च होत होती. त्यावर पर्याय म्हणून 10 गुंठ्यांत किरण पाटील यांच्याकडे शेडनेट उभारले. त्यामध्ये एकत्रित पद्धतीने मिरचीचे तरू टाकले जाते. त्यासाठी एकरी सुमारे 14 हजार रुपये लागतात. या रोपवाटिकेतील व्यवस्थापक खर्च वजा जाता एकरी सात ते आठ हजार रुपयांची बचत होते. उर्वरित काळासाठी हे शेडनेट पाटील स्वतःच्या शेतीसाठी वापरतात. एकत्र तरू टाकण्याचा मोठा फायदा म्हणजे रोपे खात्रीशीर मिळतात. रोपांच्या वाढीसाठी संतुलित खतांची मात्रा आपल्या देखरेखीखाली देता येते. रोपांच्या भेसळीचे व मरतुकीचे प्रमाण कमी असते. 

सुधारित मिरची लागवडीने हे बदल साधले. 1) गटाद्वारेच रोपवाटिका तयार करून रोपांची लागवड 
2) सर्व मिरची उत्पादकांकडे ठिबक सिंचन. 
3) बेसल खतांसोबत विद्राव्य खतांचा वापरही चांगल्या प्रकारे 
4) पॉलिमल्चिंग पेपरचा सर्रास वापर. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहतो. तणांचा प्रादुर्भाव कमी. 
5) पाच बाय दीड फूट अंतरावर झिगझॅग पद्धतीने लागवड 
6) माती परीक्षणाद्वारे खतांचे व्यवस्थापन 
7) एकत्रित शेतीमुळे पिकांवरील रोग-विकृती आदींचे निदान, उपाय, सुधारित तंत्र आदींची देवाणघेवाण 
8) उत्पादन-एकरी सुमारे 30 टन, काही परिस्थितीत त्याहून अधिक. उत्पादन खर्च- एकरी एक लाख रुपयांपर्यंत. 
9) मिरचीचा बेवड ठरतो फायदेशीर- 
साडेतीन ते चार महिन्यांच्या पिकासाठी दमदार बेसल डोस, विद्राव्य खतांचा वापर होतो. मिरचीचा हंगाम संपल्यानंतर झाडे रोटावेटरद्वारे जमिनीत गाडली जातात. त्याचा फायदा त्यानंतर घेण्यात येणाऱ्या ऊस पिकासाठी फायदेशीर ठरतो. उसाचे चांगल्या प्रकारे उत्पादन घेणारे शेतकरी या गावात आहेत. 

पॅकिंगसाठी गोडाऊनची उभारणी गावात उत्पादित माल बॉक्‍समध्ये पॅकिंग करून विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवला जातो. बॉक्‍स भरताना चिखल मातीने खराब होऊ नयेत त्यासाठी गोडाऊनची निर्मिती केली आहे. विक्रीसाठी नेण्यात येणारा माल इथे एकत्र केला जातो. नंतर त्याची प्रतवारी करून 30 किलो व 20 किलो (बाजारपेठेच्या मागणीप्रमाणे) पॅकिंग तयार केले जाते. या पद्धतीमुळे गटातील सदस्यांची मोठी सोय झाली आहे. 

विविध बाजारपेठा मिळवल्या ढोबळी मिरचीची मुंबई, पुणे, हैदराबाद आदी ठिकाणी मालाची विक्री केली जाते. सर्वांचा लागवड एकाच हंगामात होत असल्याने मालही एकाचवेळी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतो. त्याची थेट गावातून वाहतूक होत असल्यामुळे वाहतुकीसाठीची फरपट थांबली आहे. 

एकाच मार्केटमध्ये माल विक्रीसाठी नेला जात नाही. तर हैदराबाद, मुंबई, पुणे आदी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सकाळी संपर्क साधून दर विचारला जातो. जेथे दर चांगला असेल तेथे तो पाठवला जातो. त्यामुळे दर पाडून माल मागण्याची मध्यस्थांची मानसिकता संपुष्टात आली व शेतकऱ्यांना चांगला दर मिळू लागला. ढोबळीला सरासरी दर किलोला 15 ते 20 रुपये मिळतो. काही वेळा तो 40 ते 45 रुपयांवर जातो. मागील महिन्यात मुंबई मार्केटला तो 70 रुपये मिळाला. हैदराबादचे मार्केट दराबाबत मुंबईच्या तुलनेत थोडे स्थिर असते, असे किरण पाटील म्हणतात. 

बांधपोच खत योजनेचा लाभ कृषी विभागाच्या बांधावर पोच खत योजनेचा येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात फायदा घेतला आहे. एकत्रित खत खरेदी केल्याने प्रत्येक पोत्यामागे शंभर ते दीडशे रुपयांची बचत झाली आहे. खतांसाठी होणारी वणवण थांबली. एकत्रितपणे माल उतरून घेतला जातो. आपापल्या नोंदीप्रमाणे शेतकरी तो तेथून नेतात. 

खंडाची शेती समडोळीत जमिनी खंडानेही घेतल्या जातात. चार महिन्यांसाठी 20 हजार रुपयांचा खंड जमीन मालकाला दिला जातो. अशा प्रमाणे अनेक जणांनी शेती करून त्याचा फायदा घेतला आहे. 

काय म्हणतात शेतकरी? आमचा गट एका कुटुंबाप्रमाणेच काम करतो. नेहमीच्या अडचणी एकमेकांच्या मदतीने दूर करतो. अन्य पिकांमधून मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा ढोबळी मिरची पीक आम्हाला फायदा देऊन जाते. प्रत्येकाचे या पिकाखाली सरासरी क्षेत्र दोन ते तीन एकर असते. आमच्या सदस्यांपैकी एकाची सात ते आठ एकर ढोबळी असून त्यातून त्याने छान बंगला बांधला आहे. "ऍग्रोवन'चे आम्ही नियमित वाचक आहोत. त्यात प्रसिद्ध होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक प्रयोगांना आम्ही भेटी देऊन त्यांचा उपयोग करून घेतला. 

किरण पाटील, 9011059108 
अध्यक्ष, चिट्टे- पाटील भाजीपाला संघ 

बीई इलेक्‍ट्रॉनिक्‍सची पदवी घेऊन मी शेती करण्यास सुरवात केली. वडिलोपार्जित 15 एकर शेतीत मिरची, ऊस, शाळू, गहू अशी पिके घेतो. गटशेतीमुळे तरुणाईत शेती करण्याचा उत्साह दुणावला आहे. विविध पातळ्यांवर पैशांची बचत होत असल्याने चांगला फायदा होतो. 
संजय पाटील, समडोळी

No comments:

Post a Comment