Tuesday, November 12, 2013

करार शेतीतील बटाट्याचा दुष्काळात आधार

खटाव तालुक्‍यातील रुद्राप्पा माळी यांनी चांगल्या उत्पादनात ठेवले सातत्यसातारा जिल्ह्यात खटाव हा कायम दुष्काळी तालुका. मात्र येथील वांझोळी गावातील युवा शेतकरी रुद्राप्पा महादेव माळी यांना करार शेतीतील बटाटा पिकाने आर्थिक प्रगतीचा मार्ग दाखवला आहे. लागवडीचे व्यवस्थापन सुधारित, प्रतिकूलतेतही पुढे जाण्याची जिद्द, धडपड त्यांना यशाच्या मार्गावर घेऊन गेली आहे. विकास जाधव 
सातारा जिल्ह्यात खटाव या दुष्काळी तालुक्‍यात सुमारे आठशे लोकसंख्येचे वांझोळी गाव. येथील रुद्राप्पा माळी हे युवा शेतकरी. विज्ञान शाखेतून ते बारावी उत्तीर्ण झाले. मात्र आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने पुढील शिक्षण घेण्यावर मर्यादा आल्या. कुटुंबांत थोरले असल्याने त्यांच्यावर दोन भावांची, तसेच आई-वडील यांची जबाबदारी होती. त्यामुळे वडिलांबरोबर त्यांनी शेतीच सुरू केली. सुमारे 28 एकर क्षेत्र असले तरी पाणी नसल्यामुळे सर्व शेती केली जात नव्हती. वांगी, कारले यांसारखा भाजीपाला घेतला. मात्र आर्थिक गरज पूर्ण होत नव्हती. पाण्यासाठी खूप प्रयत्न केले जात होते. दरवर्षी येणाऱ्या उत्पन्नानातून बोअर घेणे हा एकमेव उपक्रम सुरू होता. तरीही पाणी लागत नव्हते. सध्या शेतात 12 बोअर वेल व दोन विहिरी असून त्यातील अवघ्या दोन बोअरवेल व दोन्ही विहिरींना जेमतेम पाणी आहे. 

पाण्याची सोय झाली अन्‌... वांझोळी हे गाव पाणीटंचाईग्रस्त होते. मात्र 2008-09 पासून धरणाचे पाणी मिळू लागले. कॅनॉल शेताजवळून गेल्याने पाझरलेले पाणी मिळू लागले. रुद्राप्पा यांच्या शेतीस खऱ्या अर्थाने सुरवात झाली. रुद्राप्पा सुमारे सात ते आठ वर्षांपासून खरिपात बटाटा करीत. पाणी उपलब्ध झाले. दरम्यान गावात बटाटा चिप्स निर्मितीतील एका कंपनीने शेतकऱ्यांशी करार पद्धतीने शेती करण्यास सुरवात केली होती. रुद्राप्पादेखील या करार शेतीत उतरले. या शेतीत दर आधीच निश्‍चित केला जात असल्यामुळे दराची जोखीम कमी झाली. 

रुद्राप्पा यांची बटाटा शेती-दृष्टिक्षेपात बटाटा व्यवस्थापन - 
-2012 चा प्रातिनिधिक प्रयोग सांगायचा तर करार पद्धतीने सुमारे 11 एकर क्षेत्रात बटाटा लागवडीचे नियोजन केले. मे 2012 मध्ये जमिनीची मशागत केली. 15 जूनपासून दोन फुटांवर सरी सोडून त्यावर एक फुटावर बटाट्याच्या दोन फोडी करून बीजप्रक्रिया करून लागवड केली. लागवडीवेळी एकरी युरिया 50 किलो, डीएपी 150 किलो, पोटॅश 50 किलो, निंबोळी पेंड 50 किलो, सूक्ष्म अन्नद्रव्यांत झिंक, फेरस व मॅग्नेशिअम यांचा बेसल डोस दिला. सर्व क्षेत्रावर ठिबक सिंचन होतेच. आवश्‍यकतेनुसार कीडनाशकांच्या फवारण्या दिल्या. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात काढणी केली. 

पाणी व्यवस्थापन बटाट्याच्या सर्व क्षेत्रास ठिबक सिंचन करण्यात आले आहे. लागवडीनंतर एकरी एक तास किंवा एक दिवसा आड या पद्धतीने दोन तास पाणी दिले जाते. लागवडीनंतर एक महिन्यानंतर एकरी दोन तास पाणी दिले जाते. जमिनीच्या प्रतवारीनुसार पाणी कमी- जास्त केले जाते. मुरमाड जमिनीत चार तासांपर्यंतही पाणी दिले जाते. 

पीक संरक्षणातील महत्त्वाचे लागवडीपासून दीड महिन्याच्या दरम्यान करपा येण्याची शक्‍यता असते. तो येण्याआधी बुरशीनाशक फवारणीचे नियोजन आवश्‍यक राहते. सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे बटाटा पोकळ पडण्याची शक्‍यता असते. बटाट्याचा आकार चांगला व भरीव होण्यासाठी खतांचे चांगले व्यवस्थापन केले जाते. ठिबक सिंचनाद्वारे खते दिली जातात. 

उत्पादन - -पूर्वीच्या दोन एकरांवरून चार, सहा, अकरा एकरांवरून आता 14 एकरांपर्यंत बटाटा क्षेत्र 
-गेल्या चार ते पाच वर्षांतील उत्पादकता- एकरी आठ ते साडेआठ टन 
-सन 2009- चार एकरात- एकरी 10 टनांप्रमाणे चाळीस टनांपर्यंत उत्पादन 
-सन 2012- एकरी साडेआठ टन उत्पादन 

व्यवस्थापनातील महत्त्वाच्या बाबी -लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया केल्याने उगवण चांगली होते. 
-सर्व क्षेत्रात पाणी ठिबक सिंचनाद्वारे दिले जाते. 
-जमीन सातत्याने वाफशावर ठेवली जाते. 
-मजूरटंचाईमुळे भांगलणीपेक्षा तणनाशकाच्या फवारण्या देऊन तण नियंत्रणात आणले जाते. 
-करार पद्धतीने शेती असल्यामुळे दरनिश्‍चिती आहे. 
-प्रत्येक वर्षी चांगल्या व्यवस्थापनामुळे बोनस दर मिळतो. 
-वेळापत्रकानुसार निविष्ठांच्या फवारण्या दिल्या जातात. 

अर्थशास्त्र बटाट्यास एकरी आठ क्विंटल बियाणे लागते. प्रति क्विंटल 2,300 रुपयांप्रमाणे 18 हजार रुपये, मशागतीस चार हजार, मजुरी आठ हजार, रासायनिक खते नऊ हजार, कीडनाशके आठ हजार रुपये असा एकूण एकरी 42 हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. 

करार पद्धतीत दर आधीच ठरलेले असतात. हे दर असे असतात. 
-2011- 10 रुपये 30 पैसे प्रति किलो 
-पुढील लागवड हंगामावेळी 50 पैसे ते एक रुपया उत्तेजनार्थ म्हणजे बोनस स्वरूपात दिला जातो. 
-2012- 11 रुपये 20 पैसे 

रुद्राप्पा बटाट्याची शेती करार पद्धतीने करतात. लागवडीपूर्वी दर ठरवला जात असल्यामुळे दर कमी-जास्त होण्याचा धोका यात कमी होतो. दर्जेदार उत्पादन घेण्यावर भर अधिक प्रमाणात देता येतो. बटाटा काढणीनंतर लगेच करार केलेल्या कंपनीकडून माल उचलला जातो. त्या कंपनीकडून बिल रक्कम खात्यावर जमा केली जाते. 

कुटुंबाची मदत अधिक क्षेत्रावरील शेतीचा भार सांभाळायचा असेल तर कुटुंबाची मदत असणे आवश्‍यक आहे. शेतीत आई-वडिलांचे मार्गदर्शन रुद्राप्पा यांना मोलाचे ठरते. मच्छिंद्र व दत्तात्रय हे दोन भाऊ, तसेच पत्नी व भावजय यांची मोठी मदत त्यांना शेतीत होते. वेळोवेळी कृषी सहायक अर्जुन भोसले यांचे मार्गदर्शन होते. 

आर्थिक क्षमता सुधारली योग्य पीक व्यवस्थापनाला कष्ट व सातत्याची जोड देत बटाट्यातून चांगले उत्पादन व उत्पन्न मिळू लागले. आर्थिक परिस्थिती सुधारत गेली. आता रुद्राप्पा यांनी तीन एकर शेतजमीन खरेदी केली असून, एकूण 31 एकर शेतजमीन झाली आहे. यात बटाट्याचे यंदा 14 एकर, डाळिंबाचे तीन एकर व सात ते आठ एकर उसाचे क्षेत्र आहे. बोअरवेल व दोन विहिरींवरून पाइपलाइन केली आहे. 

पाणी उपलब्ध झाल्यापासून बटाटा घेण्यास सुरवात केली. करार शेतीतून चांगले उत्पादन व उत्पन्न मिळू लागले. या पिकाने कुटुंबास खरा आर्थिक आधार दिला. यामुळे हे पीक कायम घेणार आहे. 
रुद्राप्पा माळी 

संपर्क - रुद्राप्पा माळी, 9763916101 

बटाटा लागवडीवेळी 22 ते 25 अंश, पीकवाढीच्या सुरवातीच्या 45 दिवसांच्या काळात 20 ते 22 अंश, कंद व त्याच्या वाढीच्या काळात (लागवडीपासून 45 ते 60 दिवसांचा काळ) 17 ते 20 अंश व 60 ते 90 दिवसांच्या काळात 20 ते 25 अंश तापमान आवश्‍यक असते. 
आर्द्रता - पीकवाढीच्या अवस्थेत 65 ते 80 टक्के हवी. 
सूर्यप्रकाशाचे तास- 10 तास प्रति दिवस हवेत. 

डॉ. संतोष मोरे, 7588955501 
कनिष्ठ शास्त्रज्ञ, 
अखिल भारतीय बटाटा समन्वित प्रकल्प, 
फळ संशोधन केंद्र, गणेशखिंड, पुणे

No comments:

Post a Comment