Tuesday, November 12, 2013

निकमांनी पिकवलं उसाचं एक नंबरी बेणं

सांगली जिल्ह्यातील शेणे (ता. वाळवा) येथील धनाजी निकम यांनी ऊस शेतीची पारंपरिक पद्धत बाजूला ठेवून सुधारित लागवड तंत्रज्ञानाची कास धरली आहे. त्यामध्ये त्यांनी यांत्रिकीकरणाला प्राधान्य दिले आहे. ऊस शेती परवडत नाही असे म्हणणाऱ्या शेतकऱ्यांसाठी त्यांची शेती आदर्श ठरावी. आपल्या उसाची बेणे म्हणून ते विक्री करतात. त्यातून समाधानकारक उत्पन्नाची आशा त्यांनी निर्माण केली आहे.

पुणे - बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कासेगावपासून पश्‍चिमेला दोन किलोमीटर अंतरावर शेणे परिसरात निकम यांची दोन ठिकाणी विभागून 32 एकर शेती आहे. त्यातील बहुतांश जमीन खडकाळ व चढ-उताराची होती. पुणे - बंगळूर महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम आठ-दहा वर्षांपूर्वी सुरू होते. त्या रस्त्याला भरावासाठी खडकाळ जमिनीतील मुरूम दिला. त्या बदल्यात रस्ताविस्तारीकरण करताना ज्यांच्या जमिनी गेल्या त्यातील सुपीक माती रस्त्यासाठी काढली जात होती. ती माती मुरुमाच्या बदल्यात घेऊन मुरूम नेलेल्या खडकाळ जमिनीत चार ते पाच फुटाचा थर देऊन अंथरली. त्या ठिकाणी सिंचनाची सोय केली. सध्या या जमिनीतून चांगले उत्पादन घेण्याचा प्रयत्न निकम यांनी केला आहे.

ऊस बियाणे विक्रीतून मिळवला फायदा
निकम आडसाली व पूर्वहंगामी ऊस लागवडीचे नियोजन करतात. त्यांचे को 86032 या जातीच्या उसाचे शेत व उसाची गुणवत्ता पाहून परिसरातील अनेकजण बेणे म्हणून त्याची मागणी करू लागले. ऊस कारखान्याला देण्यापेक्षा बेणे म्हणून वजनावर त्याची विक्री करण्याचे निकम यांनी ठरवले. त्याप्रमाणे मागील वर्षी एक एकर क्षेत्रात त्यांनी ऊस घेतला. त्याचे वाढ्यासह 155 टन वजन भरले. साडेतीन हजार रुपये प्रति टन या दराने बेणेविक्री केली. सुमारे दहा महिन्यांमध्ये पाच लाख 42 हजार रुपयांचे उत्पन्न त्यांना मिळाले. खर्च 1,19,000 रुपये वजा जाता चार लाख 23 हजार रुपयांचे निव्वळ उत्पन्न त्यांना मिळाले.

उसाची सुधारित लागवड पद्धत
निकम यांनी पट्टा पद्धतीच्या लागवडीवर भर दिला आहे. सुरवातीला सहा फूट, त्यानंतर आठ फूट या पद्धतीने लागवड केली. या पद्धतीमुळे भांगलण सुलभ होते. बऱ्याच वेळा छोट्या ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने आंतरमशागत चांगल्या प्रकारे करता येते. निकम यांचा "ग्रीन हार्वेस्ट" खत पेरून देण्यावर भर असतो. पट्टा पद्धत असूनही निकम कोणते आंतरपीक घेत नाहीत याचे कारण म्हणजे मजूरटंचाई. येत्या काळात इस्राईल तंत्रज्ञानावर आधारित रोबो विकत घेण्याचे त्यांचे नियोजन आहे. आपल्या गरजेनुसार रोबोची निवड ते करणार आहेत.

सबसरफेस ठिबक आणि यांत्रिकीकरण
उसाला पाणी देण्यासाठी ठिबक पद्धतीचा वापर होत असताना सबसरफेस ही नवी पद्धत पुढे आली आहे. निकम यांनी संपूर्ण शेतावर सबसरफेस योजना राबवली आहे. यांत्रिकीकरणाला प्राधान्य देणाऱ्या निकम यांच्याकडे सुमारे 50 लाख रुपयांची शेती अवजारे व दोन ते तीन ट्रॅक्‍टर अशी यंत्रसामग्री आहे. आंतरमशागतीसाठी ते छोट्या ट्रॅक्‍टरचा वापर करतात. कीडनाशक फवारणी, खुरटणी, भरणी यासाठी त्याचा उपयोग होतो. सबसॉयलर हे अवजारही त्यांच्याकडे आहे. त्या आधारे जमिनीचा तीन फुटापर्यंतचा थर भुसभुशीत केला जातो.

व्यवस्थापन
मागील वर्षीच्या ऊस व्यवस्थापनाची माहिती देताना निकम म्हणाले, की जमिनीत सबसॉयलरचा वापर केल्यानंतर आडवी- उभी नांगरट केली. जोडओळीतील अंतर दोन फूट ठेवले. सबसरफेस ठिबक पाइप पुरून घेतली. पट्टा सहा फुटाचा ठेवला. एक सप्टेंबरला दोन डोळ्यांच्या टिपरीचा वापर केला. लागवडीआधी बेणेप्रक्रिया केली. किडीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी डायमिथोएटचा वापर केला. सुरवातीला दहा बॅग "ग्रीन हार्वेस्ट", चार पोती सिंगल सुपर फॉस्फेट, दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्ये, दाणेदार गंधक यांचा वापर केला. फिप्रोनील हे दाणेदार कीटकनाशक मातीतून दिले. पुढील टप्प्यात 19-19-19, 12-61-0 आदींचा वापर केला. एकूण व्यवस्थापनातून पिकाची वाढ चांगल्या प्रकारे होऊन आठ महिन्यांत वीस ते तेवीस कांड्यांचा ऊस तयार झाला. शेतकऱ्यांना बेण्यासाठी हा ऊस प्रति टन साडेतीन हजार रुपये या दराने तोडण्यात आला.

निकम यांनी या वर्षी बेणे विक्रीसाठी म्हणून नऊ एकरावर ऊस घेतला आहे. त्यांच्या उसाची गुणवत्ता पाहण्यासाठी सुमारे 20 हजारांपर्यंत शेतकऱ्यांनी त्यांच्या शेताला भेट दिली आहे. सूर्यप्रकाश आणि पुरेशी हवा पिकाला अत्यंत आवश्‍यक असते. त्यावर आपला अधिक भर असल्याचे निकम यांनी सांगितले. बेण्यासाठी अनेक शेतकरी सतत मागणी करतात. मात्र बुकिंग पद्धत वापरत नाही. इच्छुक शेतकऱ्यांचे संपर्क क्रमांक घेतले असून त्यांना संपर्क साधून बेणे तयार असल्याचे कळवले जाते. अशा पद्धतीमुळे योग्य नियोजन साधले जाते. यंदाच्या वर्षी प्रति टन चार हजार रुपये दराने बेणे विक्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

निकम यांच्या ऊस शेतीतील काही वैशिष्ट्ये
- अडीच ते तीन किलो वजनाचा ऊस बेण्यासाठी वापरतात
- दोन डोळ्यांच्या टिपरीचा लागवडीसाठी वापर
- जोडओळ व पट्टा पद्धतीचा वापर
- को 86032 जातीचीच प्राधान्याने निवड
- बेणेप्रक्रिया करूनच लागवड
- "ग्रीन हार्वेस्ट" व रासायनिक खते असा संतुलित वापर
- विद्राव्य खतांवरही भर
- उसात लावणी व खोडव्यातही पाचटाचा वापर
- वाढलेल्या उसाची वाळलेली पानेही शेतात पसरवतात.
- गेल्या काही वर्षांत एकरी उत्पादन सरासरी 100 टनांपर्यंत
- स्वयंचलित पद्धतीच्या वापरावर भर
- शेतीतील पैसा शेतीत यांत्रिकीकरण करण्यासाठीच गुंतवण्याकडे कल,
त्यातूनच विविध प्रकारचे ट्रॅक्‍टर घेतले.

धनाजी निकम, 9158164965

No comments:

Post a Comment