Tuesday, November 12, 2013

पारंपरिक पिकात सातत्य ठेवत मिरचीतून साधली प्रगती

दिघी मसनी (जि. वाशीम) येथील शरद बाकल यांची यशकथा जिरायती शेतीमध्ये उत्पादनाची शाश्‍वतता नसल्याने रोजंदारीवर काम करणाऱ्या दिघी मसनी (ता.कारंजा, जि. वाशीम) येथील शरद बाकल यांनी आपल्या काकांच्या मदतीने विहीर घेतली. सिंचनाची सुविधा उपलब्ध झाल्यानंतर पारंपरिक कपाशी पिकाबरोबरच मिरची पिकांची लागवड करत चांगले उत्पादन मिळवले आहे. चांगले व्यवस्थापन करत या कुटुंबाने आज संपन्नतेकडे वाटचाल केली आहे. विनोद इंगोले 
वाशीम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्‍यातील दिघी मसनी येथील खुशालराव बाकल (पाटील) यांच्या कुटुंबाची वडिलोपार्जित अडीच एकर शेती. सुरवातीला शेतीमध्ये सिंचनाची सुविधा नसल्याने कपाशी, तूर, ज्वारी यांसारखी पारंपरिक पिके घेत असत. या जिरायती पिकातून कुटुंबीयांच्या केवळ दैनंदिन गरजा भागविता येत होत्या. पर्यायाने खुशालराव यांचा मुलगा शरद हा यवतमाळ जिल्ह्यातील बोदेगाव येथील सहकारी साखर कारखान्यात रोजंदारी मजूर म्हणून काम केले. मात्र या कामातून मिळालेल्या पैशातून त्यांनी हळूहळू आपल्या शेतीमध्ये सुधारणा सुरू केल्या. त्याच कालावधीमध्ये शरद यांचे काका पंजाबराव बाकल यांच्या सहकार्याने दिघी शिवारातच दोन एकर शेती खरेदी केली. दरम्यानच्या काळात गावाच्या वरील भागात अडाण लघुसिंचन प्रकल्प पूर्ण झाला. त्यामुळे या परिसरात भूगर्भातील जलसाठ्यात वाढ होऊ लागली. ही बाब लक्षात घेऊन शरद यांनी 2009-10 या वर्षी खरेदी केलेल्या शेतात विहीर खोदली. तिला चांगले पाणी लागले. शेती उत्पादनामध्ये शाश्‍वतता मिळण्यास सुरवात झाली. आज त्यांच्याकडे एकत्रित कुटुंबाची साडेसात एकर शेती आहे. त्यामध्ये कपाशी, सोयाबीन, मिरची ही पिके घेतली जातात. 

सिंचनातून आली संपन्नता नवीन खरेदी केलेल्या दोन एकर शेतीमध्ये बीटी कपाशीची लागवड ते करतात. पावसात खंड पडल्यास किंवा आवश्‍यकता भासल्यास या कपाशीला संरक्षित पाणी दिले जाते. 
- 2010-11 या वर्षात त्यांना एकरी 13 क्‍विंटल कपाशीचे उत्पादन मिळाले. कारंजा येथील खासगी जिनिंग व्यावसायिकांना 3700 रुपये प्रति क्‍विंटल याप्रमाणे विक्री करण्यात आली. त्यातून 48 हजार 100 रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्या वर्षी उत्पादन खर्च होता एकरी नऊ हजार रुपये. 
- 2011-12 या वर्षात त्यांना कपाशीचे एकरी उत्पादन दहा क्‍विंटल मिळाले. पिकांच्या व्यवस्थापनासाठी वेळेवर मजुरांची उपलब्धता न झाल्याने उत्पादकतेत घट झाल्याचे ते सांगतात. चार हजार रुपये प्रति क्‍विंटलचा दर त्यांना मिळाला. त्यातून 40 हजार रुपयांचे उत्पन्न झाले. उत्पादन खर्च 5,945 रुपये इतका होता. 

"ढोबळी'चे व्यवस्थापन - कपाशीसारख्या पारंपरिक पिकात सातत्य ठेवत शरद बाकल यांनी ढोबळी मिरची व तिखट मिरचीची लागवड करावयास सुरवात केली. साधारणपणे पाऊण एकर क्षेत्रामध्ये ते ढोबळी मिरचीची लागवड करतात. 
- ढोबळी मिरचीची लागवड चार फूट x एक फूट याप्रमाणे केली जाते. मात्र त्यांनी स्वतःपुरता त्यात बदल केला असून, नऊ इंच x 3.5 फूट अंतरावर रोपांची लागवड केली जाते. त्यामुळे एकरी 12 हजार रोपे लावली जातात. 
- चांगल्या कुजलेल्या चार ट्रॉली शेणखतामध्ये ट्रायकोडर्मा, सिंगल सुपर फॉस्फेट मिसळून साधारणपणे महिनाभर ठेवले जाते. त्यानंतर त्यांचा वापर शेतामध्ये केला जातो. 
- फुलकिडे, लाल कोळी, पांढरी माशी यांसारख्या किडींचा तर भुरी, शेंडेमर, करपा, ठिपक्‍या यांसारख्या रोगांचा प्रादुर्भाव या पिकावर होतो. त्याच्या नियंत्रणासाठी वेळेवर कीडनाशकांच्या फवारण्या केल्या जातात. पिकाच्या कालावधीमध्ये 70 ते 72 फवारण्या होतात. 

मिरचीने दिला समृद्धीचा गोडवा स्वतःच्या शेतीसाठी लागणारी रोपे स्वतः तयार करतात. त्यासाठी ट्रेमध्ये बियाण्यांची लागवड करून रोपवाटिका तयार केली जाते. रोपवाटिकेवरील बियाण्यांसह होणारा खर्च 21 हजार 900 रुपये राहतो. साधारणपणे दीड महिन्याने या रोपांची लागवड शेतात केली जाते. लागवडीसाठी 900 रुपये खर्च होतो. आंतरमशागतीसाठी तीन हजार रुपये, खतासाठी 13 हजार 300 रुपये, तोडणीसाठी लागणाऱ्या मजुरांची मजुरी आठ हजार रुपये, कीड व रोगनियंत्रणावर 34 हजार रुपये, अडत 25 हजार रुपये 600 रुपये, वाहतूक खर्च सहा हजार 550 रुपये, बारदाना 2500 रुपये व अन्य खर्च 750 रुपये याप्रमाणे पाऊण एकर क्षेत्रावरील ढोबळी मिरचीच्या व्यवस्थापनावर एक लाख 16 हजार पाचशे रुपये खर्च झाला आहे. या वर्षी पावसामुळे रोगांचे प्रमाण अधिक राहिले असून, फवारणीच्या खर्चात वाढ झाली आहे.
- सात महिने कालावधीचे हे पीक असून, मे महिन्यात लागवड केलेल्या या पिकाचे आजपर्यंत 120 क्‍विंटल उत्पादन मिळाले आहे. त्यास 35 ते 50 रुपये प्रति किलोप्रमाणे अमरावती, कारंजा बाजारपेठेत दर मिळाला आहे. सरासरी 39 रुपये प्रति किलोप्रमाणे चार लाख 68 हजार रुपयांचे उत्पन्न झाले. 
- 2010-11 या वर्षात त्यांनी एक एकर क्षेत्रावर मिरची लागवड केली होती. या क्षेत्रातून त्यांना ढोबळी मिरचीचे 172 क्‍विंटल उत्पादन मिळाले. सरासरी प्रति किलो 26 रुपये दर मिळाल्याने चार लाख 47 हजार 200 रुपयांचे उत्पन्न मिळाले. एकरी उत्पादन खर्च 81 हजार रुपये झाला. 
- 2011-12 मध्ये या वर्षात त्यांनी पाऊण एकर क्षेत्रावर लागवड केली. पाऊण एकरावरील मिरची बागेच्या व्यवस्थापनावर 44 हजार रुपयांचा व्यवस्थापन खर्च झाला. मात्र बाजारात मिरचीची आवक वाढल्याने दरामध्ये घसरण झाली. त्या वर्षी घराचे बांधकाम आणि अन्य बाबींमुळे पिकाकडे थोडेसे दुर्लक्ष झाल्याचे ते मान्य करतात. त्या वेळी केवळ एक लाख दहा हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला. 
शरद हे सातत्याने बाजारपेठेतील दरांबाबत अमरावती, कारंजा, जबलपूर, नागपूर येथील व्यापाऱ्यांशी संपर्कात राहतात. त्यातून विविध बाजारपेठांतील दरांचा अंदाज त्यांना मिळतो. त्यानुसार मिरचीच्या विक्रीचा निर्णय घेतला जातो. 

समस्या नेहमीच्याच... - शेतीमध्ये मजुरांची उपलब्धता हीच मोठी समस्या असून, आज आई-वडिलांसह पत्नी यांची शेतातील कामासाठी मोलाची मदत होते. 
- दुसरी समस्या आहे विजेची उपलब्धता. अगदी शेतामध्ये प्रकाश सापळ्यांचा वापर करण्यासाठीसुद्धा वीज मिळत नाही. सिंचनाची अडचण तर नेहमीचीच असल्याचे त्यांनी सांगितले. 
- शरद म्हणतात, ""शेतीच्या कामात आईची मदत मिळते, तर आर्थिक बाबीत आधार मिळतो तो काकांचा. दोघांच्या आधारावरच माझी शेती तोलली आहे.'' 

लघुसिंचन प्रकल्पामुळे दिघी मसनीचा कायापालट कारंजा-दारव्हा मार्गावरील 1700 लोकवस्तीच्या दिघी या छोट्या टुमदार खेड्यात अडाण लघुसिंचन प्रकल्पामुळे सिंचन सुविधा वाढल्या आहेत. पारंपरिक शेतीपद्धतीवर अवलंबून असलेल्या या गावात ढोबळी मिरची, टरबूज, पपई, डाळिंब, केळी, हळद यांसारखी व्यावसायिक पिके घेतली जात आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पादन व उत्पन्नामध्ये वाढ झाल्याने गावामध्ये पूर्वीच्या झोपडीवजा घराऐवजी टुमदार बंगले उभे राहिले आहेत. सिंचनामुळे कायापालट झालेले हे गाव संपन्नतेकडे वाटचाल करत आहे. 


संपर्क - 
शरद बाकल (पाटील) 
मो. 8698259723

No comments:

Post a Comment