Friday, January 11, 2013

चाऱ्यासाठी मका लागवड कधी करावी?

लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक आहे. लागवडीसाठी जमिनीची एक खोलवर नांगरट करून घ्यावी. नंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन चांगल्या प्रकारे भुसभुशीत करून व्यवस्थितरीत्या शेत तयार करून घ्यावे. ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यांत लागवड करावी. 

लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद- 2, विजय या जातींची निवड करावी. पेरणी वेळेत करणे उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पेरणीसाठी हेक्‍टरी 75 किलो बियाणे लागते. पेरणी पाभरीने 30 सें.मी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर या जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी 20 ते 25 गाड्या शेणखत अथवा कंपोस्टखत जमिनीत मशागतीच्या वेळी चांगले मिसळून द्यावे. पेरणीच्या वेळी प्रति हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो पालाश आणि 50 किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर साधारणपणे एक महिन्याने नत्राचा दुसरा हप्ता हेक्‍टरी 50 किलो या प्रमाणात द्यावा. पीकवाढीच्या सुरवातीच्या काळात एक कोळपणी व एक खुरपणी करावी. पिकाची वाढ व्यवस्थितरीत्या होण्यासाठी सात ते आठ पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. कापणी साधारणपणे पीक 50 टक्के फुलोऱ्यात असताना करावी, म्हणजे पौष्टिक व चवदार चारा आपणाला उपलब्ध होतो. अगोदर किंवा उशिरा कापलेल्या वैरणीत सकसपणा कमी असतो. साधारणपणे योग्य व्यवस्थापनात मक्‍याचे हेक्‍टरी 550 ते 700 क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. 

No comments:

Post a Comment