Sunday, January 13, 2013

संकरित नेपिअर गवताची लागवड कशी करावी?

बहुवार्षिक, भरपूर उत्पादन देणारे संकरित नेपिअर हे फायदेशीर चारा पीक आहे. या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्‍यतो निचरा न होणाऱ्या, दलदलीच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात. योग्य व्यवस्थापन केल्यास या पिकाचे चांगले उत्पादन मिळते. 
संकरित नेपिअर या चाऱ्यामध्ये आठ ते नऊ टक्के प्रथिने असतात. या चारा पिकाचे यशवंत आणि फुले जयवंत (आर.बी.एन. - 13) हे सुधारित वाण आहेत. यशवंत वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे कापणीनंतर जोमाने होणारी वाढ, अधिक लांबलचक भरपूर फुटवे; मऊ, लांब व रुंद पाने आणि त्यावर अल्प प्रमाणात लव ही आहेत. याचबरोबरीने फुले जयवंत हा नवीन सुधारित वाण यशवंत वाणापेक्षा 10 ते 15 टक्के जास्त उत्पादन देतो. यामध्ये ऑक्‍झिलिक आम्लाचे प्रमाण देखील यशवंत गवतापेक्षा कमी आहे, म्हणून हा वाण जनावरांच्या चाऱ्यासाठी फायदेशीर आहे. 

या पिकाच्या लागवडीला उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. शक्‍यतो निचरा न होणाऱ्या, दलदलीच्या जमिनी या पिकाच्या लागवडीसाठी टाळाव्यात. खत व पाणी व्यवस्थापन योग्य प्रमाणात दिल्यास या गवताची चांगली वाढ होते. संकरित नेपिअर गवत बहुवार्षिक व भरपूर उत्पादन देणारे असल्याने शेत तणविरहित ठेवावे. लागवडीपूर्वी उभ्या - आडव्या नांगरटी करून, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणीच्या वेळी सात ते आठ टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे. ऑगस्ट महिन्यापर्यंत या गवताची लागवड करता येते. याची लागवड ठोंबे मुळासह लावून करावी. सरासरी दोन ठोंबांतील अंतर 90 ु 60 सें.मी. ठेवून लागवड केल्यास आंतरमशागत करणे सुलभ जाते. लागवडीच्या वेळी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 50 किलो पालाश द्यावे. त्यानंतर पीकवाढीचा जोम कायम राहण्यासाठी प्रत्येक कापणीनंतर 25 किलो नत्र द्यावे. हे बहुवार्षिक बागायती चारा पीक असल्याने तणांचा उपद्रव होतो, त्यामुळे त्याच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. गवताच्या सुरवातीस वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्‍यक आहे, त्यानंतर गरजेनुसार खुरपणी अथवा खांदणी करावी. गवताच्या भरपूर उत्पादनासाठी पाणी व्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक आहे. लागवड केल्यास गवताच्या उत्तम वाढीसाठी सुरवातीचे दोन व त्यानंतर आठ ते दहा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात.
 
कापणी व उत्पादन 
या गवताची कापणी लागवडीपासून दहा आठवड्यांनी करावी. कापणी जमिनीपासून साधारण 15 ते 20 सें.मी. उंचीवर करावी, त्यामुळे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते. नंतरच्या कापण्या पीकवाढीनुसार सात ते आठ आठवड्यांनी कराव्यात. म्हणजे सकस, रुचकर, पौष्टिक व रसरशीत चारा उपलब्ध होतो. अशा प्रकारे वर्षभरात सात कापण्या घेता येतात. कापण्या वेळेत करणे आवश्‍यक आहे, अन्यथा चारा जाड व टणक होऊन पौष्टिकतेचे प्रमाण कमी होऊन, चारा कमी मिळतो. शिफारशीप्रमाणे उत्तम व्यवस्थापन केल्यास प्रति वर्षी आठ ते नऊ कापण्यांद्वारे 2500 ते 3000 क्विंटल चारा एक हेक्‍टरपासून मिळू शकतो. 

एकाच चाऱ्याचा अतिवापर टाळा... 
पशुखाद्यामध्ये एकदल व द्विदल चारा पिकांचा समावेश असणे गरजेचे असते. एकाच प्रकारचा चारा सतत देऊ नये. हिरव्या चाऱ्याची कमतरता असते, तेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाच्या वाढ्यांचा उपयोग चारा म्हणून करतात. उसाच्या वाढ्यांत 0.5 ते 1.5 टक्के प्रथिने, 9.0 टक्के काष्ठमय तंतू असतात. वरील पोषणमूल्यांचा विचार करता वाळलेल्या एकदल चाऱ्यापेक्षा उसाच्या वाढ्यांमध्ये पोषणमूल्ये कमी असतात. उसाच्या हिरव्या वाढ्यांत हिरव्या चाऱ्यापेक्षा ऑक्‍झलेट व नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. वाढे मोठ्या प्रमाणात खाऊ घातल्यामुळे ऑक्‍झलेटचा शरीरातील कॅल्शिअमशी संयोग होऊन कॅल्शिअम ऑक्‍झलेट तयार होते आणि ते लघवीवाटे बाहेर पडते, त्यामुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होऊन मूत्राशयावर अनिष्ट परिणाम होतो; तसेच गर्भपात, हाडे ठिसूळ होणे, जनावर माजावर न येणे व उत्पादन कमी होणे, तसेच वासरे कमकुवत होणे इ. अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यासाठी जनावरांना आठ ते दहा किलो वाढे व त्याबरोबर सकस हिरवा द्विदल चारा दहा किलो यांचे मिश्रण करून द्यावे, त्याचबरोबर एक ते दीड किलो अंबोण व 25 ते 30 ग्रॅम क्षार खनिजे द्यावीत. 

No comments:

Post a Comment