Sunday, January 13, 2013

पौष्टिक चाऱ्यासाठी - फुले जयवंत

फुले जयवंत हा संकरित नेपिअर या गवताचा बहुवार्षिक वाण आहे. याचा चारा अत्यंत पौष्टिक व पाचक आहे. पाण्याची उपलब्धता असल्यास कमी थंडीचा काळ वगळता वर्षभर केव्हाही याची लागवड करता येते. 

फुले जयवंत हा वाण सर्व प्रकारच्या जमिनीत वाढतो. चांगली वाढ व अधिक उत्पादनासाठी कसदार, मध्यम ते भारी व उत्तम निचऱ्याची जमीन निवडावी. हा वाण पाच ते आठ दरम्यान सामू असलेल्या जमिनीत येऊ शकतो. साधारणपणे 31 अंश सेल्सिअस तापमान या वाणाची वाढ उत्तम होते. तर 15 अंश सेल्सिअसच्या खाली तापमान गेल्यास त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. उन्हाळा व पावसाळा हा काळ वाढीस पोषक आहे. या पिकाची पाण्याची गरज सुमारे 800 ते 100 मि.मी. इतकी आहे. 

लागवडीचे तंत्र ः 

लागवडीसाठी खोल नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या तीन ते चार पाळ्या देऊन जमीन मऊ, भुसभुशीत आणि तणविरहित करावी. या गवताची लागवड ठोंबे (मुळासह कांड्या) लावून करावी लागते. साधारणपणे तीन महिने वाढू दिलेल्या पिकाच्या खोडाच्या जमिनीकडील भागातील तीन डोळे असणाऱ्या कांड्या काढून लावल्यास चांगल्या फुटतात. 

ठोंब 90 सें.मी अंतरावर सरीच्या बगलेत दोन डोळे जमिनीत व एक जमिनीच्यावर राहील अशा रीतीने लावावेत. दोन झाडांमध्ये साधारणपणे 60 सें.मी. अंतर ठेवावे. एक हेक्‍टर क्षेत्र लागवडीसाठी लागणाऱ्या ठोंबाची संख्या ही लागवडीचे अंतर व प्रत्येक ठिकाणी लावावयाची ठोंबाची संख्या यावर अवलंबून असते. 90 x 60 सें.मी. अंतरावर प्रत्येक ठिकाणी दोन ठोंबे लावल्यास हेक्‍टरी 37,000 ठोंबे लागतात तर एका ठिकाणी एकच ठोंब लावल्यास 18,500 ठोंबे पुरेसे होतात. पाण्याची उपलब्धता मुबलक असल्यास 15 अंश सेल्सिअसपेक्षा कमी थंडीचा काळ वगळता वर्षभर केव्हाही याची लागवड करता येते. उन्हाळ्यात फेब्रुवारी-मार्च तर पावसाळ्यात जून-ऑगस्ट या काळात लागवड केल्यास पिकांच्या वाढीसाठी योग्य असते. 

खत, पाणी व्यवस्थापन ः 
1) हेक्‍टरी 35 ते 40 टन चांगले कुजलेले शेणखत मशागतीचे वेळी जमिनीत मिसळावे. लागवडीच्या वेळी हेक्‍टरी 60 किलो नत्र अधिक उत्पादनासाठी प्रत्येक कापणीनंतर प्रति हेक्‍टरी 25 किलो नत्र रासायनिक व सेंद्रिय खते यांद्वारे आळीपाळीने द्यावे. 
2) फेब्रुवारी-मार्चमधील लागवडीच्या स्थिरतेसाठी सुरवातीस दोन व त्यानंतर दर 10 ते 15 दिवसांनी पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. पावसाळ्यात गरज असल्यास पाणी द्यावे. 
3) पिकांच्या सुरवातीच्या वाढीच्या काळात एक किंवा दोन खुरपण्या देणे आवश्‍यक आहे. त्यानंतर खुरपणी किंवा खांदणी ही कामे गरजेनुसार करावीत. प्रत्येक वर्षी उन्हाळ्याच्या अखेरीस एका ठिकाणी दोन ते तीन फुटवे ठेवून इतर जादा फुटवे काढून टाकावेत. त्यांचा नवीन लागवडीसाठी उपयोग करावा. 

कापणीचे तंत्र ः 1) या गवताची पहिली कापणी, लागवडीपासून नऊ ते 10 आठवड्यांनी म्हणजे साधारणतः 60 ते 70 दिवसांनी करावी. त्यानंतरच्या कापण्या दर सहा ते सात आठवड्यांनी (40 ते 50 दिवसांनी) कराव्यात. 
2) वर्षभरात आठ ते नऊ कापण्या सहज घेता येतात. कापणी जमिनीपासून 15 ते 20 सें.मी. अंतरावर करावी म्हणजे फुटवे फुटण्यास चांगली मदत होते. 
3) काळ्या कसदार जमिनीत लागवड केल्यास तसेच पाण्याची सोय व अन्य व्यवस्थापन उत्तम असल्यास या वाणापासून प्रति हेक्‍टरी 100 ते 150 टन हिरवा चारा प्रतिवर्षी सहा ते आठ कापण्यांद्वारे मिळू शकतो. 

वाणाची वैशिष्ट्ये ः 1) या संकरित वाणाच्या चाऱ्यात यशवंताच्या तुलनेत ऑक्‍झॅलिक आम्ल अल्प प्रमाणात (1.91 टक्के) आहेत. 
2) कापणीनंतर जोमाने वाढ होते. अधिक लांबीचे भरपूर फुटवे येतात, मऊ लंब व रुंद पाने असतात. 
3) चारा पालेदार, हिरवागार, रसदार आणि रुचकर आहे. 

No comments:

Post a Comment