Friday, January 11, 2013

सुधारित पद्धतीने करा मका लागवड

 मका हे उष्ण, समशीतोष्ण आणि थंड हवामानाशी समरस होणारे पीक आहे; मात्र पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत धुके आल्यास ते या पिकास मानवत नाही. या पिकाच्या योग्य वाढीसाठी २५ ते ३० अंश से. तापमान चांगले असते; परंतु जेथे सौम्य तापमान (२० ते २५ अंश से.) आहे अशा ठिकाणी मका वर्षभर घेता येतो. ३५ अंश से.पेक्षा अधिक तापमान असल्यास उत्पादनात घट येते. परागीभवनाच्या वेळी अधिक तापमान आणि कमी आर्द्रता असल्यास त्याचा विपरीत परिणाम परागीभवन व फलधारणेवर होऊन उत्पादनात घट येते. तेव्हा या बाबींचा बारकाव्याने अभ्यास करून मक्‍याचे अधिक उत्पादन मिळण्यासाठी सुधारित पद्धतीचा अवलंब करावा. मका हे पीक विविध प्रकारच्या जमिनीत घेता येते; मात्र त्यासाठी चांगली मशागत आणि योग्य प्रमाणात खतमात्रांची आवश्‍यकता असते. लागवडीसाठी मध्यम ते भारी, खोल, रेतीयुक्त, उत्तम निचऱ्याची, अधिक सेंद्रिय पदार्थ आणि जलधारणा शक्ती असलेली जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६.५ ते ७.५ दरम्यान असावा. विशेषतः नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत हे पीक फार चांगले येते; परंतु अधिक आम्ल (सामू ४.५ पेक्षा कमी) आणि चोपण अगर क्षारयुक्त (सामू ८.५ पेक्षा अधिक) जमिनीत हे पीक घेऊ नये, तसेच दलदलीची जमीनसुद्धा टाळावी. पूर्वमशागत ः जमिनीची खोल (१५ ते २० सें.मी.) नांगरट करावी, कारण खोल नांगरटीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ दिसून आली आहे; तसेच पिकांची धसकटे, अवशेष, काडीकचरा इत्यादी खोल नांगरटीमुळे जमिनीत गाडल्याने जमिनीला सेंद्रिय घटक मिळतात व जमिनीचा पोत सुधारतो. कुळवाच्या दोन-तीन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवाच्या पाळीच्या वेळी हेक्‍टरी १० ते १२ टन (२५ ते ३० गाड्या) चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. हिरवळीचे खत जमिनीत गाडलेले असल्यास शेणखताची आवश्‍यकता नाही. सेंद्रिय खतांचा वापर महत्त्वाचा आहे.

सुधारित वाण ः
मक्‍याच्या संमिश्र व संकरित जाती या स्थानिक वाणांपेक्षा ६० ते ८० टक्के अधिक उत्पादन देतात. विविध कालावधींमध्ये पक्व होणारे मक्‍याचे संमिश्र व संकरित वाण उपलब्ध असून, पाऊसमान आणि जमिनीच्या मगदुराप्रमाणे योग्य वाणांची निवड करावी. महाराष्ट्राकरिता शिफारस केलेल्या संकरित आणि संमिश्र वाणांची माहिती तक्ता क्र. १ मध्ये दिली आहे. पेरणीची योग्य वेळ ः पेरणी २८ मे ते २० जून दरम्यान करावी. पेरणीसाठी जमिनीत पुरेसा ओलावा असावा. त्यामुळे उगवण चांगली होऊन रोपांची संख्या योग्य राहते. मध्य विदर्भ विभागात पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात करावी. खरिपातील पेरणीस उशीर करू नये, कारण उशीर झाल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे रोपांची संख्या योग्य राहत नाही. लागवड पद्धत ः उशिरा आणि मध्यम कालावधीत पक्व होणाऱ्या जातींसाठी ७५ सें.मी. अंतरावर मार्करच्या साह्याने ओळी आखून २० ते २५ सें.मी. अंतरावर दोन बिया चार ते पाच सें.मी. खोल टोकण करून बियाणे चांगले झाकून घ्यावे, तसेच लवकर तयार होणाऱ्या जातींसाठी दोन ओळींत ६० सें.मी. व दोन रोपांत २० सें.मी. अंतर ठेवून वरीलप्रमाणे टोकण करावी. सरी - वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूला जातीपरत्वे अंतर ठेवून पेरणी करावी. बियाण्याचे प्रमाण, बीजप्रक्रिया ः एक हेक्‍टर पेरणीसाठी १५-२० किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी दोन ते २.५ ग्रॅम थायरम हे बुरशीनाशक प्रति किलो बियाण्यास चोळावे म्हणजे करपा रोगाचे नियंत्रण करता येते, तसेच ऍझोटोबॅक्‍टर जिवाणू संवर्धन १५ ग्रॅम प्रति किलो बियाण्यास चोळल्यास उत्पादनात चांगली वाढ होते. रासायनिक खतमात्रा ः मका पीक जमिनीतून मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्ये शोषून घेते, त्यामुळे यास "खादाड पीक' म्हटले जाते. अधिक उत्पादनासाठी पुढीलप्रमाणे संतुलित रासायनिक खतांचा पुरवठा करावा. मका पिकाला दाणे भरण्याच्या वेळेपर्यंत नत्राचा पुरवठा आवश्‍यक असतो. निचऱ्याद्वारे नत्राचा ऱ्हास होतो. म्हणून नत्र खतमात्रा विभागून द्यावी; परंतु संपूर्ण स्फुरद आणि पालाश पेरणीच्या वेळी द्यावे. सूक्ष्म अन्नद्रव्यांमध्ये झिंकची कमतरता असल्यास प्रति हेक्‍टरी २० ते २५ किलो झिंक सल्फेट पेरणीच्या वेळी द्यावे. पेरणी वेळी रासायनिक खते पाच ते सात सें.मी. खोलवर आणि जमिनीत चांगली मिसळून द्यावीत. उभ्या पिकात नत्र खताची मात्रा (युरिया) मका ओळीपासून १०-१२ सें.मी. दूर अंतरावर द्यावी. पेरणीनंतर घ्यावयाची काळजी ः अ) पक्षी राखण ः खरीप हंगामात पेरणीनंतर उगवण पाच ते सहा दिवसांत होते. पीक उगवत असताना कोवळे कोंब पक्षी उचलतात. परिणामी रोपांची संख्या कमी होऊन उत्पादन घटते. म्हणून पेरणीनंतर सुरवातीच्या १०-१२ दिवसांपर्यंत पक्ष्यांपासून संरक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच, पीक दुधाळ अवस्थेत असताना पक्षी कणसे फोडून दाणे खातात म्हणून अशा वेळी देखील पीक राखण आवश्‍यक असते. ब) विरळणी ः मका उगवणीनंतर आठ ते दहा दिवसांनी विरळणी करून एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून विरळणी करावी, त्यामुळे पिकाची वाढ चांगली व जोमदार होते. गरज भासल्यास पीक उगवणीनंतर त्वरित नांग्या भराव्यात. क) पिकात जास्त पाणी किंवा दलदल नसावी ः मका पेरणीनंतर सुरवातीच्या २० दिवसांपर्यंतच्या कालावधीत पिकात जास्त पाणी किंवा दलदलीची स्थिती असल्यास कोवळी रोपे पिवळी पडून मरतात. कारण मक्‍याची रोपावस्था या स्थितीस खूपच संवेदनशील आहे. म्हणून पेरणीनंतरच्या सुरवातीच्या २० दिवसांपर्यंतच्या काळात पिकात पाणी साठून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आंतरमशागत ः मका पिकाची वाढ सुरवातीच्या काळात जलद होत नाही, तसेच तणांचा मका पिकाशी अन्नद्रव्य आणि पाणी याबाबतीत स्पर्धा करण्याचा कालावधी पेरणीनंतर १५ ते ३५ दिवसांपर्यंतचा असल्याने तणांचा वरील कालावधीत बंदोबस्त केल्यास उत्पादन अधिक मिळते, तसेच संपूर्ण हंगामात पीक तणविरहित ठेवल्याने जितके उत्पादन मिळते, तितकेच उत्पादन तणांचा बंदोबस्त पेरणीनंतर १५ ते ३५ दिवसांपर्यंतच्या काळात केल्याने मिळते. म्हणून तणांच्या प्रादुर्भावानुसार एक ते दोन खुरपण्या करून ताटांना आधारासाठी माती चढवावी; परंतु खरीप हंगामात पावसामुळे भांगलणीकरिता योग्य वाफसा न मिळाल्यास तणांचा बंदोबस्त करणे फारच कठीण होते. म्हणून तज्ज्ञांच्या सल्ल्याने तणनाशकांचा वापर करावा. पेरणी संपताच वाफशावर ऍट्राझीन (५० टक्के) तणनाशक एका हेक्‍टरसाठी दोन किलो या प्रमाणात प्रति ५०० लिटर पाण्यात मिसळून समप्रमाणात जमिनीवर फवारावे. फवारणी केलेले क्षेत्र तुडवू नये. याशिवाय तणनाशक फवारणीनंतर १५-२० दिवसांपर्यंत आंतरमशागत करू नये. त्यानंतरच्या कालावधीत आवश्‍यकता वाटल्यास एखादी भांगलण करावी. पाणी व्यवस्थापन ः मक्‍याची पाने रुंद व लांब असतात. बाष्पीभवन क्रियेमुळे पानांतून अधिक पाणी बाहेर टाकले जात असल्याने या पिकास पाण्याची गरज अधिक आहे. खरीप हंगामात निश्‍चित आणि विस्तृतपणे पावसाची विखरण असणाऱ्या भागात मका जिरायतीखाली घेता येतो. पिकाच्या महत्त्वाच्या अवस्था पाण्याच्या ताणास खूपच संवेदनशील आहेत. म्हणून खरीप हंगामात पावसात खंड पडून पाण्याचा ताण पडल्यास पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थेच्या काळात संरक्षित पाणी द्यावे. पिकाच्या महत्त्वाच्या अवस्थाकालावधी रोप अवस्था २५-३० दिवस पेरणीनंतर फुलोऱ्यात असताना ४०-६० दिवस पेरणीनंतर दाणे भरण्याच्या वेळी ७०-८० दिवस पेरणीनंतर वर नमूद केलेल्या पिकांच्या महत्त्वाच्या अवस्थांच्या वेळी पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनात लक्षणीय घट येते. म्हणून अशा अवस्थांच्या काळात पाणी द्यावे, तसेच पीक फुलोऱ्यात आणि दाणे भरत असताना कमी अंतराने भरपूर पाणी द्यावे म्हणजे कणसे भरण्यास मदत होते. मका फुलोऱ्यात असताना जमिनीत पाण्याचे प्रमाण कमी असल्यास स्त्रीकेसर बाहेर पडण्यास उशीर झाल्यामुळे बीजधारणा कमी होऊन उत्पादन घटते. म्हणून पीक तुऱ्यावर आणि स्त्रीकेसर अवस्थेत असताना पाण्याची खूप गरज आहे. ः ०२३१ - २६०१११५ (लेखक मका सुधार प्रकल्प, कोल्हापूर येथे कार्यरत आहेत.) मक्‍यामध्ये घ्यावयाची आंतरपिके मक्‍याच्या दोन ओळींत अधिक अंतर असल्यामुळे आणि कमी पसारा असल्याने पिकाची सावली कमी पडते, त्यामुळे सूर्यप्रकाशाचा कार्यक्षमपणे वापर आणि दोन ओळींतील असलेल्या जागेत लवकर येणारी कडधान्ये (उडीद, मूग, चवळी) आणि तेलबिया (भुईमूग, सोयाबीन) ही आंतरपिके यशस्वीरीत्या घेता येऊ शकतात. मक्‍यात भुईमूग हे आंतरपीक जोडओळ किंवा सोडओळ पद्धतीने घेता येते. पेरभातामध्ये बहुतांशी शेतकरी मका हे मिश्र पीक मुख्यतः हिरवी कणसे आणि चारा यासाठी घेतात. पेरभात + मका आंतरपीक पद्धतीमुळे भात उत्पादनात लक्षणीय घट येते. तथापि, पेरभाताच्या सहा ओळींनंतर दोन रोपांत २५ सें.मी. अंतर ठेवून मका टोकण करणे (६० टक्के मका रोपसंख्या प्रति हेक्‍टर) हे इतर पेरभात + मका मिश्र पीक पद्धतीपेक्षा सरस आढळून आले आहे. मक्‍याची लवकर येणारी पंचगंगा संमिश्र ही जात ऊस व हळदीमध्ये मिश्रपीक म्हणून घेता येते; परंतु अशा आंतरपीक पद्धतीमुळे मुख्य पिकाच्या उत्पादनात घट येते. खरीप हंगामात मध्य महाराष्ट्र पठारी विभागामध्ये मका + भुईमूग, मका + तूर, मका + सोयाबीन आणि मका + चवळी या आंतरपीक पद्धतीत ६ः३ ओळी या प्रमाणात घेणे फायदेशीर आहे

No comments:

Post a Comment