Sunday, January 13, 2013

वर्षभरासाठी चाऱ्याचे नियोजन

दूध उत्पादनासाठी कराव्या लागणाऱ्या एकूण खर्चाचा जनावरांच्या आहारावर होणारा खर्च 60 ते 70 टक्के असतो. हा खर्च जेवढा कमी, तेवढी निव्वळ उत्पन्नात वाढ होते. सध्याच्या काळात हिरव्या तसेच वाळलेल्या चाऱ्याचे भाव सर्वसाधारण भावापेक्षा खूपच जास्त आहेत, त्यामुळेच वर्षभर चारा पुरवण्याचे योग्य नियोजन न केल्यामुळे दूध उत्पादन खर्चात प्रचंड वाढ होऊन निव्वळ उत्पन्नाचे प्रमाण घटण्याची शक्‍यता आहे.

चारा पिकांची पेरणी करण्यापूर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना वर्षभर हिरवा तसेच वाळलेला चारा त्यांच्या आवश्‍यकतेनुसार पुरवण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. असे नियोजन न केल्यामुळे बऱ्याच वेळा चाऱ्याची कमतरता भासते, ज्यामुळे जनावरे अर्धपोटी ठेवण्याची वेळ येते. त्यामुळे जनावरांच्या दूध उत्पादनात घट येतेच शिवाय त्यांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होतो. त्याचप्रमाणे टंचाईच्या काळात चारा खरेदी करून जनावरांना खाऊ घालणे खूपच महाग पडते. दूध उत्पादनासाठी कराव्या लागणाऱ्या एकूण खर्चाचा जनावरांच्या आहारावर होणारा खर्च 60 ते 70 टक्के असतो. हा खर्च जेवढा कमी, तेवढी निव्वळ उत्पन्नात वाढ होते. म्हणून जनावरांना त्यांच्या आवश्‍यकतेनुसार वर्षभर हिरवा तसेच वाळलेला चारा पुरवण्यासाठी नियोजन करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

लागवडीचे नियोजन - 
तीन ते चार संकरित गाई किंवा म्हशींना वर्षभर हिरवा चारा पुरवण्यासाठी एक एकर क्षेत्रावर चारा पिकांची लागण करावी, या क्षेत्रामध्ये दहा गुंठे क्षेत्रावर बहुवर्षायू संकरित नेपियर, दहा गुंठे क्षेत्रावर बहुवर्षायू लसूणघास आणि उरलेल्या 20 गुंठे क्षेत्रावर हंगामानुसार मका, ज्वारी, बाजरी, ओट, बरसीम यांसारख्या चारा पिकांचे उत्पादन मिळेल. यामुळे जनावरांना दररोज विविध प्रकारचा चारा देणेदेखील शक्‍य होईल. तीन वर्षांनंतर या क्षेत्रातील पिकांची फेरपालट करावी. 

संकरित नेपियर आणि लसूणघास काढून त्यांच्या ठिकाणी हंगामी पिके, तर हंगामी पिकांच्या ठिकाणी संकरित नेपिअर आणि लसूणघास यांची लागण करावी. यामुळे जमिनीचा कस टिकून राहीलच, शिवाय चारा उत्पादन भरपूर मिळेल. अशा प्रकारे नियोजन करून चारा पिकांची लागण करण्याबरोबरच त्यांचे उत्तम व्यवस्थापन करणेदेखील अत्यंत आवश्‍यक आहे. या पद्धतीने चारा पिकांचे योग्य व्यवस्थापन केल्यास तीन ते चार गाई किंवा म्हशींना वर्षभर पुरेल इतपत हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. 

मूरघासचा वापर - 
हिरव्या चाऱ्याचा "मूरघास' तयार करून जनावरांसाठी टंचाईच्या काळात हिरव्या चाऱ्याऐवजी वापरता येतो. हिरव्या चाऱ्यात असणारे जवळपास सर्व अन्नघटक त्यापासून तयार केलेल्या मूरघासात टिकून राहतात, त्यामुळे जनावरांना मूरघास देणे हे हिरवा चारा देण्यासारखेच असते.
फुलोरा अवस्थेत असणाऱ्या एकदल प्रकारातील हिरव्या चाऱ्याचा मूरघास करावा. चाऱ्याची चांगली कुट्टी करावी आणि ती हौदामध्ये घट्ट दाबून भरावी. हौद पूर्ण भरून झाकल्यानंतर त्यातील चारा कुट्टीमध्ये बाहेरून हवा, पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी.अशा प्रकारे दक्षता घेऊन तयार केल्यास उत्तम मूरघास तयार होतो. चारा हिरव्या अवस्थेतच टिकून राहतो. मुरण्याच्या प्रक्रियेमुळे चाऱ्यास जरासा आंबूस वास येतो, त्या मुळे जनावरे मूरघास आवडीने खातात. दुधाला आंबूस वास टाळण्यासाठी दुभत्या जनावरांना दूध काढून झाल्यानंतर मूरघास द्यावा. तज्ज्ञ व्यक्तीकडून प्रात्यक्षिकाद्वारे शिकून नंतरच स्वतः मूरघास तयार करावा.

No comments:

Post a Comment