Sunday, January 13, 2013

सकस चाऱ्यासाठी पेरा, मका, ज्वारी, लसूणघास

रब्बी हंगामामध्ये सर्वसाधारणपणे मका, ज्वारी व ओट हंगामी पिकांबरोबर लसूणघास, बरसीम इ. चारा पिकांची लागवड करावी. जनावरांच्या आहार नियोजनानुसार एकदल व द्विदल चारा पिकांचे योग्य पद्धतीने नियोजन करावे. 
सोमनाथ माने 

दुग्ध व्यवसायात सतत वर्षभर योग्य प्रमाणात हिरव्या व सुक्‍या चाऱ्याचा पुरवठा होणे जनावरांसाठी तसेच दूध उत्पादनासाठी महत्त्वाचे आहे. त्यासाठी हंगामानुसार विविध चारा पिकांची लागवड व हंगामी चारा पिकाबरोबर काही वार्षिक व बहुवार्षिक चारा पिकांची लागवड करावी. त्यामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याचा पुरवठा होतो. रब्बी हंगामामध्ये सर्वसाधारणपणे मका, ज्वारी व ओट हंगामी पिकांबरोबर काही वार्षिक/ बहुवार्षिक लसूणघास, बरसीम इ. चारा पिकांची लागवड करावी. हंगामी ज्वारी, बाजरी या चारा पिकांमध्ये दोन- तीन कापण्या होणाऱ्या जातीसुद्धा उपलब्ध झाल्या आहेत. जनावरांच्या आहार नियोजनानुसार एकदल व द्विदल चारा पिकांचे योग्य पद्धतीने नियोजन करावे. रब्बी हंगामामध्ये सुक्‍या चाऱ्यासाठी (कडबा) ज्वारीची लागवड करावी. रब्बी हंगामामधील कडबा वर्षभर चांगल्या प्रतीचा राहतो. 

ज्वारी -
ज्वारी पिकाची उत्पादनक्षमता, पौष्टिकता चांगली आहे. याचा पाला रुचकर असल्यामुळे जनावरे आवडीने खातात. ज्वारी लागवडीसाठी जमिनीची नांगरणी करून कुळवाच्या दोन- तीन पाळ्या द्याव्यात. पुढील काळातील चाऱ्याची कमतरता लक्षात घेऊन चाऱ्यासाठी ज्वारीच्या शिफारशीत जातींच्या लागवडीचे नियोजन करावे. लागवडीसाठी एम.पी. चारी, निळवा, रुचिरा, पुसा चारी, फुले अमृता या जातींची निवड करावी. चाऱ्यासाठी ज्वारीची लागवड ऑक्‍टोबर महिन्यात पूर्ण करावी. पेरणी तिफणीच्या साह्याने करावी. दोन ओळींतील अंतर 30 सें.मी. ठेवावे. हेक्‍टरी 40 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीच्या वेळी हेक्‍टरी 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. पेरणीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्राची दुसरी मात्रा द्यावी. पिकाची पहिली कापणी पीक फुलोऱ्यात असताना (65 ते 70 दिवस) करावी. पहिल्या कापणीत हेक्‍टरी 500 क्विंटल चारा उत्पादन मिळू शकते; मात्र पीक फुलोऱ्यात येण्याअगोदर जनावरास खाऊ घालू नये. ज्वारी पिकाचा मूरघास तयार करता येतो. 

बरसीम - 
बरसीम हे द्विदल वर्गातील एक महत्त्वाचे चारा पीक आहे. बरसीमचा चारा पालेदार असून सकस व रुचकर असतो. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 17 ते 19 टक्के इतके असते. बरसीम पिकासाठी मध्यम व भारी, तसेच चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. या पिकाच्या पेरणीकरिता जमीन भुसभुशीत असणे आवश्‍यक आहे. त्याकरिता जमीन खोलवर एकदा नांगरून घ्यावी व त्यानंतर दोन वेळा कुळवावी. किंवा रोटाव्हेटरच्या साह्याने जमीन भुसभुशीत करावी. लागवड ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यांत करावी. लागवडीसाठी वरदान, जे.बी.1, जे.एच.बी. 146 हे जास्त उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी. प्रति हेक्‍टरी लागवडीसाठी 30 किलो बियाणे लागते. पेरणी करण्यापूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 200 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणीपूर्वी प्रति हेक्‍टरी 15 ते 20 टन शेण खत जमिनीत मिसळून द्यावे. तसेच पेरणीपूर्वी माती परीक्षणानुसार 15 किलो नत्र, 90 किलो स्फुरद व 30 किलो पालाश प्रति हेक्‍टरी द्यावे. घासाची कापणी झाल्यानंतर खुरपणी करून शेत तणविरहित ठेवावे. पेरणी केल्यानंतर पहिली कापणी साधारणपणे 45-50 दिवसांनी करावी. त्यानंतरच्या कापण्या 25-30 दिवसांच्या अंतराने कराव्यात. अशा प्रकारे बरसीम पिकाच्या तीन-चार कापण्या मिळतात. योग्य व्यवस्थापन केल्यास तीन-चार कापणीचे चारा उत्पादन 600 ते 800 क्विंटल प्रति हेक्‍टर इतके मिळते. 

लसूणघास - 
हे अतिशय लुसलुशीत, हिरवेगार व पौष्टिक चारा पीक आहे. या पिकामध्ये 19 ते 22 टक्के प्रथिने आहेत. लागवडीसाठी मध्यम ते भारी, पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी. लागवड ऑक्‍टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत करावी. जमिनीची चांगली मशागत करून लागवडीसाठी 5 मीटर x 3 मीटर आकाराचे गादीवाफे तयार करून 30 सें.मी. अंतरावर लागवड करावी. हेक्‍टरी 25 किलो बियाणे लागते. लागवडीसाठी आर.एल.-88, सिरसा-9, आनंद-2 या जाती निवडाव्यात. पेरणीपूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणूसंवर्धक चोळावे. लागवडीच्या वेळेस माती परीक्षणानुसार 15 किलो नत्र, 150 किलो स्फुरद आणि 40 किलो पालाश द्यावे. त्यानंतर प्रत्येक चार महिन्यांनी 15 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्‍टरी द्यावे. पिकाच्या गरजेनुसार दर पाच ते सहा दिवसांनी पाणी द्यावे. पहिली कापणी 55 ते 60 दिवसांनी व नंतरच्या सर्व कापण्या 25 दिवसांच्या अंतराने कराव्यात. अशा प्रकारे हेक्‍टरी 100 ते 120 टन हिरवा पौष्टिक चारा जनावरांसाठी उपलब्ध होऊ शकतो. 

मका - 
लागवडीसाठी सुपीक, कसदार व निचरायुक्त, मध्यम ते भारी जमीन या पिकाच्या वाढीसाठी आवश्‍यक आहे. लागवडीसाठी जमिनीची एक खोलवर नांगरट करून घ्यावी. नंतर कुळवाच्या दोन ते तीन पाळ्या देऊन जमीन चांगल्याप्रकारे भुसभुशीत करून व्यवस्थितरीत्या शेत तयार करून घ्यावे. रब्बी हंगामाच्यादृष्टीने ऑक्‍टोबर-नोव्हेंबर महिन्यांत लागवड करावी. लागवडीसाठी आफ्रिकन टॉल, मांजरी कंपोझिट, गंगा सफेद-2, विजय या जातींची निवड करावी. वेळेत पेरणी करणे उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. पेरणीसाठी हेक्‍टरी 75 किलो बियाणे लागते. पेरणी पाभरीने 30 सें.मी. अंतरावर करावी. लागवडीपूर्वी दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्‍टर या जिवाणूसंवर्धकाची बीजप्रक्रिया करावी. पेरणीपूर्वी 20 ते 25 गाड्या शेणखत अथवा कंपोस्टखत जमिनीत मशागतीच्या वेळी चांगले मिसळून द्यावे. पेरणीच्या वेळी प्रति हेक्‍टरी 100 किलो नत्र, 50 किलो पालाश आणि 50 किलो स्फुरद द्यावे. पेरणीनंतर साधारणपणे एक महिन्यांनी नत्राचा दुसरा हप्ता हेक्‍टरी 50 किलो या प्रमाणात द्यावा. पीकवाढीच्या सुरवातीच्या काळात एक कोळपणी व एक खुरपणी करावी. पिकाची वाढ व्यवस्थितरीत्या होण्यासाठी सात ते आठ पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. कापणी साधारणपणे पीक 50 टक्के फुलोऱ्यात असताना करावी, म्हणजे पौष्टिक व चवदार चारा आपणाला उपलब्ध होतो. अगोदर किंवा उशिरा कापलेल्या वैरणीत सकसपणा कमी असतो. साधारणपणे योग्य व्यवस्थापनात मक्‍याचे हेक्‍टरी 550 ते 700 क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. 

ओट - 
या पिकाचा पाला हिरवागार, रसाळ, रुचकर व पौष्टिक असून, खोडदेखील रसाळ व लुसलुशीत असते. पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन या पिकास चांगली मानवते. या पिकास भुसभुशीत व खोल नांगरट जमीन मानवते. जमिनीत हवा खेळती राहण्याच्या दृष्टीने एक खोल नांगरट करून एक ते दोन कुळवाच्या पाळ्या घालून जमीन भुसभुशीत करावी. लागवडीसाठी सहा मीटर लांब व तीन ते चार मीटर रुंद वाफे तयार करावेत, यामुळे पुढे क्रमाक्रमाने कापणीचे नियोजन करणे शक्‍य होते. लागवडीसाठी फुले हरिता, केंट, आर ओ 19 या जाती निवडाव्यात. पेरणीसाठी प्रति हेक्‍टरी 100 किलो उत्तम प्रतीचे बियाणे वापरावे. पेरणी 30 सें.मी. अंतरावर पाभरीच्या साह्याने करून लगेच पाणी द्यावे. पिकास पेरणीपूर्वी शक्‍य असल्यास हेक्‍टरी तीन ते चार टन चांगले कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट खत जमिनीत मिसळावे. पेरणीसाठी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 40 किलो स्फुरद व 40 किलो पालाश वापरावे. नत्र खताचा दुसरा हप्ता हेक्‍टरी 50 किलो पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावा. तणनियंत्रणासाठी 25 ते 30 दिवसांनी निंदणी अथवा खुरपणी करणे गरजेचे आहे. त्या पुढील कालावधीत पिकांची उंची व वाढ जलद होत असल्यामुळे तणांचा जोर कमी होत जातो. हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अधिकाधिक प्रमाणात येण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार दहा ते बारा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाच ते सहा पाळ्या द्याव्यात. पहिला कापणी पेरणीनंतर 50 दिवसांनी करावी. दुसरी कापणी 30 दिवसांनी करावी. जातीनुसार प्रति हेक्‍टरी सरासरी एका कापणीद्वारे 400 ते 450 क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. ओल्या हिरव्या चाऱ्यात 22 टक्के प्रथिने आहेत. 

संपर्क - श्री. माने - 9881721022 
(लेखक पशुविज्ञान व दुग्धशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, पुणे येथे कार्यरत आहेत.) 

चारा पिकांचे नियोजन - 
पीकलागवडीची वेळवाणकापणीहेक्‍टरी उत्पादन (टन) 
एकदलज्वारीऑक्‍टोबरअमृता, मालदांडीदोन महिन्यानंतर35-40 
ऑक्‍टोबर- नोव्हेंबरअफ्रिकन टॉलदोन महिन्यानंतर65-70 
ओटऑक्‍टोबर- नोव्हेबंरकेन्ट, आरओ 19 (फुले हरिता) 60पहिली कापणी 55 दिवसांनी नंतरच्या कापण्या 25 दिवसांनी35-40 
द्विदललसूणघासनोव्हेंबर- जानेवारीआरएल 88, आनंद 2, सिरसा 9पहिली कापणी 40 दिवसांनी नंतरच्या कापण्या 25 दिवसांनी100-120 
बरसीमऑक्‍टोबर- नोव्हेंबरवरदान, मेस्कावी, जेबी 9पहिली कापणी 45 दिवसांनी नंतरच्या कापण्या 25-30 दिवसांनी60-70

No comments:

Post a Comment