Sunday, January 13, 2013

उन्हाळ्यासाठी करा चाऱ्याचे नियोजन...

दुग्ध व्यवसायामध्ये सतत हिरव्या व संतुलित चाऱ्याची उपलब्धता ही महत्त्वाची बाब आहे. पावसाळा व हिवाळ्यात मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध असतो; परंतु उन्हाळ्यामध्ये हिरव्या चाऱ्याची फार मोठी कमतरता असते, त्यासाठी हंगामी चारापिकांबरोबर वार्षिक, बहुवार्षिक चारापिके लागवडीचे नियोजन फार महत्त्वाचे आहे. 
पशुपालन व दुग्ध व्यवसायामध्ये हिरव्या 
चाऱ्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या व्यवसायामध्ये एकूण खर्चाच्या 65 ते 70 टक्के खर्च हा खाद्यावरती होत असतो. हंगामी चाऱ्याबरोबरीने बहुवार्षिक चाऱ्याची लागवड केल्यास कोणत्याही हंगामात हिरवा चारा उपलब्ध होऊ शकतो. पशुपालक पारंपरिक पद्धतीने ज्वारी, मका, गवत, ऊस यांचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये करतात. उन्हाळ्यात मुख्यत्वे मका, ज्वारी, संकरित नेपिअर, मारवेल, चवळी इ. चारा पिकांची लागवड केली जाते. या काळातील पाण्याची कमतरता लक्षात घेऊन सध्याची थंडी कमी होताच चारापिकांची लागवड करावी. संकरित नेपिअर, मारवेल ही पिके पावसाळ्यात लावावीत; परंतु पाण्याची मुबलक सोय असल्यास सध्याच्या काळातही लागवड करता येते.
सतत हिरव्या चाऱ्याची उपलब्धता होण्यासाठी बहुवार्षिक चारा पिकांची लागवड योग्य त्या हंगामानुसार होणे गरजेचे असते. बहुवार्षिक चारा पिकांमध्ये एकदा लागवड केल्यानंतर दोन ते तीन वर्षे प्रत्येक हंगामामध्ये सतत हिरवा चारा उपलब्ध होतो. त्यामुळे हिरव्या चाऱ्याची कमतरता उन्हाळ्यामध्ये जाणवत नाही. संकरित नेपिअर, मारवेल, लसूणघास स्टायलो लागवड केल्यानंतर उन्हाळ्यामध्ये मुबलक चारा उपलब्ध होऊ शकतो. शेताच्या बांधावरसुद्धा संकरित नेपिअरसारख्या गवताची लागवड करता येते. याचे नियोजन आतापासूनच करावे. 
चाराप्रक्रिया व अपारंपरिक पिकांचा वापर निकृष्ट दर्जाच्या चाऱ्यावरती प्रक्रिया करून उत्कृष्ट व पौष्टिक चाऱ्यामध्ये रूपांतर करता येते. खरीप व रब्बी हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर सोयाबीन भुस्सा, भुईमूग पाला, तूर भुस्सा, हरभरा व गहू काड भुस्सा, भाताचे काड इ. उपलब्ध असते, त्यावर युरिया, मळी, मीठ, क्षार खनिजे व पाणी यांची प्रक्रिया करून पौष्टिकता वाढविता येते; तसेच पावसाळ्यात व हिवाळ्यात मोठ्या प्रमाणावर मक्‍यापासून मूरघास तयार करून ठेवावा, जेणेकरून उन्हाळ्यात त्याचा वापर करता येतो. पशुखाद्यामध्ये अपारंपरिक झाडांचा उपयोग करावा. अंजन, गिरिपुष्प, वड, बाभूळ इ. झाडांचा पाला खाद्यामध्ये वापरावा.

पशुखाद्यामध्ये एकदल व द्विदल चारापिकांचा समावेश असणे गरजेचे असते. एकाच प्रकारचा चारा सतत देऊ नये. उदा.ः उन्हाळ्यामध्ये चाऱ्याची कमतरता असते, तेव्हा शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाच्या वाढ्याचा उपयोग चारा म्हणून करतात. उसाच्या वाढ्यात 0.5 ते 1.5 टक्के प्रथिने, 05. टक्के स्निग्ध पदार्थ व 9.0 टक्के काष्ठमय तंतू असतात. वरील पोषणमूल्यांचा विचार करता वाळलेल्या एकदल चाऱ्यापेक्षा उसाच्या वाढ्यामध्ये पोषणमूल्ये कमी असतात, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. उसाच्या हिरव्या वाढ्यांत हिरव्या चाऱ्यापेक्षा ऑक्‍झलेट व नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. वाढे मोठ्या प्रमाणात खाऊ घातल्यामुळे ऑक्‍झलेटचा शरीरातील कॅल्शिअमशी संयोग होऊन कॅल्शिअम ऑक्‍झलेट तयार होते आणि ते लघवीवाटे बाहेर पडते, त्यामुळे शरीरातील कॅल्शिअमचे प्रमाण कमी होऊन मूत्राशयावर अनिष्ट परिणाम होतो. तसेच गर्भपात, हाडे ठिसूळ होणे, माजावर न येणे व उत्पादन कमी होणे, तसेच वासरे कमकुवत होणे इ. अडचणी निर्माण होऊ शकतात, त्यासाठी जनावरांना आठ ते दहा किलो वाढे व त्याबरोबर सकस हिरवा द्विदल चारा दहा किलो यांचे मिश्रण करून द्यावा, त्याचबरोबर एक ते दीड किलो अंबोण व 25 ते 30 ग्रॅम क्षार खनिजे द्यावीत.
उन्हाळ्यात दुर्लक्ष नको...
उन्हाळ्यात वातावरणातील तापमान वाढल्यामुळे शरीराचे तापमान वाढले जाते, त्यामुळे धाप लागणे, पाणी जास्त पिणे, चारा कमी खाणे, उष्माघात होणे इ. गोष्टी दिसून येतात. त्यासाठी जनावरांचा गोठा, पाणी व खाद्य या गोष्टींकडे लक्ष देणे महत्त्वाचे असते. उन्हाळ्यात हिरव्या चाऱ्याची कमतरता असल्यामुळे सुका चारा जास्त दिला जातो, त्यामुळे शरीरामध्ये जास्त उष्णता निर्माण होते, त्यासाठी हिरव्या चाऱ्याची व स्वच्छ पाण्याची सोय करणे गरजेचे असते. हिरव्या चाऱ्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखले जाते. सर्वसाधारणपणे जनावरांना हिरवा चारा दिवसा द्यावा, सुका चारा रात्री द्यावा, तसेच स्वच्छ पाण्याची सोय गोठ्यामध्येच करावी.

No comments:

Post a Comment