Wednesday, January 16, 2013

ऊस पिकावरील रोगाचे नियंत्रण


ऊस पिकावर चाबूक काणी, गाभा रंगणे/लाल कांडी, मर, तांबेरा, पोक्का बाईंग, केवडा, अननस (पायनापल), गवताळ वाढ, केवडा, आदी रोगांचा प्रादूर्भाव होतो. ऊस उत्पादनात घट होऊ नये म्हणून या रोगांचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. लागवडीच्या नवीन तंत्रज्ञानाचा काटेकोरपणे वापर करणेही गरजेचे आहे.
महाराष्ट्रातील जमीन व हवामान ऊस लागवडीसाठी अनुकूल व पोषक असले तरी गेल्या काही वर्षांपासून उसाचे उत्पादन घटत आहे. याउलट उत्पादन खर्च मात्र वाढत आहे. ऊस उत्पादन कमी होण्याची अनेक कारणे आहेत. ऊस पिकावर पडणार्‍या रोगांची कारणे शोधून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. ऊस पिकावर चाबूक काणी, गाभा रंगणे, लाल कांडी, मर, तांबेरा, पोक्का बाईंग, केवडा, अननस, गवताळ वाढ, विषाणूजन्य व बुरशीजन्य केवडा रोगांचा प्रादूर्भाव होतो. या रोगांमुळे उत्पादनात घट होते हे लक्षात घेऊन वेळीच रोग नियंत्रण केल्यास रोग आटोक्यात येऊ शकतात.
चाबूक काणी
हा रोग ‘युस्टीलॅगो सायटॅमिनी’ नावाच्या बुरशीमुळे होतो. ऊस पीकवाढीच्या कोणत्याही अवस्थेत हा रोग दिसून येतो. या रोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे रोगट उसाच्या शेंड्यातून काळ्या रंगाचा चाबकाप्रमाणे निमुळता होत जाणारा पट्टा बाहेर येतो. हा काळा रंग म्हणजेच ‘काजळी’ या रोगाचे असंख्य बीजकण असतात. हा रोग लगेच ओळखता येतो. ऊस बारीक होतो. पाने अरुंद व लहान होतात व त्यामुळे उत्पादनात घट होते. या रोगाचा प्रसार बेण्याद्वारे, वार्‍याद्वारे, पाण्याद्वारे होतो. बीजकण निरोगी उसाच्या डोळ्यावर पडतात व त्यावर रोगाचा प्रादूर्भाव होतो.
नियंत्रण
* या रोगाच्या नियंत्रणासाठी निरोगी बेणे वापरावेत. प्रादूर्भाव झालेला ऊस उपटून टाकावा व अशा उसाचा खोडवा घेऊ नये.
* बाष्प उष्ण हवा प्रक्रिया देऊन तयार केलेले मळ्यातील बेणेच नवीन लागवडीसाठी वापरावे.
* लागवडीपूर्वी उसाचे बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम व १०० लिटर पाणी या द्रावणात १० मिनिटे बुडवून नंतर लागवड करावी.
* लागवडीसाठी रोगप्रतिकारक जातीचा वापर करावा. उदा. कोव्हीएसआर-९८०५.
गाभा रंगणे (लाल कांडी)
हा रोग ‘कॉलीटोट्रायकम फालकॅटम’ या बुरशीमुळे होतो. हा रोग सुरुवातीला ओळखता येत नाही. या रोगामध्ये ऊस उभा कापल्यावर आतील भाग तांबडा झालेला दिसतो व त्यातून आंबट अल्कोहोलसारखा वास येतो. ज्या उसाला या रोगाचा प्रादूर्भाव झालेला असतो त्या उसाचे तिसरे किंवा चवथे पान निस्तेज पडून नंतर पूर्ण शेंडा वाळतो. कालांतराने ऊस पोकळ होतो, आकसतो व सालीवर सुरकुत्या पडतात. उसाचे वजनदेखील कमी भरते. रोगाचा प्रसार बेण्याद्वारे होतो.
नियंत्रण
* या रोगाच्या नियंत्रणासाठी निरोगी बेणे वापरावे. उसाला पाणी कमी द्यावे. खोडवा ठेवू नये. ज्या भागात रोगाचा प्रादूर्भाव झालेला असेल, तेथे ३ ते ४ वर्षे उसाचे पीक घेऊ नये.
* पिकांची फेरपालट करावी.
* लागवडीपूर्वी बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम व १०० लिटर पाण्याच्या द्रावणात बुडवून वापरावे.
* रोगग्रस्त शेतातील उसाची कापणी शक्यतो लवकर करावी.
* ऊस कापण्याचा कोयता निर्जंतूक करून घ्यावा.
* ऊसतोड, कापणीनंतर शेतातील पाचट, वाळा, फणकटे जागेवरच जाळून नष्ट करावी.
* रोगप्रतिकारक जातीची लागवड करावी. उदा. को-७३१४, को-५७६७.
तांबेरा
हा रोग ‘पकसीनिया’ नावाच्या बुरशीमुळे होतो. या रोगाची प्रमुख लक्षणे हिवाळ्यात दिसतात. पानांवर तांबड्या रंगाचे पुरळ दिसतात व त्यातून लालसर धूरिकरण बाहेर पडतात.
नियंत्रण
* ऊस पिकाला पाणी बेताने द्यावे व या रोगाचा प्रादूर्भाव झालेल्या पिकाचा खोडवा घेऊ नये.
* या रोगाच्या नियंत्रणासाठी रोगप्रतिबंधक जातीची निवड करावी. उदा. को-६३१९८, को-७२१९.
पोक्का बाईंग
हा रोग ‘फ्युजॅरियम मोनिलीफॉरमी’ या बुरशीमुळे होतो. हा रोग पूर्वी आढळत नव्हता. सध्याच्या वातावरणात तो कुठे, कुठे आढळून येत आहे. ‘पोक्का बाईंग’ याचा अर्थ शेंड्याजवळील पानांचा आकार बदलणे किंवा पोंगा कुजणे असा होतो. उसाच्या कोवळ्या पानांवर पिवळसर पट्टे दिसतात. तसेच शेंड्याकडील पाने एकमेकांमध्ये वेणीसारखी गुंफली जातात. या रोगाची लक्षणे सर्वप्रथम पोंग्याजवळील पानावर दिसतात. रोगाची तीव्रता वाढल्यास सुरकुत्या पडतात, पाने आकुंचित होतात, शेंडा व पोंगा कुजतो. उसाची वाढ खुंटते, फांद्या आखूड होतात. या रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो, तर रोगाची तीव्रता तापमानातील फरकामुळे वाढते.
नियंत्रण
* उसाची लागवड लवकर करावी.
* रोगाची लागण दिसल्यास २० ग्रॅम कॉपर ऑक्सिक्लोराईड, २० ग्रॅम मॅन्कोझेब अथवा १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पायनापल (अननस) रोग
हा रोग ‘सेरॅटोसिस्टीस पॅराडोक्सा’ या जमिनीत राहणार्‍या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार ऊस लागवड झाल्यानंतर दिसून येतो. बेण्यावर रोगाचा प्रादूर्भाव झाल्यास बेणे उगवत नाही. प्रादूर्भाव झालेली ऊस कांडी वजनास हलकी व करड्या रंगाची होऊन कुजलेल्या अवस्थेत दिसते. कांडीवरील डोळे कुजतात. त्यामुळे उसाची उगवण होत नाही व रोगाची तीव्रता वाढल्यास प्रथम पाने वाळतात व नंतर संपूर्ण रोप वाळते. रोगट उसाच्या कांड्यांचा वास अननस फळाच्या वासासारखा येतो, म्हणून याला ‘अननस रोग’ म्हणतात. या रोगाचा प्रसार मुख्यतः जमिनीद्वारे होतो. क्वचित उंदरामुळे, किडीमुळे अथवा अवजारांमुळे उसाला इजा झाल्यासही होतो.
नियंत्रण
* निरोगी बेणे वापरावे. पाण्याचा योग्य निचरा झालेली जमीन निवडावी. उसाची लागवड जास्त खोल करू नये. लागवडीपूर्वी बेणे १०० ग्रॅम कार्बेन्डॅझिम अथवा ५० ग्रॅम बेलेटॉन १०० लिटर पाण्यात मिसळावे व या द्रावणात बेणे १० मिनिटे बुडवून लागवड करावी.
केवडा (लोह कमतरता)
हा रोग लोह या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे दिसून येतो. या रोगाचा प्रादूर्भाव मुख्यतः पांढरीच्या किंवा पोयट्याच्या जमिनीत आढळतो. अशा जमिनीत कॅल्शियम व मॅग्नेशियम या क्षारांचे प्रमाण अधिक असल्यास लोह या अन्नद्रव्याची उपलब्धता कमी होते. त्यामुळे उसावर ‘केवडा’ दिसून येतो. रोगाच्या सुरुवातीला शिरांचा हिरवटपणा नष्ट होऊन उसाच्या शेंड्याकडील पाने पिवळी पडतात. पिकास निस्तेजपणा येतो. रोगाचा प्रादूर्भाव तीव्र स्वरूपाचा असल्यास पाने पूर्णपणे पांढरट होतात व केवड्याच्या पानांसारखी दिसू लागतात. रोगग्रस्त उसाची उंची, कमी कांड्या बारीक होतात.
नियंत्रण
* हेक्टरी २.५ किलो हिराकस (फेरस सल्फेट) ५०० लिटर पाण्यात मिळसून १० ते १२ दिवसांच्या अंतराने ३ ते ४ फवारण्या कराव्यात.
* हिरवळीची पिके घ्यावीत. गंधकयुक्त खताचा वापर करावा. उसाची लागवड चुनखडीच्या जमिनीत करू नये. हेक्टरी १० किलो हिराकस कम्पोस्ट किंवा शेणखतात मिसळून लागवडीपूर्वी जमिनीत टाकावे.
मर
हा रोग ‘फ्युजॅरियम मोनिलीफॉरमी’ या बुरशीमुळे होतो. रोगाचा प्रादूर्भाव झालेल्या उसाची पाने पिवळसर आणि निस्तेज होतात व नंतर वाळतात. रोगाचा प्रादूर्भाव वाढल्यास ऊस पूर्णपणे वाळतो, पोकळ होतो व वजनाला हलका भरतो. मुळ्या कुजतात व ऊस अलगदपणे उपटून येतो. ऊस कांड्यांचे समान दोन भाग केल्यास कांड्यांच्या आतील भाग करड्या रंगाचा व लालसर पडलेला दिसतो. बराचसा भाग तंतूमय झालेला दिसतो. या रोगाचा प्रादूर्भाव देठ कुजणे किंवा मूळ पोखरणार्‍या अळीच्या संयोगाने होतो.
नियंत्रण
* लागवडीपूर्वी १० ग्रॅम कार्बेन्डॅझिम १०० लिटर पाण्यात मिसळून त्यात उसाचे बेणे बुडवून लागवड करावी.
* निरोगी बेणे वापरावे. रोगट उसाचा खोडवा ठेवू नये.
* मुळे पोखरणार्‍या किडीचा बंदोबस्त करावा. फेरपालटाची पिके घ्यावीत.
बुरशीजन्य केवडा
हा रोग ‘स्न्लेरोस्पोरा सॅकॅरी’ या जमिनीत राहणार्‍या बुरशीमुळे होतो. सुरुवातीला झाडांची पाने वरच्या बाजूने पिवळसर होऊन पानाच्या खालील बाजूस बुरशीची वाढ दिसून येते. झाडाची वाढ खुंटते. रोग बळावल्यानंतर रोगट पाने लांबीच्या दिशेने फाटतात. या रोगाचा प्राथमिक प्रसार जमिनीतील लैंगिक बीजाणूद्वारे होतो व दुय्यम प्रसार अलैंगिक बीजाणूद्वारे होतो. या रोगास ढगाळ वातावरण, हवेतील जास्तीची आर्द्रता पोषक असते.
नियंत्रण
* निरोगी बेणे वापरावे.
* लागवडीपूर्वी बेण्यास बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून घ्यावी.
* रोगप्रतिकारक जातीचा वापर करावा व जमिनीची फेरपालट करावी.
विषाणूजन्य केवडा
हा विषाणूजन्य रोग असून, या रोगाची लक्षणे अनियमित आकाराच्या पिवळसर पट्ट्यांच्या स्वरूपात दिसून येतात. रोगट उसाच्या फुटव्यावरसुद्धा या रोगाची लक्षणे आढळतात. हा रोग ‘सॅकॅरम व्हायरस-१’ किंवा ‘शुगरकेन व्हायरस-१’ मुळे होतो. या रोगाचा प्रादूर्भाव मका, ज्वारी व इतर गवतावरसुद्धा आढळून येतो. रोगट बेणे तसेच शेतातील गवत व किडीद्वारे रोगाचा प्रसार होतो. मावा ही कीड या रोगाच्या दुय्यम प्रसारासाठी कारणीभूत ठरते.
नियंत्रण
* रोगमुक्त बेण्यांचा वापर करावा. रोगट झाडे शोधून नष्ट करावीत.
* मावा किडीचा किटकनाशकाद्वारे प्रतिबंध करावा.
* लागवडीसाठी रोगप्रतिकारक जातींची निवड करावी.
गवताळ वाढ
हा रोग ‘मायकोप्लाझमा’ नावाच्या अतिसूक्ष्म जिवाणूमुळे होतो. या रोगाची प्रमुख लक्षणे म्हणजे उसाच्या बुंध्यापासून किंवा खोडव्यापासून असंख्य फुटवे फुटतात. फुटवे बारीक पिवळसर, पांढरट रंगाचे, अरुंद व लहान असतात. जास्त फुटव्यांमुळे बेण्याला गवताच्या बेटासारखे स्वरूप येते, म्हणून या रोगाला ‘गवताळ वाढ’ म्हणतात. रोगग्रस्त बेण्यापासून एकही ऊस तयार होत नाही. रोगाचा प्रादूर्भाव जास्त झाल्यास २० ते २५ टक्क्यांपर्यंत उत्पादनात घट येते.
नियंत्रण
* लागवडीसाठी निरोगी बेण्याचा वापर करावा. गवताळ वाढीचे बेणे मुळासकट काढून नष्ट करावे. रोग झालेल्या उसाचा खोडवा ठेवू नये.
* बेणे लागवडीपूर्वी ५०० किंवा १००० पीपीएम लिंडरमायसीनमध्ये बुडवून ठेवावे.
* किटकनाशके वापरून मावा किडीचे नियंत्रण करावे.
* लागवडीकरिता रोगप्रतिकारक जातींची निवड करावी. उदा. कोव्हीएसआर-९८०५, कोव्हीएसआर-४९४.
- करुणा कुर्‍हाडे
- रवींद्र चव्हाण
- रमेश लव्हेकर
- विद्या भगत
- पंडितराव खळीकर

कृषी महाविद्यालय, नायगाव (बाजार), जि. नांदेड, दूरध्वनी क्र. ०२४६५-२६२५९९

No comments:

Post a Comment