Wednesday, April 17, 2013

दुग्ध व्यवसायातून साधली 'अर्थ'पूर्ण प्रगती

यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी आता शेतीसोबतच जोडधंद्यातून आर्थिक स्थैर्य मिळवू लागले आहेत. यापैकीच एक आहेत महागाव येथील मनेश हिंगाडे. कोरडवाहू शेतीला त्यांनी दुग्ध व्यवसायाची जोड दिली. शेतीला पूरक म्हणून सुरू केलेला दुग्ध व्यवसाय आता त्यांचा मुख्य व्यवसाय झाला आहे. पशुपालनाचा त्यांना शेतीच्या विकासासाठी चांगला फायदा झाला आहे. 

यवतमाळ जिल्ह्यातील महागावमध्ये मनेश हिंगाडे यांची बारा एकर शेती आहे. कोरडवाहू शेतीच्या बरोबरीने आर्थिक स्थैर्यासाठी कोणता पूरक व्यवसाय करावा? याचा अभ्यास करताना त्यांना पशुपालनातून चांगला नफा मिळेल असे लक्षात आले. सन 2004 मध्ये त्यांनी एका जर्सी गाईपासून दुग्ध व्यवसायाची सुरवात केली. दुधापासून मिळणारे उत्पन्न लक्षात आल्यावर त्यांनी टप्प्याटप्प्याने होल्स्टिन फ्रिजियन आणि जर्सी गाईंची खरेदी सुरू केली. गाई खरेदी करताना त्यांचे आरोग्य, दूध उत्पादन याचाही अभ्यास केला. अपेक्षित दूध उत्पादन देणाऱ्या गाई गोठ्यात आल्याने त्यांनी आणखी काटेकोरपणे व्यवस्थापनास सुरवात केली. गाई विकत घेण्यासाठी शेती उत्पन्नातील पैसा खर्च न करता दूध व्यवसायातून मिळणारा नफ्यातूनच गाईंची खरेदी केली. गाईंच्या चांगल्या व्यवस्थापनासाठी हिंगाडे यांनी शेताच्या जवळ 30 गुंठे जागेत गोठा बांधला आहे. गोठ्याचा आकार 60 x 30 फूट आहे. या गोठ्यात सध्या 20 गाई आहेत. यात तेरा होल्स्टिन फ्रिजियन, पाच जर्सी, एक फुले त्रिवेणी आणि एक देशी गाय आहे. याचबरोबरीने जवळच कालवडींचा स्वतंत्र गोठा, चारा साठवणीची जागा, गांडूळ खत प्रकल्प, व्हर्मीवॉश निर्मिती, शेणखताचा डेपो, लहानसा कुक्कुटपालन प्रकल्प, तसेच गोठ्याचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्यांच्या निवासाची सोय केलेली आहे. 

गाईंसाठी सकस चारा ः 

चारा व्यवस्थापन योग्य असल्यास दुधाचे उत्पादन चांगले मिळते असा हिंगाडे यांचा अनुभव आहे. गाईंच्या खाद्यामध्ये कोरडा व हिरव्या चाऱ्याचा समावेश असतो. दर दिवशी प्रत्येक गाईला 20 किलो हिरवा चारा आणि दहा किलो कोरडा चारा दिला जातो. खाद्यामध्ये सोयाबीन भुसा, हरभरा भुसा, गहू भुसा व ज्वारी कडब्याचा वापर केला जातो. कोरडा चारा गावातील शेतकऱ्यांकडून खरेदी करून गोठ्याजवळच साठविला आहे. चाऱ्याच्या बरोबरीने पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार गाईंना खनिज मिश्रणही दिले जाते. 
दुधाळ जनावरांना वर्षभर हिरवा चारा पोटभर मिळणे हे दूध उत्पादनाच्यादृष्टीने महत्त्वाचे आहे. यासाठी हिंगाडे यांनी 12 एकर क्षेत्रापैकी चार एकर शेत्रावर चारा पिकाची लागवड केली आहे. वर्षभर चारा उपलब्ध होईल अशा पद्धतीने वर्षभर टप्प्याटप्प्याने लागवडीचे नियोजन आहे. चारा पिकाचा एक पट्टा कापणीस आला की दुसऱ्या पट्ट्याची लागवड केली जाते. या दरम्यान तिसऱ्या पट्ट्यात पीक वाढत असते. चारा पिकातून सर्व अन्नघटक गाईंना मिळावेत याकडे हिंगाडे यांचे लक्ष आहे. चाऱ्याच्या प्रत्येक वाणाची वेगळ्या क्षेत्रात पेरणी न करता एका सरीमध्ये नेपिअर गवताच्या जयवंत जातीची, दुसऱ्या सरीमध्ये फुले यशवंत जातीची लागवड आहे. तिसऱ्या सरीत बरसीम लागवड केली आहे. कापणी करताना चारही सऱ्यांतील गवत कापले जातात. हा एकत्रित चारा कुट्टी यंत्रातून कुट्टी करून गाईंना दिला जातो. चारा लागवडीपासून ते कापणीपर्यंत योग्य नियोजन केल्याने गाईंना पोषणयुक्त आहार मिळतो. याशिवाय मारवेल, मका, चवळी आणि बरसीम या चारा पिकांची लागवड त्यांनी केली आहे. 

स्वच्छता महत्त्वाची ः 
स्वच्छता हा जनावरांना आजारापासून दूर ठेवण्याचा सर्वांत चांगला मार्ग आहे. याबाबत हिंगाडे म्हणाले, की गोठा नेहमी स्वच्छ राहावा यासाठी दोन माणसे दिवसभर आळीपाळीने काम पाहतात. जनावरांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविले जाते. गाईंना रोज धुतले जाते. पुरेशा पाणी उपलब्धतेसाठी गोठ्याजवळच एक विंधन विहीर खोदली आहे. उन्हाळ्यात गाईंना उष्ण वाऱ्याचा त्रास होतो, त्याचा दूध उत्पादनावर थेट परिणाम होतो. गोठ्यातील तापमान थंड ठेवण्यासाठी त्यांनी गोठ्यामध्ये सूक्ष्म तुषार सिंचन बसविले आहे. 
पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार गाईंना लाळ्या खुरकूत, घटसर्प व फऱ्या रोगप्रतिबंधक लसीकरण करून घेतात. गरजेनुसार जंतनाशन केले जाते. दुधाळ गाईंना सर्वांत जास्त धोका कासदाहाचा असतो. हा आजार झाल्यावर जनावरांची खूप काळजी घ्यावी लागते. हा आजार होऊ नये म्हणून पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार भाकड काळातील नियोजन, कासेची स्वच्छता, गरजेनुसार औषधोपचार वेळेवर केले जातात. यंत्राने गाईंचे दूध काढले जाते. रेतनासाठी वळू सांभाळला आहे. जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनाच्यादृष्टीने मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब आता सुरू करणार आहे. 

शेणखत आणि गांडूळ खताची उपलब्धता ः 

दुग्ध व्यवसायामुळे हिंगाडे यांच्याकडे दरवर्षी सरासरी 60 ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. गोठ्यातील गोमूत्र शेणखताच्या युनिटमध्ये सोडले आहे. शेणखताच्या बरोबरीने हिंगाडे यांनी गांडूळ खताचा प्रकल्प उभारला आहे. या प्रकल्पातून दर महिन्याला तीन क्‍विंटल गांडूळ खताचे उत्पादन मिळते. गांडूळ खतातून व्हर्मीवॉश गोळा करण्यासाठी त्यांनी सिंमेटचे टाके बांधले आहे. त्यात दरमहा 500 लिटर व्हर्मीवॉश गोळा होते. शेणखत, गांडूळ खत, व्हर्मीवॉश आणि कोंबडीखताचा वापर शेतीमध्येच केला जातो. शिल्लक राहिलेले शेणखत, गांडूळ खत परिसरातील शेतकऱ्यांना विकले जाते. 

दूध विक्रीचे नियोजन ः 
गोठ्यातील 20 गाईंपैकी सध्या 10 गाई दुधात आहेत. या गाईंपासून दररोज 130 ते 150 लिटर दूध मिळते. दूध विक्रीबाबत हिंगाडे म्हणाले, की बाजार शोधण्याच्या प्रयत्नातूनच मी गावात हॉटेल सुरू केले. यामुळे लहान भावालाही रोजगार उपलब्ध झाला आणि दूध विक्रीचा प्रश्‍न मिटला. सरासरी 20 रुपये प्रति लिटर असा दर मी धरला आहे. दुधापासून दही, पेढा, खवा, श्रीखंड, पनीर तयार करून विक्री केली जाते. या उत्पादनांचा चांगला दर्जा असल्याने ग्राहकांकडून चांगली मागणी असते. साधारणपणे दरमहा वीस गाईंचा व्यवस्थापनाचा खर्च वजा करता सरासरी 25 हजार रुपये नफा मिळतो. 

पीक उत्पादनातही वाढ ः दुग्ध व्यवसायातील नफ्यातून हिंगाडे यांनी बारा एकर शेती ठिबक खाली आणली आहे. या लागवड क्षेत्रात चार एकरावर चारा पीक, तीन एकर केळी, अडीच एकर हळद, एक एकर आले आणि एक एकर सोयाबीनची लागवड केली आहे. पिकांसाठी शेणखत व कंपोस्ट खताचा वापर केला जातो. शेणखत, गोमूत्र, व्हर्मिवॉश, गांडूळ खताच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता कायम राखली गेल्याने पीक उत्पादनातही वाढ मिळत आहे. गेल्या वर्षी त्यांना दीड एकर केळीपासून एक लाख 40 हजारांचे उत्पादन मिळाले आहे. 32 गुंठे क्षेत्रांत त्यांना 150 क्विंटल ओल्या हळदीचे उत्पादन मिळाले, परंतु सध्या हळदीला भाव न मिळाल्याने प्रक्रिया करून ठेवली आहे. हिंगाडे हे कृषी विद्यापीठ तसेच कृषी विभागातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतात. त्यांना सेंद्रिय शेती कृती आराखडाअंतर्गत गांडूळ खत युनिटसाठी 25 हजारांचे अनुदान, राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत केळीसाठी 24 हजार 960 रुपयांचे अनुदान मिळाले. शेतात जाण्यासाठी 500 मीटर लांबीचा रस्ताही स्वखर्चातून बनविला आहे. दरवर्षी पीक नियोजनातून त्यांना 3.5 लाख रुपये उत्पन्न मिळते. गांडूळ खत विक्रीतून 40 हजार रुपये, शेणखत विक्रीतून एक लाख रुपये आणि गवताचे ठोंब विक्रीतून 50 हजार रुपये उत्पन्न मिळते. दुग्ध व्यवसायातील प्रगती लक्षात घेऊन त्यांना यवतमाळ जिल्हा परिषदेच्या उत्कृष्ट पशुपालक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. 

कुक्कुटपालनाला सुरवात ः 
दुग्ध व्यवसायासोबत हिंगाडे यांनी कुक्‍कुटपालन सुरू केले आहे. त्यांच्याकडे सध्या 300 गिरिराजा आणि 500 ब्रॉयलर कोंबड्या आहेत. कुक्‍कुटपालनासाठी त्यांनी 250 कोंबड्यांचे दोन युनिट उभे केले. आता अंडी व कोंबड्यांच्या विक्रीतून त्यांना उत्पन्न सुरू झाले आहे. साधारण 45 दिवसांत एका कोंबडीसाठी 70 रुपये खर्च होतात. साधारण 150 रुपयाला एका कोंबडीची विक्री होते. कुक्‍कुटपालनासाठी अनुदान मिळाले आहे. 

ऍग्रोवन ठरला मार्गदर्शक ः 
मनेश हिंगाडे हे दररोज ऍग्रोवन वाचतात. याबाबत ते म्हणाले की, पीक व्यवस्थापनाच्याबरोबरीने मुक्त गोठा, कुक्कुटपालन, जनावरांच्या आजारावरील औषधोपचार आणि घ्यावयाची दक्षता याबाबतची माहिती मला मिळतो. त्याचा फायदा मला पीक उत्पादन आणि जनावरांच्या व्यवस्थापनासाठी झाला आहे. 
------------------------------------------------ 
संपर्क ः मनेश हिंगाडे ः 9423432649

No comments:

Post a Comment