Monday, April 22, 2013

कमी पाण्यात जोपासा ऊस -

या वर्षीच्या दुष्काळी स्थितीमुळे खात्रीशीर भागातही उसाला पाणी कमी पडू लागले आहे. मार्च ते जून या कालावधीत तीव्र उष्णतामान व पाण्याची कमतरता यामुळे आडसाली, पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा या सर्व पिकांच्या या कालावधीत येणाऱ्या वाढीच्या अवस्थेवर परिणाम होणार आहे. म्हणून या कालावधीत सर्व हंगामांतील पीकवाढीच्या अवस्थांचा अभ्यास करून उपाय योजना करावी. 
डॉ. सुरेश पवार 
सध्याच्या वाढत्या तापमानाच्या काळात मुख्यत्वे हवेतील व जमिनीतील तापमानात वाढ झाल्यामुळे ऊस पिकातील ओलाव्यात घट होते. या काळात वर्षातील बाष्पीभवनापैकी 40 ते 45 टक्के म्हणजे निम्मे बाष्पीभवन होते, तर जुलै ते ऑक्‍टोबर महिन्यात 30 ते 35 टक्के आणि उरलेले 35 टक्के नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात होते. सध्या दिवसाचा कालावधी जास्त असतो. दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी होतो म्हणजेच रात्रीचे तापमान वाढलेले असते. 

जमिनीतील उपलब्ध पाणी कमी होऊन, मुळांच्या आसपासचे तापमान वाढून त्यांची कार्यक्षमता कमी होते. परिणामी मुळांद्वारे पाणी व अन्नद्रव्यांच्या शोषणात घट होते. उसाच्या पानांवरील पर्णरंध्रांद्वारे होणारे बाष्पीभवन कमालीचे वाढते. 

या सर्व परिस्थितीमुळे ऊस पिकास पाण्याचा ताण बसतो आणि पिकाची वाढ समाधानकारक होत नाही. पाणीटंचाईमुळे ऊस पिकावर दुष्परिणाम होऊन उत्पादनात लक्षणीय घट होते. मुख्यत्वेकरून आडसाली उसाच्या उत्पादनावर विपरीत परिणाम होतो. कारण हा ऊस पूर्ण वाढीच्या अवस्थेत असतो. पूर्व हंगामी ऊस हा पूर्ववाढीच्या अवस्थेत असतो. या उसाची वाढ खुंटते, कांड्यांची लांबी व जाडी कमी होते. सुरू आणि खोडवा उसाला फुटव्यांचे प्रमाण कमी होऊन गाळपालायक उसांची संख्या कमी होते. 

पाण्याच्या ताणाचे पिकावर होणारे परिणाम - पिकाची पाने बुडख्याकडून शेंड्याकडे वाळत जातात. 
- मुळांची कार्यक्षमता घटते, त्यामुळे पाणी व अन्नद्रव्यांचे अपुरे शोषण होऊन प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. 
- अन्नरसाचे विविध भागांना होणारे वहन कमी होते. 
- पानांतील हरितद्रव्यांचे प्रमाण घटते. 
- उसातील तंतुमय पदार्थांचे प्रमाण वाढून उसात दशीचे प्रमाण वाढते. 
- सुरू आणि खोडवा उसात फुटव्यांचे प्रमाण कमी होऊन गाळपालायक उसाच्या संख्येत घट झाल्याने ऊस उत्पादन घटते. 
- पूर्व हंगामी व आडसाली उसाची वाढ खुंटून कांड्यांची लांबी व जाडी कमी होते. 

पीक व्यवस्थापन - बाष्पीभवन पात्राचा वापर करून एकूण 75 मि.मी. बाष्पीभवन झाल्यावर पिकाला पाणी द्यावे. 
- गांडूळ खताचा वापर हेक्‍टरी पाच ते सात टन इतका करावा. 
- पाण्याच्या पाळीतील अंतर ठरविण्यासाठी टेन्सिओमीटर या उपकरणाचा वापर करावा, त्यामुळे प्रति हेक्‍टरी पाणी कमी लागते. 
- उन्हाळ्यात पिकाला पाण्याचा ताण सहन करण्याची सवय लावण्यासाठी एक डिसेंबरपासून फेब्रुवारीअखेरपर्यंत पाण्याची पाळी दोन- तीन दिवसांनी वाढवत जावी, त्यामुळे पिकाची पाण्याचा ताण सहन करण्याची नैसर्गिक क्षमता वाढते. यामुळे पिकाची मुळे अधिक खोलवर जाऊन खालच्या थरातील उपलब्ध पाण्याचा वापर करतात. 
- जमिनीतील उपलब्ध पाण्याचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांच्या आसपास घटेल तेव्हाच पाणी द्यावे. ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देण्याची पद्धत अवलंबावी. या पद्धतीत 50 टक्के पाण्याची बचत होते, उत्पादनातही वाढ होते. 
- सऱ्या समपातळीत ओढाव्यात. 
- पालाश खताची जादा मात्रा (60 कि.ग्रॅ. / हे.) लागणीच्या वेळेस जमिनीतूनच द्यावी. 
- लागवड करताना बेणे म्युरेट ऑफ पोटॅश खताचे दोन टक्के द्रावण अथवा चार टक्के मॅंगेनीज सल्फेट द्रावण अथवा चार टक्के .....हिराकसच्या (फेरस सल्फेट) द्रावणात पाच मिनिटे बुडवून मगच लावावे. 
- युरिया दोन टक्के (20 ग्रॅम प्रति लिटर पाणी), म्युरेट ऑफ पोटॅश दोन टक्के (20 ग्रॅम प्रति लिटर पाणी) या प्रमाणात संयुक्‍त द्रावण तयार करून त्याची फवारणी पिकावर त्याच्या वयाच्या 60, 120 व 180 व्या दिवशी करावी. 
- चुनखडीचे पूर्ण विद्राव्य स्वरूपातील दोन टक्के द्रावण तयार करून त्यात बेणे दोन तास बुडवून मगच लावावे. 
- उसाचे पाचट सरीत पसरून त्यावर प्रति टन पाचटासाठी आठ किलो युरिया व दहा किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि एक किलो पाचट कुजविणाऱ्या जिवाणूंचा वापर करावा. 
- पाण्याच्या दोन पाळींतील अंतर 20 दिवसांपेक्षा जास्त वाढणार नाही याची काळजी घ्यावी. 
- वाऱ्यापासून संरक्षण म्हणून शेताच्या पश्‍चिमेस व उत्तरेस शेवरी लावावी, त्यामुळे बाष्पीभवनाचा वेग नियंत्रित होतो. 
- शेतातील पालापाचोळा व सेंद्रिय पदार्थ शेतातच गाडून हे खत उसासाठी वापरावे, यामुळे जमिनीतील कर्बाचे प्रमाण वाढून पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 

पाण्याचा ताण पडणाऱ्या उसासाठी उपाययोजना - - पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातीची लागवड करावी (उदा. को 86032 आणि फुले 0235). 
- पाण्याची कमतरता पडेल असे वाटत असेल तर उसाची लागवड जोड ओळ पद्धत किंवा एक आड एक सरीत करावी. ज्या भागात नेहमीच पाण्याचा ताण पडतो किंवा पाटपाण्याच्या पाळ्या सुटतात, अशा भागात उसासाठी लागवडीच्या वेळेस पालाश खताची मात्रा हेक्‍टरी 25 टक्के वाढवून द्यावी. 
- पाणी कमी असते त्या वेळी उसाला एक आड एक सरीस पाणी द्यावे. म्हणजे पहिल्या वेळी ज्या सरीला पाणी मिळेल, त्यानंतर तिसऱ्या पाण्याच्या वेळीच तिला पाणी मिळेल. 
- पाण्याचा ताण पडल्यास किंवा अचानक अवर्षण परिस्थिती आल्यास ऊस पिकातील खालची पक्व झालेली तसेच वाळलेली पाने काढून ती आच्छादन म्हणून सरीत पसरावीत. 
- लागवडीच्या ऊस पिकात तसेच खोडवा पिकास हेक्‍टरी पाच ते सहा टन पाचटाचे आच्छादन करावे. 
- पीक नेहमी तणविरहित ठेवावे. 
- पिकास पाण्याचा ताण पडतो त्या वेळी दर 21 दिवसांनी दोन टक्के पालाश + दोन टक्के युरिया यांचे मिश्रण करून फवारणी करावी. 
- उन्हाळ्यात तापमान वाढले व पाण्याची कमतरता असल्यास आठ टक्के केओलीन बाष्परोधकाची फवारणी करावी. 
- ज्या ठिकाणी पाण्याची कमतरता असेल अशा ठिकाणी पाटाने पाणी देण्याच्या पद्धतीऐवजी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. 

उसाला करा ठिबक सिंचन - - ऊस पिकाच्या कार्यक्षेत्राच्या फक्त 70 टक्के भागातच पाणी दिल्यामुळे पाण्याची बचत 50 टक्‍क्‍यांपर्यंत होते. 
- उपलब्ध पाण्यातच दुप्पट जमीन ओलिताखाली आणता येते. 
- जमीन सतत वाफसा अवस्थेत राहून जमिनीत पाणी- प्राणवायूचे प्रमाण योग्य साधले जाते, त्यामुळे पिकाला गरजेनुसार पाण्याची व अन्नद्रव्याची उपलब्धता होऊन उत्पादनात 15 ते 20 टक्के वाढ होते. 
- ठिबक सिंचनातून पाण्यात विरघळणारी विद्राव्य खते (उदा. युरिया, पांढरे म्युरेट ऑफ पोटॅश) देता येतात. खतांच्या कार्यक्षम वापरामुळे खत मात्रेत 25 टक्‍क्‍यांपर्यंत बचत करता येते. 
- पाण्याच्या मर्यादित वापरामुळे उसातील साखर उतारा वाढतो. 
- पाण्याच्या कमी वापरामुळे जमिनी क्षारयुक्‍त होण्याचा धोका कमी होतो. 
- पृष्ठभागावरील जमिनीचा बराच भाग कोरडा राहत असल्याने तणांचा उपद्रव कमी होतो. 

संपर्क - 02169 - 265334 
(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा येथे ऊस विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment