Monday, April 22, 2013

गुजरातच्या शेतकऱ्याने घेतले एकरी 35 टन विक्रमी बटाटा उत्पादन



बटाटा उत्पादनासाठी गुजरातमध्ये पालमपूर व बनारसकंठा जिल्हे सर्वोत्तम समजले जातात. इथल्या मातीत बटाट्यातील साखरेची पातळी, शुष्क घटकांचे प्रमाण सर्वोत्तम पातळीत राखले जाते असा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. याच बनारसकंठा जिल्ह्यातील उच्चशिक्षित शेतकरी पोलिस अधिकारी पार्थीभाई जेठाभाई चौधरी यांनी बटाट्याचे आठ एकर क्षेत्रात एकरी सुमारे 35 टन एवढे विक्रमी उत्पादन घेतले आहे. कदाचित हा जागतिक विक्रम असण्याची शक्‍यता आहे. सुपीक मातीला सुधारित तंत्रज्ञान, उच्च उत्पादनक्षम वाण, यांत्रिकीकरण, सूक्ष्म सिंचन व काटेकोर शेतीची जोड देत त्यांनी हे यश संपादित केले आहे. 
संतोष डुकरे

पार्थीभाई चौधरी यांची शेती पालमपूरपासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर धांतीवाडा कृषी विद्यापीठ रस्त्यावर डांगीया गावात आहे. एप्रिल 2010 मध्ये त्यांनी बटाट्याचे विक्रमी उत्पादन मिळविले. एकरी 25 टन उत्पादन मिळण्याचा त्यांना विश्‍वास होता. त्यानुसार त्यांनी जिल्हा प्रशासनाला पत्र दिले. फेब्रुवारी 2010 मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रशासन, विद्यापीठ व तज्ज्ञांच्या समितीच्या उपस्थितीत पीक काढणी करण्याचे निश्‍चित केले. या समितीमध्ये जिल्हाधिकारी श्री. पटेल, धांतीवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. महेश्‍वरी, उप विभागीय अधिकारी श्री. विराणी, फलोत्पादन संचालक आर. के. चौधरी, बटाटा संशोधक नारणभाई पटेल व जिल्हा कृषी अधीक्षक श्री. परमार यांचा समावेश होता. 

समितीच्या उपस्थितीत आंतरराष्ट्रीय मानकांनुसार सात एप्रिल 2010 रोजी बटाट्याची काढणी करण्यात आली. प्रसिद्धिमाध्यमांच्या उपस्थितीत पीक काढणीचे व्हिडिओ शूटिंग करण्यात आले. इलेक्‍ट्रॉनिक वजन काट्यावर वजन केल्यानंतर हेक्‍टरी 87.188 टन उत्पादन मिळाल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा प्रशासनाने लगेच याची नोंद घेऊन थेट मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत माहिती पाठविली. दुसऱ्या दिवशी कृषिमंत्र्यांच्या हस्ते विक्रमी उत्पादनाबाबत श्री. चौधरी यांचा सन्मान करण्यात आला. पाठोपाठ मुख्यमंत्री मोदी यांनी श्री. चौधरी यांचा गौरव केला. 

आपल्या बटाटा उत्पादन तंत्राविषयी श्री. चौधरी म्हणाले, की गेल्या वर्षी मी एका खासगी वाणाची 70 एकर क्षेत्रावर लागवड केली होती. त्यापासून एकरी 17.5 टन उत्पादन मिळाले. पंजाबवरून आणलेल्या चिपसोना वाणाची पाच एकर क्षेत्रावर लागवड केली होती. त्यापासून एकरी 17.5 टन उत्पादन मिळाले. याच खरिपात अन्य एका खासगी जातीच्या बियाण्याची आठ एकर क्षेत्रावर लागवड केली होती. त्यापासून एकरी 34.87 म्हणजे सुमारे 35 टन उत्पादन मिळाले. 25 ऑक्‍टोबर ते 5 नोव्हेंबर 2009 या 10 दिवसांत बटाट्याची लागवड केली होती. 

चौधरी यांची अशी आहे लागवड पद्धती...
चौधरी आपल्या प्रयोगाविषयी सांगू लागतात. लागवडीपासून काढणीपर्यंत प्रत्येक कामासाठी यंत्रांचा वापर करतो. पीक उत्पादनात सिंचन व्यवस्थापन व फर्टिगेशनचा वाटा सर्वांत मोठा आहे. त्यासाठी ठिबक व तुषार सिंचन वापरून सिंचनाचे काटेकोर व्यवस्थापन केले आहे. पिकाला वेळेवर आणि योग्य तेवढे पाणी मिळालेच पाहिजे. वाऱ्याच्या वेगाचाही पिकाच्या वाढीवर, गरजांवर मोठा फरक पडत असतो. त्यामुळे त्याचा विचार करूनच नियोजन करतो. 

पूर्वमशागत महत्त्वाची 
लागवडीपूर्वी जमिनीला पाणी देऊन मशागत केली. सर्वसाधारणपणे शेतकरी सहा ते सात इंच खोल जमीन नां गरतात. आम्ही 18 इंच खोल नांगरट करून जमीन भुसभुशीत करतो. दोन वेळा आलटून- पालटून मशागत करणे महत्त्वाचे असते. बटाट्याची मुळे 35 सेंटिमीटरपर्यंत खोल जातात. त्यामुळे बटाट्याची वाढ चांगली होऊन तो पोसण्यासाठी खोल नांगरट केल्यास फायदेशीर ठरते. बटाट्यासाठीच्या जमीन मशागतीचे ते मुख्य सूत्र आहे.
लागवडीसाठी जमीन तयार करण्याआधी प्रति एकरी आठ किलो वाढ वृद्धिकारक व पाच किलो ह्युमिक ऑइल देतो. याबरोबरच एकरी आठ बॅगा 10ः26ः26 खताचा वापर करतो. एकरी दहा किलो गंधक, दहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्य देतो. लागवडीनंतर 30 दिवसांनी एकरी 25 किलो कॅल्शिअम नायट्रेट व 15 किलो मॅग्ने शिअम सल्फेट देतो. लागवडीनंतर 20 ते 45 दिवसांच्या दरम्यान तुषार सिंचनातून एकरी चार बॅग युरिया देतो. 

लागवड ते काढणी सर्व यांत्रिकीकरणानेबटाट्याची लागवड करण्यासाठी आमच्य सोईनुसार आम्ही "ऍटोमास प्लॅंटर' हे लागवड यंत्र विकसित करून घेतले आहे. ट्रॅक्‍टरच्या साह्याने या यंत्राने अतिशय कमी वेळात चांगल्या प्रकारे लागवड करता येते. सहा इंच खोलीवर दोन बटाट्यांत नऊ ते दहा इंच व दोन ओळींत 15 इंच अंतर ठेवून लागवड करतो. सर्व लागवड यां त्रिक पद्धतीने होते. मजुरांची फारशी गरज भासत नाही. त्यामुळे एकाच वेळी अधिक क्षेत्राचे व्यवस्थापन पाहणे सोपे जाते. यासाठी एकरी एक हजार 250 किलो बियाणे लागते. तणनियंत्रणासाठी लागवडीनंतर सात दिवसांनी तणनाशकाची फवारणी करतो. त्याच्या वापरामुळे खुरपणी आणि तणनियंत्रणाचा मोठा खर्च वाचतो.

खत व पाणी व्यवस्थापन
लागवडीनंतर 16 दिवसांनंतर दररोज पाच तास तुषार सिंचन सुरू ठेवतो. कोंब वर येऊ लागण्याच्या वेळी ज मीन ओलसर ठेवण्यासाठी एक दोन दिवस सोडून 15-15 मिनिटे तुषार संच सुरू ठेवतो. लागवडीनंतर 20 दिवसांनी नियमित सिंचन सुरू करतो. दररोज एक तास पाणी देतो. यामध्ये पहिली 30 मिनिटे साधे पाणी त्यानंतर 20 मिनिटे युरिया मिश्रित पाणी व शेवटी दहा मिनिटे पुन्हा साधे पाणी देतो. सुमारे 30 दिवसांपर्यंत अशा प्रकारे पाणी देतो. या काळात बटाट्याच्या झाडांची उंची एक फुटांपर्यंत वाढते. झाडाचा घेर तयार होतो. यानंतर एक दिवसाआड दोन तास पाणी देतो.
पाण्यासोबतच खते दिल्याने अतिशय कमी खतांमध्ये काम होते. ढगाळ हवामान असेल तर पाणी देण्याचे बंद करावे लागते. अन्यथा "लेट ब्लाईट' (उशिराचा करपा) येण्याची शक्‍यता असते. जास्त काळ ढगाळ हवामान कायम राहिल्यास एकदम जास्त पाणी देतो. त्यानंतर तीन-चार दिवस पाणी देत नाही. यामुळे "लेट ब्लाईट'ला पिकापासून दूर ठेवता येते. पोषक हवामान असतानाही पाण्याचे योग्य नियंत्रण केले तर लेट ब्लाईटचा फारसा प्रादुर्भाव होत नाही. पीक स्वतःच त्यास प्रतिकार करते. या रोगाचे पाण्याशी निकटचे नाते आहे. पिकाच्या संपूर्ण कालखंडात तीन वेळा कीडनाशकांची (कीटकनाशक व बुरशीनाशक यांची) फवारणी करतो. सर्वसाधारणपणे पीक 30 दिवसांचे झाल्यावर पहिली, 45 दिवसांचे झाल्यावर दुसरी व 55 ते 60 दिवसांचे असताना आवश्‍यकतेनुसार तिसरी फवारणी करतो. 

सुरक्षित काढणी व काढणीपश्‍चात निगा
बटाटा सुमारे 120 दिवसांत पीक काढणीस येतो. सर्वसाधारणपणे फेब्रुवारीच्या पहिल्या ते दुसऱ्या आठवड्यात काढणी होते. काढणीआधी सुमारे 20 दिवस पाणी देण्याचे बंद करतो. त्यामुळे बटाट्याची साल घट्ट तयार होते. त्याचा ओलसरपणा कमी होतो. काढणीच्या चार ते पाच दिवस आधी पिकाची कापणी करून जमीन साफ करतो. त्यानंतर स्वतःच सुधारित पद्धतीने तयार केलेल्या बटाटा काढणी यंत्राच्या साह्याने काढणी करतो. ट्रॅक्‍टरच्या साह्याने हे अवजार चालविले जाते. पाठोपाठ मजूर बटाटे गोळा करतात. काढणीसाठी दररोज सुमारे 200 ते 250 मजूर कामावर असतात. दररोज सुमारे दहा एकर क्षेत्रावरील बटाट्याची काढणी केली जाते. उन्हाचा व काढणी केलेल्या बटाट्याचा 36 चा आकडा आहे. बटाट्याला उष्णता लागली की लगेच त्यात साखर वाढण्यास सुरवात होते. बटाटा टिकत नाही. त्यामुळे उन्हात काढणी करत नाही. सकाळी सात ते 11 व संध्याकाळी चार ते सात या वेळात काढणी करतो. 
बटाटा काढणीनंतर योग्य तापमानाला तो साठवणे सर्वांत महत्त्वाचे असते. तापमान जास्त झाल्यास बटाट्यात लगेच साखर तयार होण्यास सुरवात होते. त्यामुळे आम्ही बटाटा काढणीनंतर 7 ते 11 अंश सेल्सिअस ताप मानाला त्याची साठवणूक करतो. त्याला ऊन लागू नये म्हणून सावली तयार करतो. बटाट्याची प्रतवारी करणे सर्वांत महत्त्वाचे असते. त्यासाठी जाळी लावून प्रतवारी करतो. 
आम्ही मजुरांना रोजंदारीवर मजुरी देण्याची पद्धत बंद केली. कारण मजूर कधीही कामावर येत. कामही योग्य प्रकारे होत नव्हते. त्यामुळे ही पद्धत बंद करून मजुरांना प्रति तास कामानुसार मजुरी देण्यास सुरवात केली. सध्या 12 रुपये प्रति तास याप्रमाणे मजुरीचा दर सुरू आहे. तासावर मजुरी असल्याने मजूर वेळेवर कामावर हजर होतात. शिवाय त्यांनाही दुपारची वेळ टाळून सकाळ- संध्याकाळच्या आल्हाददायक वातावरणात काम करायला आवडते. त्यामुळे कामही चांगले होते. महिला व पुरुषांना सारखीच मजुरी देतो. मजुरांकडून दर्जेदार काम व्हावे यासाठी त्यांचे शंभर मार्कांवर आधारित मूल्यांकन केले जाते. कामाचे निकष निश्‍चित केलेले असतात. जो मजूर 70 गुण मिळवतो त्याला पाच हजार रुपयांचे बक्षीस दिले जाते.
संपर्क : पार्थीभाई जेठाभाई चौधरी
डांगीया, ता. धांतीवाडा, जि. बनारसकंठा
: 09825609449
(फक्त सायंकाळी 6 ते 8 दरम्यान संपर्क करावा.) 

अर्थकारण
एकरी 1250 किलो बटाटे बियाणे आवश्‍यक असते. त्यास सर्वसाधारणपणे 16 रुपये किलो दराने सुमारे 20 हजार रुपये खर्च येतो. त्याशिवाय सुमारे सहा हजार रुपयांची खते, सात हजार रुपये मजुरी, तीन हजार रुपये य ंत्रसामग्री व सिंचनासाठी सुमारे सात हजार रुपये असा एकूण एकरी सुमारे 43 ते 45 हजार रुपये खर्च येतो. चिपसोना व एलआर चे एकरी साडेसतरा टन उत्पादन निघाले. त्याची आठ रुपये 75 पैसे प्रति किलो दराने विक्री झाली. एकरी सुमारे 1 लाख 50 हजार रुपये मिळाले. 
केएफएलआर जातीच्या बटाट्याचे बियाणे 25 रुपये किलो दराने आणले होते. सात रुपये 90 पैसे प्रति किलो दराने त्याची विक्री झाली. कंपन्या प्रक्रियेसाठी थेट शेतावरून बटाट्याची खरेदी करतात. विक्री झाल्यानंतर एक महिन्यात धनादेशाद्वारे (चेक) सर्व पैसे मिळतात. एकरी 35 टन बटाट्याचे सुमारे दोन लाख 76 हजार रुपये मिळाले. एफएलआरचे 92 टक्के बटाटे 45 एमएमहून अधिक आकाराचे निघाले. ते कंपनीने करारानुसार खरेदी केले. सुमारे सहा टक्के बटाटे 35 ते 45 एमएम आकाराचे मिळाले. त्याची चार ते साडेचार रुपये प्रति किलो दराने विक्री केली. उर्वरित दोन टक्के बटाटे 35 एमएमपेक्षा कमी आकाराचे होते. ते म्हशी व गाईंना खाऊ घालतो.

बाजारपेठेनुसार उत्पादन
यंदा मी 82 एकर क्षेत्रावर चिपसोना 3 व एल. आर. या वाणांचे उत्पादन घेतले. सरासरी साडेसतरा टन प्रति एकर उत्पादन मिळाले आहे. त्याची 10 रुपये 25 पैसे प्रति किलो दराने शेतावरच विक्री केली आहे. या दोन्ही वाणांमध्ये साखरेचे प्रमाण शून्य टक्के आहे. त्यामुळे बहुराष्ट्रीय कंपन्यांनी वेफर्स तयार करण्यासाठी त्यास मोठी मागणी आहे. गेल्या वर्षी के. एफ.एल. आर. वाणाचे विक्रमी उत्पादन मिळाले. मात्र या बटाट्यात साखर तयार होते. त्यापासून वेफर बनवल्यास लाल किंवा काळी होते. परदेशी कंपन्यांना पांढरे वेफर्स तयार व्हायला हवेत. मी नोकरी करता करता शेती करतो. क्षेत्र आणि उत्पादनही जास्त आहे. त्यामुळे मी बाजारपेठेमागे जास्त पळू शकत नाही. त्यामुळे हक्काची बाजारपेठ असलेल्या चिपसोना व एल.आर. या दोन्ही वाणांचे उत्पादन घेतले.
गुजरातचा बटाटा पाहिलात का? आहे की नाही पपई सारखा. बटाट्यासाठी गुजरातची माती जगात सर्वोत्तम आहे. चौधरी यांनी बटाटा उत्पादनात केलेले काम कौतुकास्पद आहे. चौधरींसारखे अनेक विक्रमी बटाटा उत्पादक शेतकरी तयार करण्याचा गुजरात शासनाचा प्रयत्न आहे. बटाट्याला अन्नात महत्त्वाचे स्थान असून, त्याची जागतिक बाजारपेठही फार मोठी आहे. यासाठी राज्य शासन, प्रगत शेतकरी व कृषी विद्यापीठांमार्फत संयुक्तरीत्या प्रयत्न करण्यात येत आहेत. 
नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, गुजरात

किमान एक हजार शेतकऱ्यांना बटाटा उत्पादनाचे मोफत प्रशिक्षण देण्याचा संकल्प केला आहे. त्यानुसार शेतातच प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी मदत करणार आहेत. "ऍग्रोवन'मार्फत संपर्क साधणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विक्रमी बटाटा उत्पादनासाठी सर्वतोपरी सहकार्य करू.
पी. जे. चौधरी, शेतकरी, बनारसकंठा, गुजरात

No comments:

Post a Comment