Monday, April 22, 2013

क्षेत्र फक्‍त दोन एकर, उत्पादन एकरी 120 टन

सांगली जिल्ह्यातील तांदूळवाडी (ता. वाळवा) येथील प्रगतिशील शेतकरी सुरेंद्र तोडकर यांची शेती म्हणाल तर फक्त 75 ते 78 गुंठे. दोन एकरालाही थोडी कमी; पण क्षेत्र कमी असले म्हणून काय झाले? पिकाचे उत्पादन? ते तर नेहमीच प्रसंशनीय. अगदी 1990पासून. उसाची उत्पादकता कायम चांगली टिकवण्याचा प्रयत्न तोडकर यांनी केला आहे. मागील वर्षी 25 गुंठे क्षेत्रात आडसाली उसाचे 76.88 टन म्हणजे एकरी 123 टन उत्पादन घेतले आहे. त्यांची ऊस शेती राज्यातील शेतकऱ्यांपुढे आदर्श उदाहरण आहे. श्‍यामराव गावडे 

कृष्णा व वारणा नद्यांच्या दुआबात वसलेला वाळवा तालुका (जि. सांगली) उसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो. सिंचनाची सोय या भागात पूर्वीपासून आहे; मात्र पाणी व खत यांचा बेसुमार वापर झाल्याने या भागातील अनेक ठिकाणी जमिनी खराब झाल्या, परिणामी ऊस उत्पादन घटले. परंतु अनेक पट्टीचे ऊस उत्पादक या भागात आहेत, अभ्यास व प्रयोगशील वृत्तीतून उसाची उत्पादकता टिकवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. सुरेंद्र तोडकर हे परिसरात बाळकृष्ण तोडकर या नावाने परिचित आहेत. 

पुणे- बंगळूर महामार्गावर पेठ नाक्‍यापासून 15 किलोमीटर अंतरावर तांदूळवाडी (ता. वाळवा) गाव आहे. उसाचे एकरी उत्पादन घटत आहे, ऊस शेती परवडत नाही असा सतत घोषा लावणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तोडकरांची शेती आदर्श म्हणावी लागेल. 

क्षेत्र कमी, उत्पादन जास्त तोडकर यांची जमीन तांदूळवाडीपासून पूर्वेला एक किलोमीटर अंतरावर आहे. विभक्त कुटुंब पद्धतीत त्यांच्या वाट्याला दोन एकर जमीन आली; मात्र कमी जमिनीत जास्तीत जास्त उत्पादन मिळवण्याचा त्यांनी कायम प्रयत्न केला. दोन, अडीच, तीन टन प्रति गुंठा उत्पादनाची चढती कमान त्यांनी ठेवली. कोणतीही गोष्ट मनापासून करायची यावर त्यांची निष्ठा, त्यामुळे त्यांना चांगले यश मिळते. आपल्या मागील वर्षीच्या 25 गुंठे क्षेत्राच्या प्रातिनिधिक आडसाली ऊस प्रयोगाविषयी बोलताना ते म्हणाले, की खोडवा पीक गेल्यानंतर जमिनीची आडवी- उभी नांगरट केली. चार फुटांच्या समान अंतराने सऱ्या सोडल्या. त्या आधी पाच डंपिंग शेणखत विस्कटले. दहा दिवस रानात मेंढ्या बसवल्या. दहा जूनच्या आसपास पावसाला सुरवात झाल्यावर भोंड्यावर भुईमूग टोकून घेतला. 25 जूनला को- 86032 उसाची लागवड एक डोळा प्रति एक फूट अंतरावर या पद्धतीने केली. 

खत व्यवस्थापन लागवडी वेळी बेसल डोस म्हणून दोन पोती डीएपी, एक पोते पोटॅश व तीन किलो फिप्रोनील कीटकनाशक यांचा वापर केला. दुसरा डोस पाच ऑगस्टला दिला. त्यामध्ये 10-26-26 एक पोते, एक पोते युरिया, अमोनिअम सल्फेट 25 किलो, फोरेट दोन किलो दिले. ऑक्‍टोबरच्या अखेरीस मोठी भरणी केली. त्या वेळी दोन पोती डीएपी, दोन पोती युरिया, एक पोते अमोनिअम सल्फेट, पोटॅश तीन पोती, मायक्रोन्यूट्रिएंट दहा किलो या पद्धतीने दिले. सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापरही केला. उसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बुरशीनाशकांची फवारणी केली. उसामध्ये तणनाशकाचा वापर कमी होतो. भांगलणीवरच अधिक भर असतो. 

आंतरपिकातून उत्पादन खर्चात बचत तोडकर दरवर्षी उसात भुईमूग घेतात. ओल्या शेंगांची थेट पुणे मार्केटला विक्री केली जाते. गावामध्ये अनेक भुईमूग उत्पादक असल्याने एकाच वेळी सर्व माल पुण्यास आणला जातो. किलोला 35- 40 रुपये याप्रमाणे दर मिळतो. घरात खाण्यासाठी ठेवलेल्या शेंगा व विकलेल्या शेंगा यांतून त्यांना तीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. भुईमूग आंतरपिकाचा उसाच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होत नाही, त्यामुळे भुईमूग पीक घेणे फायदेशीर ठरते, असे तोडकर म्हणतात. वारणा सहकारी साखर कारखान्याचे अधिकारी दीपक पाटील, रामभाऊ गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 

पिकाचा जमा- खर्च क्षेत्र - 25 गुंठे 
उत्पादन - 76.88 टन 
शेणखत 5500, रासायनिक खते 21,300, भुईमूग बियाणे 1800, ऊस बियाणे लावणीसह 5000, भांगलण 8900, पाणीपट्टी 3000 व अन्य मिळून सुमारे 51,785 रुपये इतका खर्च झाला. भुईमुगाच्या आंतरपिकातून 30 हजार रुपये मिळाले. उसातून पहिला ऍडव्हान्स 2500 रुपये प्रति टन याप्रमाणे 76 टनांसाठी एक लाख नव्वद हजार रुपये मिळाले. 

इतर शेतकऱ्यांचे मार्गदर्शक तोडकर यांच्यासह तांदूळवाडीत दहा ते पंधरा शेतकऱ्यांचा गट आहे. हे शेतकरी नेहमी शेती आणि शेतीविषयीच्या प्रश्‍नांसंदर्भात चर्चा करतात, त्या सर्वांना तोडकर यांचे मार्गदर्शन असते. तोडकर सांगतात, की आमच्या गटातील एकही शेतकरी प्रति गुंठा दोन टन उत्पादनाच्या आत नाही. उपलब्ध क्षेत्रात अधिकाधिक उत्पादन कसे काढायचे यावर त्यांची भिस्त असते. 
: सुरेंद्र तोडकर - 9623874985

नोंदवही बनली मार्गदर्शक तोडकर यांनी गेल्या काही वर्षांपासून आपल्या शेतीकाम व जमा- खर्चाची नोंदवही ठेवली आहे. पीक लावणीपासून काढणीपर्यंतचा खर्च, दिलेल्या खत मात्रा, लागलेले मजूर, त्यावर झालेला खर्च याची नोंद त्यात ठेवली आहे. ती एखाद्या अकाउंटंटलाही लाजवेल या पद्धतीची आहे. यासंदर्भात ते म्हणाले, की गेल्या पिकाला आपण कोणता डोस दिला आहे, त्याचा परिणाम काय झाला, याची सत्यता त्यातून पडताळून पाहता येते. त्यानुसार पुढील नियोजनात बदल करता येतो. त्यामुळे नोंदवही आपली चांगली मार्गदर्शक आहे. 

विविध पुरस्कारांचे मानकरी ऊस उत्पादनात सातत्य असणारे तोडकर यांना यापूर्वी आडसाली उसाचे चांगले उत्पादन घेतल्याबद्दल वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेचा 1994- 95मध्ये पुरस्कार मिळाला आहे. त्या वेळी एक गुंठ्यात त्यांनी तीन टन 200 किलो म्हणजे एकरी किमान 120 टन उत्पादन घेतले होते. 
खोडवा पिकाचे चांगले उत्पादन घेतल्याबद्दलही वारणा सहकारी साखर कारखान्याने त्यांना गौरवले आहे. 

तोडकर यांच्या शेती नियोजनातील काही मुद्दे -चांगल्या उत्पादनासाठी तोडकर शेणखताचा भरपूर वापर करतात. प्रति गुंठा एक बैलगाडी सेंद्रिय खत दरवर्षी लागवडीपूर्वी दिले जाते. पाच म्हशी पाळल्या आहेत. त्यांचे शेणखत मिळतेच, शिवाय गरजेनुसार बाहेरूनही विकत घेतले जाते. दर दहा दिवसांना दूध विक्रीतून सुमारे तीन हजार रुपये मिळतात, त्यातून कौटुंबिक खर्च चालतो. 
-दरवर्षी शेतात मेंढ्या आवर्जून बसवल्या जातात. 
-उसाला एकूण डोस एकरी देताना एनपीकेचे गुणोत्तर 180-100-100 असे ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. काही वेळा खतांच्या डोसमध्ये थोडाफार बदल होतो. 
-भुईमुगापासून गुंठ्याला एक हजार रुपये किमान उत्पन्न मिळते, त्यातून उसाच्या उत्पादन खर्चात बचत होते. भुईमूग पिकात सुमारे दीड एकरात दहा पोती घरच्यासाठी उत्पादन ठेवून 88 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. 
-अद्याप ठिबक सिंचनाचा वापर केला नसला तरी येत्या काळात त्याचा वापर केला जाणार आहे. 
-खोडव्याचे उत्पादनही प्रति गुंठा दीड टनापेक्षा कमी नसते. खोडव्याचा उत्पादन खर्चही लावणी उसाच्या तुलनेत कायम कमी.

No comments:

Post a Comment