Monday, April 22, 2013

अडचणीतील द्राक्षशेतीला वांगी पिकाने दिला आधार...

वाढता उत्पादन खर्च आणि सततच्या नैसर्गिक आपत्तीने जेरीस आलेल्या नाशिक येथील द्राक्ष उत्पादकांना सध्याच्या काळात संकरित वांगी पिकाने चांगला आर्थिक आधार दिला. मखमलाबाद (जि. नाशिक) येथील किरण पिंगळे, सचिन पिंगळे आणि संदीप पिंगळे यांनी घेतलेले वांग्याचे यशस्वी उत्पादन परिसरातील शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरले आहे. 

नाशिक शहरालगत असलेले मखमलाबाद हे गाव प्रयोगशील शेतीसाठी प्रसिद्ध आहे. पारंपरिक पिकांबरोबरच फुलशेती, रोपवाटिका, औषधी वनस्पती, कृषी पर्यटन अशा वेगवेगळ्या प्रयोगांत येथील शेतकरी आघाडीवर आहेत. येथील शेतकरी किरण नामदेव पिंगळे यांची गोदावरी नदीच्या परिसरात शेती आहे. गतवर्षी त्यांनी प्रथमच 36 गुंठ्यांत संकरित वांगी पिकाची लागवड केली होती. योग्य व्यवस्थापनातून त्यांना दर्जेदार उत्पादन मिळाले. वांगी फळांचा आकार, चमक पाहून त्यांची शेती चर्चेचा विषय ठरली होती. साधारणपणे 36 गुंठ्यांतून किरण यांना पंधरा महिन्यांत 110 टन वांगी उत्पादन मिळाले. सरासरी एक हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळून एकूण दीड वर्षात नऊ लाख 30 हजारांचे आर्थिक उत्पन्न त्यांना मिळाले. दिंडोरी रोडला शेती असलेल्या सचिन पिंगळे यांनीही या वर्षी या वांग्याची लागवड केली आहे. गेल्या एक महिन्यापासून उत्पादन सुरू झाले असून, आतापर्यंत त्यांना आठ टन उत्पादनातून एक लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. या वांग्याला भरितासाठी गुजरात व मुंबईच्या बाजारपेठेतून विशेष मागणी असते. श्री. पिंगळे यांच्या अनुभवातून परिसरातील द्राक्ष उत्पादकही मोठ्या प्रमाणात संकरित वांगी लागवडीकडे वळाल्याने यंदा जिल्ह्यात वांग्याचे क्षेत्र सुमारे शंभर एकरावर गेले आहे. 

वर्षभर घेतले वांग्याचे उत्पादन  
मखमलाबाद येथील किरण पिंगळे यांचे एकूण साडेतीन एकर क्षेत्र आहे. त्यापैकी दोन एकर क्षेत्रात द्राक्ष, एक एकरात टोमॅटो व उर्वरित 36 गुंठ्यांत वांगी लागवड केली जाते. वांगी लागवडीबाबत किरण पिंगळे यांनी सांगितले, की 15 नोव्हेंबर 2009 मध्ये वांगी लागवडीचे नियोजन केले. चांगल्या रोपवाटिकेतून संकरित जातीची वांग्याची रोपे आणली. जमिनीची चांगली मशागत करून 8 x 2.5 फूट या अंतरावर लागवडीचे नियोजन केले. लागवडीसाठी आठ फुटांवर दीड फूट उंच आणि दीड फूट रुंदीचे गादीवाफे तयार केले. त्यानंतर गादीवाफ्यांमध्ये एकरी चार ट्रॉली शेणखत, 10:26:26 खत 50 किलो आणि डीएपी 50 किलो चांगले मिसळून दिले. त्यानंतर इनलाइन ठिबक बसवून प्लॅस्टिकचे आच्छादन केले. त्यानंतर 2.5 फुटांवर आच्छादनाला छिद्रे पाडून रोपांची लागवड केली. 36 गुंठ्यांत एकूण 2160 रोपांची लागवड केली. रोपांच्या गरजेनुसार ठिबकमधून पाणी देण्यास सुरवात केली. लागवडीनंतर दहा दिवसांपासून ते उत्पादन सुरू असेपर्यंत नत्र, स्फुरद, पालाश ही खते तज्ज्ञांच्या शिफारशीनुसार दिली; तसेच माती परीक्षणानुसार सूक्ष्म अन्नद्रव्ये ठिबकद्वारे दिली. दिवसाआड खतांची मात्रा शिफारशीनुसार दिली. तसेच, पिकाच्या गरजेनुसार ठिबकमधून पाणी व्यवस्थापन ठेवले. वांगी पिकामध्ये मर, फळकूज रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो; तसेच काही वेळा कोळी, पांढरी माशी, तुडतुडे, फळे पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला. फळांचा दर्जा चांगला ठेवण्यासाठी मी नाशिक येथील कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ श्री. हेमराज राजपूत यांच्या मार्गदर्शनानुसार कीडनाशकांच्या फवारणीचे वेळोवेळी नियोजन केले. खतांचे योग्य नियोजन ठेवले. 

लागवडीपासून पिकाचे अन्नद्रव्य व्यवस्थापन, पाणी नियोजन, कीड - रोग नियंत्रण याचे काळजीपूर्वक व्यवस्थापन केले. लागवडीनंतर दोन महिन्यांत म्हणजे जानेवारी 2010 मध्ये वांग्याचे उत्पादन सुरू झाले. हे वाण सहा फुटांपेक्षा अधिक वाढते, याची अगोदर माहिती घेतल्यामुळेच झाडाची उंची तीन फूट झाल्यानंतर भाराने वाकलेल्या फांद्यालगत सरीत तार ओढून बांधली. दर सहा फुटांवर उभे उंच बांबू लावले. फांद्या दोरीने तारेला बांधल्या. यामुळे फळांची तोडणीही सोपी झाली. 

सुरवातीला दर तीन दिवसांच्या अंतराने तोडणी सुरू केली. सरासरी दहा किलो वजनाचे दोन ते तीन क्रेट वांगी उत्पादन मिळायचे. जानेवारी ते एप्रिल अखेरपर्यंत प्रति किलो किमान 10 ते 18 रुपये दर मिळाला. मे, जून महिन्यांत मागणी घटल्याने दरात घसरण झाली. सरासरी दोन रुपये प्रति किलोने बाजारात वांगी विक्री होत असताना खर्चही भरून निघत नव्हता; मात्र तरीही या काळात झाडांच्या पोषणाकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही, त्याचा फायदा मंदी संपल्यानंतरच्या काळात झाला. पुढे सर्व झाडांचे फळांचे उत्पादन सुरू झाल्यावर रोज 40 क्रेट वांगी उत्पादन सुरू झाले. प्रति किलो सरासरी 10 रुपये दराने नाशिकच्या बाजारात वांगी विकली गेली. मुंबईच्या बाजार समितीत 40 किलो वजनाच्या बॉक्‍समधून वांगी पाठविली. या बाजारपेठेतही चांगला दर मिळाला. 

उत्पादनाबाबत माहिती देताना किरण पिंगळे म्हणाले, की मला 15 महिन्यांत 110 टन उत्पादन मिळाले. या वांग्याला सुरत, मुंबई आणि नाशिक बाजारात चांगली मागणी असते. सरासरी दर चांगला मिळाल्याने मला एकूण अकरा लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळाले. वर्षभरात व्यवस्थापनावर एक लाख 70 हजार रुपये खर्च झाला होता, तो वजा जाता नऊ लाख 30 हजारांचा निव्वळ नफा मिळाला. आता नव्याने वांगे लागवडीची तयारी सुरू केली आहे. 

पीक व्यवस्थापनातून उत्पादनवाढ - 
वांगी पीक व्यवस्थापनाबाबत नाशिकच्या कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञ हेमराज राजपूत आणि राजाराम पाटील यांनी सांगितले, की शेतकरी साधारणपणे वांग्याचे पीक दहा महिन्यांपर्यंत ठेवतात. श्री. पिंगळे यांनी सुधारित पद्धतीने लागवड केली, तसेच विद्राव्य खतांचा वापर, वेळीच पीक संरक्षणाच्या उपाययोजना केल्या, त्यामुळे झाडांची वाढ चांगली झाली. झाडे चांगले उत्पादन देत असल्याने त्यांनी सप्टेंबरमध्ये पूर्ण बहर संपल्यावर जमिनीपासून दीड फूट उंचीवर दोन सशक्त फांद्या ठेवून झाडांची छाटणी केली. खत, पाण्याचे योग्य नियोजन ठेवले, त्यामुळे पुन्हा या झाडांना चांगली फूट मिळाली. पुढे हे उत्पादन फेब्रुवारीपर्यंत चालले, त्यामुळे साधारणपणे 15 महिन्यांच्या कालावधीत त्यांना एकूण 110 टन उत्पादन मिळाले. साधारणपणे हंगाम, जातीची निवड आणि व्यवस्थापनानुसार दहा महिन्यांत सरासरी एकरी 80 टन वांग्याचे उत्पादन मिळते. 

वांगी ठरताहेत फायदेशीर 
मखमलाबाद फाट्याजवळील (दिंडोरी रोडला) शेतकरी सचिन शंकरराव पिंगळे यांचे तीन एकर क्षेत्र आहे. यात एक एकर द्राक्ष, एक एकर ढोबळी मिरची, अर्धा एकर वांगी व उर्वरित क्षेत्रात 175 म्हशींचा अत्याधुनिक गोठा आहे. श्री. पिंगळे वांगी लागवडीबाबत म्हणाले, की मी पहिल्यांदाच अर्धा एकर वांगी लागवड केली आहे. माझी अगोदर काकडीची लागवड होती. काकडीची जुलैमध्ये काढणी झाल्यावर त्याच गादीवाफ्यावर वांगी लागवडीचे नियोजन केले, त्यामुळे गादीवाफे करणे आणि प्लॅस्टिक आच्छादनाचा खर्च वाचला. 7 सप्टेंबर रोजी दोन फुटांवर वांग्याची रोपे लावली. दोन वाफ्यांमध्ये पाच फुटांचे अंतर आहे. अर्ध्या एकरात 1700 रोपे बसली. 15 नोव्हेंबरपासून उत्पादन सुरू झाले आहे. ठिबकद्वारेच 12ः61ः0, 0ः0ः50, 13ः0ः45 ही खते शिफारशीत मात्रेमध्ये दर तीन दिवसांनी देतो. झाडांची उंची चांगली वाढत असल्याने झाडांना आधार दिला आहे. आतापर्यंत 17 खुड्यांतून जवळपास आठ टन उत्पादन मिळाले आहे. वांग्याला गुजरातमधून वाढती मागणी असून, प्रति क्रेटला (दहा किलो वजनाचे एक क्रेट) किमान 120 आणि कमाल 200 रुपये असा व सरासरी 150 रुपये दर मिळाला. यातून आतापर्यंत एक लाख 20 हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. व्यवस्थापनावर झालेला 20 हजार रुपये खर्च वजा करता एका महिन्यात निव्वळ एक लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. अजून पाच महिने पीक घेणार आहे. 

चार महिन्यांतच वांग्याने दिला आर्थिक नफा -
संदीप प्रभाकर पिंगळे यांची बारा एकर एकत्रित शेती आहे. पारंपरिक द्राक्षशेती करणाऱ्या श्री. पिंगळे यांनी 9 मार्च रोजी 30 गुंठ्यांत वांगी लागवड केली. वांगी लागवडीबाबत माहिती देताना पिंगळे यांनी सांगितले, की लागवडीचे अंतर 5 x 3 फूट असे ठेवले. गादीवाफ्यावर आच्छादन करून लागवड केली. मे महिन्यात वांग्याचे उत्पादन सुरू झाले तेव्हा त्या काळातच बाजारात मागणी घटली. दहा किलोच्या प्रति क्रेटला कमीत कमी 35 रुपये (सुरवातीस महिनाभर) आणि जास्तीत जास्त 350 रुपयांपर्यंत दर मिळाला. सलग चार महिने वांगी पिकातून एकूण पाच हजार क्रेट उत्पादन मिळाले. वांग्याच्या झाडांची उंची सहा फुटांपर्यंत गेल्याने झाडांच्या फांद्यांच्या विस्तारासाठी द्राक्षबागेची पारंपरिक मांडव पद्धत अपुरी पडली. त्या वेळी बाजारात वाढती मागणी असताना दिवसाला किमान 50 क्रेट वांगी उत्पादन होत होते. उत्पादन वाढल्याने तोडणी करणे अवघड होत होते, त्यामुळे झाडांची उंची कमी करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यात फारसे यश मिळाले नाही. वांग्याला त्यानंतर अपेक्षित फुटवे फुटले नाहीत, त्यामुळे ऑगस्टपर्यंत उत्पादन घेतले. पाच हजार क्रेटमधून सरासरी 130 रुपये दराने साडेसहा लाखांचे उत्पन्न मिळाले. वांगी व्यवस्थापनासाठी आलेल्या खर्चाचा हिशेब करता सहा ट्रॉली शेणखताचा खर्च 12 हजार रुपये, निंबोळी पेंड व इतर खतांसाठी 15 हजार रुपये, कीडनाशक खरेदी आणि फवारणीसाठी 60 हजार रुपये, एकूण मजुरी (लागवड, बांधणी, तोडणीसाठी) 30 हजार रुपये, प्लास्टिक पेपर मल्चिंगसाठी पाच हजार रुपये, ठिबकसाठी 20 हजार रुपये आणि सुतळी, तारा यासाठी सात हजार रुपये असा एकूण दीड लाख रुपयांपर्यंत खर्च झाला. दीड लाख रुपये खर्च वगळता वांग्यातून निव्वळ पाच लाख रुपयांचे उत्पन्न निघाले. नव्याने तीन एकर क्षेत्रावर मार्च महिन्यात वांगे लागवड करण्याचे नियोजन आहे. 

संपर्क ः 
किरण नामदेव पिंगळे, 9822326799 
सचिन शंकरराव पिंगळे, 9763606924 
संदीप प्रभाकर पिंगळे, 9822585798 
हेमराज राजपूत (कृषी विज्ञान केंद्र, नाशिक) ः 9422773602 

No comments:

Post a Comment