Monday, April 22, 2013

सुयोग्य व्यवस्थापनातून "एकरी 105' टन ऊस

पुणे जिल्ह्यातील मुखई (ता. शिरूर) येथील तरुण अभियंता दीपक हिरवे यांनी सोळा एकर सुरू उसाला सबसरफेस या आधुनिक ठिबक सिंचन प्रणालीचा अवलंब केला. शिक्षणाचा पुरेपूर वापर करत ऊस शेतीचे व त्यातही पाणी व खतांचे सुयोग्य व्यवस्थापन करीत एकरी एकशे पाच टन उत्पादन त्यांनी घेतले आहे. अमोल बिरारी दीपक हिरवे (बीई- सिव्हिल) यांनी सुरवातीला काही दिवस पुण्यात नोकरी केली. परंतु शेतीची मनापासून आवड असल्याने 2003 पासून पूर्णवेळ शेतीच करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे एकूण 23 एकर क्षेत्र आहे. घेतलेल्या शिक्षणाचा पुरेपूर वापर शेतीत करत त्यांनी ऊस शेतीचे केलेले व्यवस्थापन वाखाणण्याजोगे आहे. दररोज ठिकठिकाणचे शेतकरी त्यांच्या शेतीला भेट देण्यासाठी येतात. संरक्षित पाण्याची सोय म्हणून 75 लाख लिटरचे शेततळे त्यांनी केले आहे. कमी पाण्यात अधिक उत्पादन घेता येते, त्यासाठी पिकाला लागतं तेवढंच पाणी दिलं पाहिजे, असं हिरवे म्हणतात. त्यांच्याकडे पावणेचार एकरात निडवा होता, त्याचेही प्रति एकरी 85 टन उत्पादन त्यांनी घेतले आहे. 

लागवडीचे नियोजन - हिरवे यांनी गेल्या वर्षी तीन व 12 फेब्रुवारी आणि 28 मार्च रोजी सुरू उसाची फिनोलेक्‍स कंपनीच्या सबसरफेस ठिबक तंत्रज्ञानाने लागवड केली. लागवडीसाठी जोडओळ पट्टा पद्धतीचा अवलंब केला. दहा फुटांचा पट्टा, दोन ओळींतील अंतर दोन फूट, तर दोन बेण्यांमधील अंतर दीड फूट ठेवले. "को 86032' वाणाच्या दोन डोळा पद्धतीचा वापर बेण्यासाठी केला. 16 एमएम x 0.40 मीटर x 2.1 लिटर प्रति तास पद्धतीने सबसरफेसची मांडणी असून, सबसरफेसची लॅटरल सात इंच खोलीवर आहे. याबाबत हिरवे म्हणाले, की पूर्वी सरफेस ठिबकद्वारे ऊस घेत होतो. उत्पादन एकरी 70 ते 85 टनांपुढे जात नव्हते. मात्र सबसरफेसच्या वापरामुळे कमी पाण्यात वाफसा स्थिती टिकून राहिली, फुटव्यांची संख्या योग्य राखता आली. पिकाच्या वाढीनुसार पाणी देणे शक्‍य झाले. एकरी गाळपयोग्य सुमारे 42 हजार ऊस राखता आल्याने उत्पादनात 30 ते 35 टक्के वाढ झाली. लागवडीपूर्वी शेतात पाचट कुजविणे तसेच जैविक खतांच्या वापराचाही फायदा झाला. सबसरफेससाठी एकरी 28 हजार रुपये खर्च झाला. 

सुरवातीला जमिनीची उभी- आडवी नांगरट करून आठ दिवसांनी ट्रॅक्‍टरच्या साहाय्याने कल्टिव्हेटर वापरले. चार-पाच दिवसांनी रोटाव्हेटरचा वापर करून एकरी चार ते पाच टन चांगले कुजलेले शेणखत शेतात मिसळून दिले. जमीन मऊ, बारीक व भुसभुशीत केली. ठिबकची ड्रीपलाइन ज्या अंतरावर पसरायची होती, त्या ठिकाणी दोन फुटांच्या पट्ट्यामध्ये एकरी 100 किलो डीएपी, 100 किलो एमओपी, 50 किलो निंबोळी पेंड, तीन किलो गंधक युक्त खत, तीन किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, तीन किलो झिंक सल्फेट, तीन किलो फेरस सल्फेट मातीत चांगले मिसळले. खत दिलेल्या पट्ट्यावर सबसरफेसची लॅटरल टाकली. 
लागवडीपूर्वी बेणेप्रक्रिया करताना एक ग्रॅम कार्बेन्डाझिम, तीन मि.लि. मॅलॅथिऑन प्रति लिटर पाण्यात मिसळून द्रावणामध्ये 15 मिनिटे बेणे बुडवून ठेवले. सावलीत सुकवून अर्ध्या तासाने जैविक बेणेप्रक्रिया केली. त्यात 300 ग्रॅम ऍझेटोबॅक्‍टर, 300 ग्रॅम पीएसबी प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात बेणे तीस मिनिटे बुडवून सावलीत सुकवले. जोड ओळ पट्टा पद्धत वापरायची असल्याने दहा फुटांवर लॅटरल टाकून त्याच्या दोन्ही बाजूला लागवड केली. त्यानंतर 60 ते 65 दिवसांनी छोट्या ट्रॅक्‍टरने व त्यानंतर 90 ते 95 दिवसांनी पुन्हा भर लावली. दोन्ही वेळेस पट्ट्यातील तणांचे नियंत्रण चांगले झाले. मोठी बांधणी करताना एकरी फुटव्यांची संख्या योग्य ठेवण्यावर लक्ष दिले. 

...अशी दिली खतमात्रा मुख्य बांधणीवेळी एकरी 75 किलो डीएपी, 75 किलो म्युरेट ऑफ पोटॅश, 100 किलो युरिया, सहा किलो सूक्ष्म अन्नद्रव्ये, झिंक सल्फेट सहा किलो, आठ किलो फेरस सल्फेट आणि 100 किलो सेंद्रिय खत वापरले. ही सर्व खते ओळीत टाकून मातीत मिसळून घेतली. त्यानंतर बांधणी करून 15 दिवसांनी ठिबकद्वारे एकरी एक लिटर ऍसिटोबॅक्‍टर, एक लिटर पीएसबी आणि एक लिटर केएसबी दिले. 

ठिबकद्वारे खताचे वेळापत्रक - (प्रति पाच एकर प्रति पाच दिवस) 13-0-45-------10 किलो- 15 ते 60 दिवसांदरम्यान 
12-61-00-----10 किलो- 60 ते 90 दिवसांदरम्यान 
19-19-19-----15 किलो-90 ते 120 दिवसांदरम्यान 
0-0-50--------10 किलो- 120 ते 280 दिवसांपर्यंत 

पाणी देण्याचे वेळापत्रक - लागवडीनंतरचे महिने------एमएम प्रति एकर 
एक ते दोन--------------दोन ते अडीच 
तीन ते पाच-------------अडीच ते तीन 
सहा ते दहा-------------दोन ते अडीच 
दहा ते बारा-------------चार ते साडेचार 

लागवडीनंतर दीड महिन्याने एकरी दोन लिटर ह्युमिक ऍसिड दोन वेळा दर दहा दिवसांनी दिले. लागवडीनंतर चौथ्या, पाचव्या व सहाव्या महिन्यात फिनोलेक्‍स कंपनीचे ड्रीपझाईम एक लिटर प्रति एकरी ड्रीपद्वारे दिले. तणनियंत्रणासाठी ऍट्राझीन व 2-4, डी तणनाशकांचा वापर केला. पिकाच्या पाणी व्यवस्थापनात हिरवे यांना फिनोलेक्‍सचे संचालक (मार्केटिंग) डॉ. नरेंद्र राणे आणि सहायक व्यवस्थापक (कृषी) विठ्ठल गोरे यांचे मार्गदर्शन मिळाले. 

तंत्रज्ञान वापर हायलाईट्‌स - - सबसरफेसमध्ये प्रेशर क्रॉम्प्रेन्सिव्ह नॉन ड्रेन (पीसीएनडी) ड्रीपलाइन वापरली. यामुळे मुळांच्या कक्षेत 40 सें.मी.पर्यंत सतत वाफसा स्थिती राहिली. पाणी व खतांची उपलब्धता समान प्रमाणात झाली. 
- पांढऱ्या मुळांची संख्या वाढली. मुळे सक्षम राहिल्याने खते व पाण्याचा कार्यक्षम वापर झाला. 
- पिकाच्या अवस्थेनुसार तसेच वयानुसार योग्य पद्धतीने पाणी व्यवस्थापन करणे शक्‍य झाले. त्याचा परिणाम रोपांची एकरी संख्या मर्यादित ठेवता आली. 
- दुष्काळी परिस्थितीत विहीर तसेच बोअरचे पाणी कमी पडले असता केवळ सहा ते सात हजार लिटर प्रति एकरी पाणी देऊनही ऊस जोपासता आला. त्याच्या वाढीवर विपरीत परिणाम न होता पेऱ्यांची संख्या सहा ते आठ इंचापर्यंत आणि कांड्यांची संख्या 28 ते 32 पर्यंत गेली. 
- प्रति उसाचे वजन सरासरी अडीच ते तीन किलो भरले. एकरी सरासरी 105 टन उत्पादन मिळाले. 
साखर कारखान्याकडे सुमारे पाच एकरातील ऊस गेला असून त्याला प्रति टन 2300 रुपये दर मिळाला आहे. 

तंत्रज्ञान वापरल्याचे फायदे - - जमिनीत वाफसा टिकून राहिला 
- सूक्ष्म जिवाणूंची संख्या वाढण्यास मदत झाली 
- अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढली 
- नियंत्रित पाण्यामुळे द्रव स्वरूपातील सामू आणि ईसी चांगला राहिला 

हिरवे यांच्याकडून शिकण्यासारखे - - कमी मनुष्यबळात शेतीचे व्यवस्थापन 
- उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर 
- तंत्रज्ञान माहितीसंदर्भात मोकळेपणाने देवाण-घेवाण 
- शिक्षणाचा शेतीत पुरेपूर वापर 

उत्पादन खर्च (प्रति एकरी, रू.) - जमीन तयार करणे- -------4400 
बेसल डोस (शेणखत पाच टन, जैविक, रासायनिक खते)------8,000 
बेणे (प्रक्रिया आणि लागवड)-----------------------4400 
बांधणी व रासायनिक खते----------9,000 
दोन वेळा खुरपणी---------------------------1200 
ठिबकद्वारे खते- ------------------------12,000 
किरकोळ खर्च -------------------------3000 
एकूण-------------------------------------42,000 रु.

No comments:

Post a Comment