Thursday, April 25, 2013

एकात्मिक पद्धतीने करा वांगी पिकातील कीड नियंत्रण

वांगी पिकावर तुडतुडे, पांढरी माशी, तसेच शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. या किडींच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनावर परिणाम होतो. हे लक्षात घेऊन एकात्मिक पद्धतीने किडींच्या नियंत्रणासाठी उपाययोजना करावी. - शरद दळवे 
वांगी लागवडीपूर्वी बियाण्यास इमिडॅक्‍लोप्रिड पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे आणि ट्रायकोडर्मा पाच ग्रॅम प्रति किलो बियाणे याप्रमाणे बीजप्रक्रिया करावी. रोपे तयार करताना वाफ्यांमध्ये निंबोळी पेंड पाच किलो प्रति वाफा या प्रमाणात वापरावी. जर बीजप्रक्रिया केलेली नसेल, तर वाफ्यात रोपे उगवल्यानंतर दाणेदार फोरेट 20 ग्रॅम प्रति वाफा किंवा डायमेथोएट 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन वेळा 15 ते 30 दिवसांनंतर रोपे उगवल्यानंतर फवारावे. 

लागवडीच्या वेळी नियोजन - - लागवडीसाठी जमिनीची योग्य नांगरट करून योग्य अंतरावर सऱ्या पाडाव्यात. हलक्‍या जमिनीत 75 सें.मी. बाय 75 सें.मी., जास्त वाढणाऱ्या किंवा संकरित जातीसाठी 90 सें.मी. बाय 90 सें.मी. अंतर ठेवावे. मध्यम किंवा काळ्या कसदार जमिनीत कमी वाढणाऱ्या जातींसाठी 90 सें.मी. बाय 75 सें.मी. व जास्त वाढणाऱ्या जातींसाठी 120 सें.मी. बाय 80 सें.मी. अंतर ठेवावे. 
- शेतीच्या कडेने एक ओळ मका आणि दोन मक्‍यामध्ये एक चवळीचे बी याप्रमाणे टोकण पद्धतीने आंतरपिके लावावीत. 
- माती परीक्षणानुसार प्रति हेक्‍टरी 150 किलो नत्र - 60 किलो स्फुरद - 60 किलो पालाश या पद्धतीने खतमात्रा द्यावी. 
- पुनर्लागवडीपूर्वी इमिडॅक्‍लोप्रिड 20 मि.लि. + ट्रायकोडर्मा 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी + 5 टक्के निंबोळी अर्क या द्रावणात रोपांची मुळे तीन मिनिटे बुडवून ठेवावीत. 
- सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी निंबोळी पेंड हेक्‍टरी 400 किलो किंवा दाणेदार कार्बोफ्युरॉन 33 किलो प्रति हेक्‍टरी रोपे लावल्यानंतर 10 दिवसांनी रिंगण पद्धतीने टाकून मातीने बुजवून घ्यावे. 

लागवडीनंतरचे नियोजन - - लागवडीनंतर 40-45 दिवसांनी आणि त्यानंतर सात दिवसांच्या अंतराने असे दोन वेळा ट्रायकोग्रामा एक लाख कीटक प्रति हेक्‍टरी सोडावेत. 
- प्रति हेक्‍टरी ल्युसी ल्युअर असलेले 12 ते 15 कामगंध सापळे उभारावेत. दर 15 दिवसांनी त्यामधील ल्युअर बदलावा. 
- शेंडे व फळ पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास वेळोवेळी किडलेले शेंडे अळीसह कापून खोल खड्ड्यात गाडावेत. 
- शेंडे किडण्याचे प्रमाण 10 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असल्यास पाच टक्के निंबोळी अर्काची पहिली फवारणी लागवडीनंतर 45 दिवसांनी करावी. 
- दुसरी फवारणी लागवडीनंतर 60 दिवसांनी बीटी जिवाणू 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. 
- तिसरी फवारणी 75 दिवसांनी 15 मि.लि. डायक्‍लोरव्हॉस प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. 
- फळे तोडण्याच्या वेळी किडलेली फळे वेगळी करून खोल खड्ड्यात गाडावीत. 
- चौथी फवारणी लागवडीनंतर 90 दिवसांनी 10 ग्रॅम बीटी जिवाणू किंवा चार मि.लि. स्पिनोसॅड प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. 
- रसशोषक किडींचा प्रादुर्भाव आढळल्यास 20 ते 40 ग्रॅम व्हर्टिसीलियम किंवा पाच मि.लि. इमिडॅक्‍लोप्रिड प्रति 10 लिटर पाण्यातून आलटून पालटून फवारावे. - पिवळ्या चिकट सापळ्यांचा उपयोगसुद्धा रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी फायदेशीर ठरतो. शरद दळवे - 9975970888 
(लेखक कृषी महाविद्यालय, बारामती येथे कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment