Monday, April 22, 2013

इंजिनीयरनं शेतीतून कमवले आठ लाख

एखादा चांगला इंजिनीयर नोकरी-व्यवसायातून वर्षाकाठी सहा ते सात लाख सहज मिळवतो. पण गोंदिया जिल्ह्यातल्या चुटिया गावातील ऑटोमोबाईल इंजिनीयरनं व्यवसाय म्हणून शेतीची निवड केली आणि दोन महिन्यात आठ लाखांचं पॅकेज कमावण्याची किमयाही केली. ऋषी टेंभरे या युवकानं आपल्या चार एकर शेतीतून पंधरा दिवसांत काकडीचं ३०० क्विंटल उत्पादन घेतलंय आणि शेतीकडं युवा वर्ग आकर्षित होत नाही, या म्हणण्याला फाटा दिलाय. प्रामुख्यानं धानाची शेती करणाऱ्या गोंदियात त्यानं पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर काकडीचं उत्पादन घेत तिथल्या शेतकऱ्यांना वेगळा आदर्शच घालून दिला.




 
kakadi 1

निर्णय शेती करण्याचा...
ऑटोमोबाईल डिप्लोमा केलेल्या ऋषीनं अभियांत्रिकीचं क्षेत्र न निवडता आपला वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. भरघोस नफा देणारं फिल्ड हे शेतीच आहे, यावर त्याचं ठाम मत होतं. वडिलोपार्जित चार एकर शेतीत त्याची घरची मंडळी पारंपरिक पद्धतीनं धानाची शेती करीत. मात्र आपला डिप्लोमा पूर्ण केल्यावर या शेतीची सगळी सूत्रं त्यानं आपल्या हातात घेतली आणि १२-१२-१२ या तारखेचा योग साधत आपल्या शेतात निन्जा कंपनीच्या काकडीची लागवड केली.

अशी केली काकडी लागवड 
लागवड करण्यापूर्वी त्यानं संपूर्ण जमीन प्रथम नांगरून घेतली. नंतर आपल्या शेतात सात बाय सात अंतरावर पाटे तयार केले. याच पाट्यांवर त्यानं काकडीची लागवड केली. साधारण काकडी पिकाची तीन बाय चार अंतरावर लागवड करण्यात येते. मात्र काकडीबरोबरच पुढं पपईचं आंतरपीक घ्यायचं ठरवल्यामुळं त्यानं एवढं अंतर अगोदरच ठेवलं. यात त्यानं काकडीच्या बियाणांची लागवड केली. या पिकासाठी कोणत्याही रासायनिक खतांचा वापर न करता केवळ सेंद्रीय खतांचा वापर केला. त्याचसोबत पाण्याचं योग्य नियोजन करण्यासाठी संपूर्ण क्षेत्रामध्ये ठिबक सिंचनाची सोय केली. डिसेंबर महिन्यात लावलेल्या या काकडीच्या रोपांनी सध्या पीक देण्यास सुरुवात केली आहे.


kakadi photo 1एका तोड्यातून १५ ते २० क्विंटल उत्पादन

दर दिवसाला वेगवेगळ्या प्लाण्टमधून काकडीचा तोड केला जातो. ऋषीला एका तोड्यातून १५ ते २० क्विंटलचं उत्पादन मिळतं. काकडीचं पीक साडेतीन ते चार महिन्यांचं असतं. एकदा लागवड केली की, दीड महिन्यानंतर उत्पादनास सुरुवात होते. आतापर्यंत या प्लाण्टमधून ३० टन काकडीचं उत्पादन त्यानं घेतलं आहे.

योग्य नियोजन आणि खर्च 
काकडीच्या पिकाच्या लागवडीकरता ऋषीला एकरी पन्नास हजाराचा खर्च आला. काकडीला कीड लागू नये म्हणून बऱ्याच प्रकारच्या फवारणी कराव्या लागतात. शिवाय दिवसातून तीन वेळा पाणीसुद्धा द्यावं लागतं. काकडीवर पोट्याश, मॅग्नेशियम सल्फेट, १३०४५, ०५२३४, ००५०, कॅल्शियम नायट्रेटसारखी खतं द्यावी लागतात, असं ऋषी टेंभरे म्हणाला. आज एकरी दोन लाखांचा फायदा या साडेतीन महिन्यांच्या काळात तो घेतोय. या नफ्यातून लागवड खर्च वगळता त्याला दीड लाखांचा निव्वळ नफा या काकडीच्या लागवडीतून मिळणार आहे.


kakadi photo 2मार्केटिंग आणि नफा
 
ही काकडी गोंदिया, नागपूर, बालाघाट, जबलपूरसारख्या बाजारपेठेत जिथं जास्त भाव मिळेल तिथं विकली जाते. साधारणतः काकडीला दहा ते बारा रुपये किलोप्रमाणं भाव मिळतो. त्यातल्या त्यात हे काकडीचं वाण चांगलं असल्याकारणानं पंधरा रुपये किलोप्रमाणं बाजारभाव मिळतो. आपल्या चार एकर शेतीमध्ये केवळ साडेतीन महिन्यात आठ लाखांचा नफा झाल्याचं ऋषीनं 'भारत4इंडिया'शी बोलताना सांगितलं. कमी वेळेत भरपूर फायदा देणारं हे काकडीचं पीक आहे. त्यातच आरामाची नोकरी करण्यापेक्षा शेतीकडं वळून हा तरुण अवघ्या तीन ते चार महिन्यात लाखोंचा फायदा कमवतोय हे विशेषच. या विक्रमी उत्पादनामुळं इतरही तरुण शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत होतील आणि त्यांना शेती करण्यास नवीन दिशा मिळेल, अशी आशा त्यानं व्यक्त केली.
संपर्क : ऋषी टेंभरे, चुटिया, गोंदिया. मोबाईल - 9923479450

No comments:

Post a Comment