Monday, April 22, 2013

सातत्यपूर्ण प्रयत्नांतून ऊसशेती केली फायदेशीर

बदलत्या परिस्थितीमध्ये उसाचे एकरी उत्पादन वाढणे गरजेचे आहे, त्यासाठी उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून काही शेतकरी राबत आहेत. त्यात काहीजण चांगल्या प्रकारे यशस्वी झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील बावची (ता. वाळवा) येथील रामचंद्र कांबळे या शेतकऱ्याने 43 गुंठ्यांत आडसाली उसाचे 120 टन उत्पादन घेतले आहे. कोबीच्या आंतरपिकातून 50 हजारांचे उत्पन्न घेतले आहे. ऊस शेती परवडत नाही, असे म्हणाऱ्यांच्या समोर या शेतकऱ्याचा प्रयोग दिशादर्शक आहे. 

सांगली जिल्हा हा उसाचा पट्टा म्हणून पश्‍चिम महाराष्ट्रात चांगल्या प्रकारे परिचित आहे. साखर उताऱ्यातही हा जिल्हा पिछाडीवर नाही. अर्थात, या ऊसशेतीचा दुसरा भाग असा, की सिंचनाची चांगली सोय असल्याने अतिरिक्त पाण्याच्या वापरामुळे येथील जमिनी क्षारपड होत आहेत, त्यामुळे उसाचे उत्पादन एकरी 35 ते 40 टनांपुढे जाण्याची शक्‍यता कमी झाली. त्यातच कृषी निविष्ठांच्या वाढत्या किमती, उसाचे दर आदी कारणांमुळे ऊसशेती परवडत नाही असे म्हटले जात असले, तरी काही जिद्दी शेतकरी उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून शेतीत राबत आहेत. 

प्रयत्नात सातत्य - 
जिल्ह्यातील वाळवा तालुक्‍यातील बावची येथील रामचंद्र कांबळे यांची चार एकर शेती आहे, विहिरीच्या माध्यमातून पाण्याची सोय आहे. ऊस उत्पादनवाढीसाठी त्यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. त्याप्रमाणे एकरी 80, 90, 95 टनांपर्यंत उत्पादन घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या वर्षी मात्र त्यांनी 43 गुंठ्यांत 120 टनांचे उत्पादन घेऊन एक पाऊल पुढे टाकले आहे. 

या क्षेत्रात असणारे केळीचे खोडवा पीक गेल्यानंतर रोटरने खुंटाची कुट्टी करून टाकली जमिनीची नांगरट व पुन्हा रोटर मारून ती भुसभुशीत केली. सहा ट्रेलर कंपोस्ट खत विस्कटून टाकले. चार फुटांच्या समान अंतरावर सऱ्या सोडून घेतल्या. जून महिन्याच्या शेवटी, वरच्यावर दोन्ही बाजूला एक फुटाच्या समान अंतरावर फुलकोबीची रोपे लावली. आठ दिवसांनी आळवणी दिली. पुढे जुलै महिन्याच्या अखेरीस को 86032 जातीच्या उसाची एक डोळा पद्धतीने लावण केली. एका महिन्यात संपूर्ण शेतावरील उगवण पूर्ण झाली. दरम्यानच्या काळात फुलकोबीच्या वाढीसाठी व किडींचा प्रादुर्भाव रोखणसाठी पूरक कीडनाशके फवारण्यात आली. सुमारे 60 दिवसांनी फुलकोबीचे प्रत्यक्ष उत्पादन सुरू झाले. सांगली, इस्लामपूर येथील बाजारांत सौद्यातून त्याची विक्री केली. फुलकोबीच्या आंतरपिकातून खर्च वजा जाता 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. आडसाली ऊस तोपर्यंत तीन महिन्यांचा झाला होता. 

खत व्यवस्थापन -
ऊस उत्पादनवाढीसाठी केलेले खत व्यवस्थापन व केळी पिकाचा बेवड फायदेशीर ठरल्याचे रामचंद्र यांचे म्हणणे आहे. लावणी वेळी त्यांनी चार पोती सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर केला. सुमारे 90 दिवसांनी जेठा कोंब कापून घेतला. त्या वेळी दोन बॅग युरिया व दोन बॅग पोटॅश असा डोस दिला. भरणीच्या वेळेस 12 पोती निंबोळी पेंड, 10 पोती सेंद्रिय खत, 10 किलो झिंक, 10 किलो फेरस, 10 किलो बोरॉन, दोन पोती पोटॅश, दोन पोती 10.26.26, एक पोते युरिया यांचे एकत्रित मिश्रण करून तो ढीग पंधरा दिवस तसाच ठेवला. त्यानंतर तो भरणी वेळी वापरला. सुयोग्य खत व्यवस्थापनामुळे उसाची जाडी व पेऱ्यांची संख्या वाढली. ऊस गळितास जाईपर्यंत 40 ते 45 इतकी पेऱ्यांची संख्या राहिली. 

संपूर्ण क्षेत्रावर ठिबक -
रामचंद्र यांनी संपूर्ण चार एकर शेताला ठिबक सिंचन केले आहे, जमीन निचऱ्याची असल्याने वाफसा लगेच येतो, ठिबक सिंचनामुळे पिकाला योग्य प्रमाणात पाणी दिले जाते. ऊस मोठा झाला तरी ठिबकद्वारे खते देता येतात. त्याचा वाढीस मोठा फायदा होतो. 

आंतरपिकांत सातत्य - 
रामचंद्र यांचा ऊसशेतीमध्ये आंतरपीक घेण्याचा हातखंडा आहे. कोबी, टोमॅटो अशी पिके ते घेतात. या पिकांना फवारणीसाठीची कीडनाशके वगळता वेगळा फारसा खर्च करावा लागत नाही, असे त्यांचे मत आहे. ऊस मोठा होईपर्यंत तीन ते साडेतीन महिन्यांत आंतरपिके घेण्याचा फायदा मिळून जातो. या पिकांमधून ऊसशेतीतील खर्च कमी करता येतो. रामचंद्र यांना मुलगा प्रकाश याचीही शेतात मोठी मदत होते. शेतीतील छोटी कामे स्वतः करायची, मोठ्या कामांसाठी फक्त मजूर वापरायचे, असे तंत्र त्यांनी अवलंबिले आहे. शेतीच्या प्रगतीमधूनच त्यांनी गावात टुमदार घर उभारले आहे. चार म्हशी दावणीला आहेत. शेतीतूनच हे सारे शक्‍य झाल्याचे त्यांनी सांगितले. 

रामचंद्र यांना ऊसशेतीत पुणे येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे माजी शास्त्रज्ञ ए. एन. साळुंखे यांनी चार वर्षांपूर्वी प्रोत्साहित केले, त्यातूनच त्यांना उत्पादनवाढीची गोडी लागली. 

रामचंद्र यांना ऊसशेतीत आलेला साधारण खर्च असा - 
खर्च (रुपये) 
मशागत - 6000 
कंपोस्ट खत - 13,745 
कोबी तरू - 1200 
ऊस बियाणे - 7500 
ऊस लावण - 3000 
भांगलण - 4000 
पाणी - 4000 
रासायनिक, सेंद्रिय खत - 28,000 

एकूण खर्च - 67,445 
कोबी पिकातून 50 हजार रु. तर ऊस पिकातून पहिल्या बिलांत दोन लाख 46 हजार रुपये उत्पन्न मिळाले. खर्च वजा जाता 2,28,455 रुपये इतके निव्वळ उत्पन्न मिळाले. 
संपर्क ः रामचंद्र कांबळे - 9370051182 

उसाबरोबर केळीही फायदेशीर 
ऊसशेती किफायतशीर होण्याच्या दृष्टीने रामचंद्र कांबळे यांना ठिबकद्वारे पाण्याचे व्यवस्थापन अत्यंत महत्त्वाचे वाटते. त्याचबरोबर उसात आंतरपिके घेतल्याने खर्च कमी होतो. यंदा 43 गुंठ्यांत 120 टन उत्पादन घेतलेल्या कांबळे यांनी यापूर्वी केळी पीकही यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये पहिल्या पिकातून त्यांना एकरी 40 टनांपर्यंत, तर खोडवा पिकातून त्यांनी 35 टनांपर्यंत उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला. आपल्या एकूण चार एकर शेतीमध्ये ऊस हे त्यांचे मुख्य पीक असून केळी, भाजीपाला, तसेच अन्य पिकांची विविधता जपण्याचा ते प्रयत्न करतात. रासायनिक खतांबरोबर सेंद्रिय तसेच शेणखताचा वापर करण्यावरही त्यांनी भर दिला आहे. 

उसातील आंतरपिकांचे महत्त्व 
उसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून निघून जातो. सुरू उसामध्ये भुईमूग, कोबी, फुलकोबी, मेथी, कोथिंबीर, कलिंगड, काकडी व कांदा ही आंतरपिके घेता येतात. द्विदल वर्गातील आंतरपिके घेतल्यास जमिनीचा पोत सुधारतो. सुरू उसाचा कालावधी 12 ते 13 महिन्यांचा असतो. लागणीचा योग्य कालावधी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा आहे. उसाची लागवड केल्यानंतर पूर्ण उगवण होण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागतो. सुरवातीच्या कालावधीमध्ये उसाची वाढ हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन सऱ्यांमध्ये आंतरपीक घेण्यासाठी भरपूर मोकळी जागा असते. सुरू उसामध्ये आंतरपिकाची निवड केल्यानंतर त्या आंतरपिकाच्या जमीन क्षेत्राच्या प्रमाणानुसार आंतरपिकाच्या बियाण्याचे प्रमाण ठरविणे गरजेचे आहे. 

उसामध्ये आंतरपिके घ्यावयाच्या पद्धती -
1) सरी-वरंबा पद्धत (पारंपरिक पद्धत) ः जमिनीच्या प्रकारानुसार हलक्‍या जमिनीत 90 सें.मी., मध्यम जमिनीत 100 सें.मी. व भारी जमिनीत 120 सें.मी. अंतरावर सऱ्या - वरंबे पाडून उसाची लागण सरीमध्ये केल्यानंतर दुसरे पाणी (आंबवणी) देण्याच्या अगोदर वरंब्याच्या दोन्ही बगलेत आंतरपिकाची टोकण पद्धतीने करावी. कोबी, फुलकोबी व कांद्याची लागण रोपे लावून करावी. 

2) पट्टा पद्धत ः या पद्धतीत 75 किंवा 90 सें.मी. अंतरावर सलग सऱ्या पाडून दोन सऱ्यांत ऊस लागवड करून तिसरी सरी मोकळी सोडावी. अशा प्रकारे जोडओळ लागवड करून राहिलेल्या 150 सें.मी. किंवा 180 सें.मी. पट्ट्यात आंतरपिकाची लागवड करावी. या पद्धतीत उसाच्या उत्पादनात घट येत नाही. आंतरपीक निघाल्यानंतर उसात आंतरमशागत करणे सुलभ जाते. 

आंतरपिकांसाठी खतमात्रा ः उसामध्ये आंतरपिकाची लागवड केली असता आंतरपिकास त्याच्या व्यापलेल्या क्षेत्राच्या प्रमाणानुसार शिफारशीत खतमात्रा द्यावी. आंतरपिके साधारण 100 ते 110 दिवसांनंतर काढणीस येतात. आंतरपिकाची काढणी केल्यानंतर खतमात्रा देऊन उसाची बांधणी करावी. 
(स्रोत - मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा) 

No comments:

Post a Comment