Wednesday, April 17, 2013

गांडूळ खतावर पोसला डोंगर उतारावरील ऊस

डोंगर उताराच्या मुरमाड जमिनीत ऊस शेतीतून चांगले उत्पादन व उत्पन्न मिळविण्याचा उद्देश पाली (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील अरविंद श्रीधर नानिवडेकर यांनी ठेवला आहे. यासाठी गेल्या सात - आठ वर्षांत त्यांनी शेतीमध्ये विविध प्रयोग केले आहेत. यातूनच त्यांनी कृषी विभागाच्या मदतीने गांडूळ खत प्रकल्प उभारला आहे. स्वतःच्या जमिनीची सुपीकता पोत टिकवत गांडूळ खताची विक्री करून जोड व्यवसायाचा एक वेगळा आदर्श त्यांनी शेतकऱ्यांसमोर ठेवला आहे. 

कोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्‍यातील पश्‍चिम घाटाच्या रांगेत कासारी नदीकाठी पाली हे गाव वसले आहे. करंजफेण या ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये या गावाचा समावेश होतो. या गावात अरविंद नानिवडेकर यांची वडिलोपार्जित 14 एकर शेती आहे. सन 1983 मध्ये अरविंद एम.ए. झाले. उच्चशिक्षित होऊनही त्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित शेती व्यवसायच करण्याचा निर्णय घेतला. अरविंद यांचे वडील श्रीधर यांना जनावरे पाळण्याचा शौक होता. वडिलांच्या काळात गोठ्यात जवळपास 60 जनावरे असत. आजही अरविंद यांच्या गोठ्यात दहा संकरित गाई, दोन संकरित म्हशी आहेत. येथील हवामान जनावरांच्या संगोपनासाठी पोषक आहे; तसेच येथे उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाईही भासत नाही. यामुळे कमी खर्चात अधिक उत्पन्न पशुपालनाच्या व्यवसायातून मिळविणे सहज शक्‍य आहे. 

डोंगर उतारावर ऊस शेती 
अरविंद यांची शेती ही डोंगरमाथ्यावर आहे. बरेचसे शेत उतारावर असल्याने ते पडीकच ठेवणे भाग होते. पण, अरविंद यांनी या पडीक जमिनीत ऊस शेतीचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला. येथील बरेचसे शेतकरी डोंगर उतारावर शेती करताना डोझरच्या साहाय्याने जमीन समपातळीत करून घेतात. यासाठी लाखो रुपये खर्च करतात. कर्ज काढून इतका खर्च करणे अरविंद यांना मान्य नव्हते. त्यांनी डोंगर उतारावरच ऊस शेतीचा निर्णय घेतला. दरवर्षी करण्यात येत असलेल्या नांगरटीमधून हळूहळू ही जमीन समपातळीत करण्याकडे त्यांचा कल राहिला. अरविंद यांचे उसाचे एकूण क्षेत्र 14 एकर आहे. यातील डोंगर उतारात दोन एकर क्षेत्र आहे. यातून उसाचे एकरी 25 टन उत्पादन ते घेतात. तर इतर क्षेत्रातून एकरी 40 टनांपर्यंत उत्पादन त्यांना मिळते. खोडव्याचे उत्पादन 30 ते 35 टनांपर्यंत मिळते. 

गांडूळ खत निर्मितीकडे... 
डोंगर उतारात नांगरट केल्यानंतर अरविंद यांच्या शेतात मातीऐवजी मुरूमच अधिक होता. या शेतात पिके कशी उगविणार आणि यातून उत्पन्न तरी किती मिळणार? हा प्रश्‍न अरविंद यांना सतावत होता. यावर कृषी मदतनीस शिवाजी ढवळे आणि तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब धुमाळ यांनी अरविंद यांना गांडूळ खताचा पर्याय सुचविला. सन 2005 मध्ये गांडूळ खत निर्मितीसाठी कृषी विभागामार्फत अनुदानही वाटप केले जात होते. गांडुळांमुळे जमिनीची मशागतही होईल व सेंद्रिय खतामुळे जमिनीचा पोतही सुधारला जाईल या हेतूने अरविंद यांनी गांडूळ खत निर्मितीचा निर्णय घेतला. 

शेड उभारणीसाठी शासनाचे अनुदान 
अरविंद यांनी गांडूळ खताच्या निर्मितीसाठी शेडची उभारणी केली. या शेडमध्ये 20 फूट लांब, तीन फूट रुंद आणि अडीच फूट उंचीचे हौद बनविले. या हौदात गांडूळ खत निर्मितीसाठी सुरवातीला वाळलेला काडीकचरा त्यावर शेण, परत ओला काडीकचरा, त्यावर शेणकाला असे करत हौद संपूर्णपणे भरला. त्यात सतत ओलसरपणा राहील इतके पुरेसे पाणी टाकले. त्यात 25 किलो गांडूळ कल्चर टाकले. शेड उभारण्यासाठी आणि हौदांच्या निर्मितीसाठी अरविंद यांना 60 हजार रुपये खर्च आला. यात कृषी विभागाने शेड उभारणीसाठी 15 हजार रुपयांचे अनुदान दिले; तसेच दहा हजार रुपयांचे जयसिंगपूर येथील गांडूळ प्रकल्पातून गांडूळ कल्चरही (गांडूळ बीज) उपलब्ध करून दिले. चांगल्या प्रतीचे गांडूळ खत तयार होण्यासाठी साधारणपणे दोन महिन्यांचा कालावधी लागतो. दोन महिन्यांनंतर हे खत काढून त्यामध्ये पुन्हा नव्याने खतासाठी शेण व कल्चर टाकण्यात येते. साधारणपणे एका हौदात दोन टन खत तयार होते. वर्षातून चार ते पाच टप्प्यांत खत तयार केले जाते. खताच्या निर्मितीसाठी अर्धवट कुजलेले शेण वापरतात. ताजे शेण वापरल्यास उष्णतेमुळे गांडुळाचे बीज मरून जाण्याचा किंवा गांडुळांची वाढ योग्य प्रकारे न होण्याचाही धोका असतो. 

वीस टन खताचे उत्पादन 
अरविंद दरवर्षी साधारणपणे 50 ते 60 टनांपर्यंत खताचे उत्पादन घेतात; मात्र दोन वर्षांपूर्वी त्यांची हृदयविकारावर शस्त्रक्रिया झाली, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खत उत्पादन घेण्यात अडचणी आल्या. यंदा त्यांनी केवळ 20 टन खताचे उत्पादन घेतले आहे. खत उत्पादनातील दहा टन खत स्वतःच्या शेतीसाठी वापरतात, तर उर्वरित खताची ते विक्री करतात. साधारणपणे साडेतीन रुपये प्रति किलो दराने खताची विक्री केली जाते. कोकणात फळबागांसाठी सेंद्रिय खताची टंचाई भासते. कोकणातील बागायतदार हे खत विकत घेऊन जातात. 

कल्चरची निर्मिती 
तीन फूट रुंद, दोन फूट उंच, दहा फूट लांबीचा खड्‌डा तयार केला जातो. त्यात पालापाचोळा, शेणखत टाकून दोन महिन्यांत कल्चर तयार केले जाते. 

दुग्ध व्यवसायातून लाखाची कमाई 
अरविंद यांनी गांडूळ खतासाठी जनावरांचे संगोपन केले आहे. दहा गाई, दोन म्हशी यांच्या संगोपनातून दररोज 40 ते 50 लिटर दूध उत्पादन मिळते; तसेच गांडूळ खतासाठी आवश्‍यक असणारे शेणही मिळते. दररोज साधारणपणे 100 किलो शेण मिळते. अरविंद दररोज 35 लिटर गाईचे दूध व सहा लिटर म्हशीचे दूध डेअरीला घालतात. यातून महिन्याला त्यांना दीड लाख रुपयांची कमाई होते. गांडूळ खत निर्मिती व जनावरांच्या संगोपनाचा खर्च वजा जाता वर्षाला त्यांना दीड लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. 

चारा व्यवस्थापन 
जनावरांना बारमाही चारा मिळावा यासाठी एक एकरावर बाजरी व एक एकरावर यशवंत गवताची लागवड अरविंद यांनी केली आहे. या व्यतिरिक्त वाळलेले गवत, उसाचा पाला यांचाही वापर ते चारा म्हणून करतात.

No comments:

Post a Comment