Monday, April 22, 2013

लक्षात घ्या ऊसवाढीच्या अवस्था

उसापासून अपेक्षित उत्पादन मिळण्यासाठी ऊसवाढीच्या निरनिराळ्या अवस्थांचे शरीरक्रियाशास्त्र समजून घेणे महत्त्वाचे आहे. त्यानुसार पीक व्यवस्थापनाचा अवलंब करावा. ऊसवाढीच्या अवस्था या आनुवंशिकता, शरीरक्रियाशास्त्रीय तथा जीवरासायनिक क्रिया आणि निरनिराळी संप्रेरके व विशिष्ट विकरे त्यांच्या नियंत्रण खाली असतात. त्यासाठी शिफारशीत हंगामनिहाय जातींची लागवड करावी. 
डॉ. आर. एम. गारकर, के. एम. गवारी, पी. पी. खंडागळे 

1) उगवण - उसाच्या उगवणीसाठी 28 ते 33 अंश सेल्सिअस तापमान योग्य असते. तापमान कमी झाल्यास उसाच्या उगवणीवर अनिष्ट परिणाम होऊन उगवणक्षमता कमी होते. या अवस्थेचा कालावधी एक ते दीड महिन्यांचा असतो (30 ते 45 दिवस). ऊस लागवड केल्यानंतर कांडीचा जमीन, हवा, पाणी, अन्नद्रव्ये यांच्याशी संपर्क येतो. त्यामुळे जीवरासायनिक क्रिया व विकरांच्या माध्यमातून कांडीतील सुक्रोजचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होण्यास सुरवात होते. तसेच पाणी व विद्राव्य नत्र यांची उपलब्धता वाढते. पेऱ्याजवळील मूळ प्रेषक गाठीपासून कांडी मुळांची वाढ सुरू होते; तर खवल्यांनी आच्छादित डोळ्यापासून खोडाची वाढ सुरू होते. खोडाची वाढ होत असताना तळाकडील कांड्यापासून खोड मुळांची वाढ सुरू होते. तथापि, खोडमुळे कार्यक्षम होईपर्यंत कांडी मुळांचे कार्य महत्त्वाचे असते. उगवण पूर्ण होईपर्यंत जमिनीत ओलावा असणे महत्त्वाचे आहे. म्हणून पाणी कमी प्रमाणात कमी अंतराने द्यावे. 

फुटवे - फुटव्यांचे प्रमाण हा ऊस जातीचा आनुवंशिक गुणधर्म असला तरी वातावरणातील घटकांचाही परिणाम होतो. फुटव्यांच्या वाढीसाठी 20 अंश सेल्सिअससाठी तापमान आवश्‍यक असते. तापमान 35 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त आणि 10 अंश सेल्सिअस पेक्षा कमी असेल तर फुटव्याच्या वाढीवर अनिष्ट परिणाम होतो. साधारणतः ही अवस्था दीड ते दोन महिन्यांची असते. या अवस्थेमध्ये नवीन मुळे, पाने व खोडांची वाढ सतत होत राहते. खोडाच्या नळाकडील भागात चकतीसारख्या कांड्याची वाढ होते. प्रत्येक कांडीस एक पान व एक डोळा असतो. याच डोळ्यापासून फुटवे फुटतात. या अवस्थेमध्ये भरपूर सूर्यप्रकाश खेळती हवा असणे गरजेचे असते. या कालावधीमध्ये नत्राचा दुसरा हप्ता (40 टक्के नत्र) देणे आवश्‍यक आहे. 

पूर्ववाढ - 
पूर्ववाढीची अवस्था सर्वसाधारणपणे दीड ते दोन महिने असते. या अवस्थेत पानांची लांबी, रुंदी, हरित द्रव्यांचे प्रमाण प्रकाश संश्‍लेषण क्रिया हरित पर्ण व जमीन यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर तसेच मुळांची वाढ व पाणी, अन्नद्रव्ये शोषण वहनक्षमता वाढते. त्यापुढील जोमदार अवस्था किंवा ------मुख्य वाढीची पूर्वतयारी होते. या काळात नत्राची तिसरी (10 टक्के) मात्रा द्यावी. 

मुख्य वाढ - तापमान 21 ते 28 अंश सेल्सिअस आणि आर्द्रता 90 टक्के असेल तर उसाची वाढ जोमदार होते. ही अवस्था हंगामनिहाय सर्वसाधारणपणे तीन ते आठ महिने असते. साधारणतः ऑक्‍टोबरपर्यंत ही जोमदार वाढीची अवस्था असते. त्यानंतर कमी होणाऱ्या तापमानामुळे जोमदार वाढीचा वेग कमी होत जातो. या अवस्थेमध्ये प्रकाश संश्‍लेषण क्रियेद्वारा सेंद्रिय कर्बोदकांची (पिष्टमय/ शर्करा) अन्नपदार्थांची निर्मिती व साठवण जोमदारपणे चालते. त्यामुळे नवीन पाने, कांड्या येणे व कांड्यांची संख्या, वजन, लांबी, रुंदी वाढणे, उसाची उंची, जाडी व वजन वाढते या क्रिया वेगाने होतात. यासाठी या कालावधीत भरपूर सूर्यप्रकाश, उष्ण हवामान आणि पाण्याचे नियोजन व्यवस्थित असावे लागते. या अवस्थेत ऊस लागणीनंतर साधारणपणे साडेचार ते पाच महिन्यांनी उसाची पक्की बांधणी 40 टक्के नत्र आणि उर्वरित 50 टक्के स्फुरद व पालाश मात्रा देऊन करावी. 

पक्वता - उसाच्या जोमदार वाढीच्या अवस्थेनंतर म्हणजेच ऑक्‍टोबरनंतर तापमान जसजसे 15 अंश ते 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी होत जाईल, तसतसे थंडीचे प्रमाण वाढते. तेच हवामान ऊस पक्वतेस पोषक ठरते. ही अवस्था तीन ते चार महिन्यांची असते. उसाची पाने पिवळी होत जातात. त्यामुळे साहजिकच प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. इतर रासायनिक व जीवरासायनिक क्रियांचा वेग वाढतो. उदा. ग्लुकोजचे रूपांतर सुक्रोजमध्ये होऊन रसातील साखरेचे प्रमाण रसाची शुद्धताही वाढते. रसातील नत्र- स्फुरदाचे प्रमाण कमी होते, साखरेची साठवण आणि उतारा वाढत राहतो. तसेच दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानामध्ये जास्त तफावत असेल, तर पक्वता लवकर येते. थंड हवामानाचा कालावधी जितका जास्त तितका साखर उताराही (टक्के) वाढतो. 

तुरा येणे - 
उसाची वाढ पूर्ण झाल्यानंतर विशिष्ट पोषक हवामानामध्ये उसाला तुरा येतो; परंतु यामध्ये उसाची जात, जमीन प्रकार, भौगोलिक स्थान, पाऊसमान, मशागत तंत्र, खत, पाणी व तण व्यवस्थापन, हंगाम इ. गोष्टी व प्रामुख्याने हवामान या घटकाचा प्रभाव महत्त्वाचा असतो. साधारणतः तापमान 20 अंश ते 25 अंश सेल्सिअस हवेतील आर्द्रता 65 ते 90 टक्के, दिवसमान (प्रकाश कालावधी) 12.5 तास व रात्रीचा कालावधी 11.5 तास प्रकाश तीव्रता 10,000 ते 12,000 फूट कॅण्डल्स अशी परिस्थिती उसामध्ये फुलकळी तयार होऊन तुरा येण्यास पोषक ठरते. अशा पोषक अनुकूल हवामान उसाच्या शेंड्यातील कायिकपणे वाढणाऱ्या अग्रकोंबाचे रूपांतर फुलकळीत होते व नंतर साधारण सात ते 10 आठवड्यांनी तुरा बाहेर पडतो. तुरा आल्यानंतर उसाची कायिक वाढ पूर्णपणे थांबते, उसाची पक्वताही वाढत जाते. तुरा आल्यानंतर साधारणपणे दोन ते 2.5 महिन्यांत उसाची तोडणी झाली नाही, तर उसाला पांगशा फुटणे, दशी पडणे, वजन घटणे व साखर उतारा कमी होणे अशा प्रकारचे नुकसान होते. उसाचे वजन व साखर उतारा टिकवून ठेवणे हा ऊस जातीचा आनुवंशिक गुणधर्म आहे. 

1) उगवण चांगली होण्यासाठी महत्त्वाचे घटक - 
अ) जमिनीची योग्य प्रत, ब) चांगल्या प्रकारची पूर्वमशागत, क) उत्तम दर्जाचे निरोगी बेणे, ड) सेंद्रिय तसेच रासायनिक खतांची हंगामनिहाय शिफारशीत मात्रा (10 टक्के नत्र, तसेच 50 टक्के स्फुरद व पालाश). 
2) उगवणीचे प्रतिकूल भौतिक घटक ः 
अ) जास्त वयाचे ऊस बेणे, ब) कीड व रोगग्रस्त बियाणे वापर, क) जास्त खोलवर लागण, ड) अतिरिक्त पाण्याचा वापर, इ) काडीवरील डोळ्यांची अयोग्य स्थिती, ई) प्रतिकूल हवामान, उ) सेंद्रिय व रासायनिक खतांचा असंतुलित वापर, ऊ) हंगामनिहाय जातींची लागवड न करणे. 

ऊस पीकवाढीच्या अवस्था - उगवण - 
* साधारण 1.5 ते दोन महिने कालावधी. 
* कांडीतील सुक्रोजचे रूपांतर ग्लुकोजमध्ये होण्यास सुरवात. 
* पाणी व विद्राव्य नत्र याची उपलब्धता वाढते. 
* कांडी मुळांची वाढ सुरू होते. 
* खोडाची वाढ खवल्यांनी आच्छादित डोळ्यापासून सुरू होते. 
* तळकांड्यापासून खोड मुळांची वाढ सुरू होते. 

फुटवे - 
* साधारणपणे 1.5 ते दोन महिने कालावधी. 
* खोड, पाने व मुळांची वाढ होत राहते. 
* चकतीसारख्या कांड्याची वाढ होते. 
* कांडीच्या डोळ्यापासून फुटवे फुटतात. 

पूर्ववाढ - 
* सर्वसाधारण 1.5 ते दोन महिने कालावधी. 
* पानाची लांबी व रुंदी वाढते. 
* हरित द्रव्याचे प्रमाण व प्रकाश संश्‍लेषण क्षमता वाढते. 
* हरित पर्ण व जमीन याच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर वाढते. 
* मुळांची वाढ व अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते. 

जोमदार किंवा मुख्य वाढ - * साधारण हंगामानुसार चार ते आठ महिने कालावधी. 
* प्रकाश संश्‍लेषण क्रियेद्वारा कर्बोदकाची निर्मिती व साठवण जोमदारपणे चालते. 
* नवीन पाने व नवीन कांड्या येणे वेगाने सुरू होते. 
* कांड्याची संख्या, वजन, लांबी- रुंदी वाढते. 
* उसाची उंची, जाडी व वजन वाढते. 

पक्वता - 
* साधारण हंगामानुसार चार ते आठ महिने कालावधी. 
* हवामानात उसाच्या पक्वतेस सुरवात. 
* साधारण 15 ते 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानास पक्वतेस सुरवात होते.
* प्रकाश संश्‍लेषण क्रिया मंदावते. 
* ग्लुकोजचे सुक्रोजमध्ये रूपांतर वाढते. 
* रसातील नत्र व स्फुरद यांचे प्रमाण वाढून उसातील साखरेचा उतारा वाढतो. 
टीप - ऊस जातींचे आनुवंशिक गुणधर्म आणि हंगाम/ हवामान यानुसार यामध्ये विशिष्ट बदल होतात. 

संपर्क - 02169- 265337, 265333 
(लेखक मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, जि. सातारा येथे कार्यरत आहेत.)

No comments:

Post a Comment