Monday, April 22, 2013

आम्ही पिकवलेल्या पपईचा आम्हीच ठरवला भाव

हिंगोली जिल्ह्यातील काही तालुक्‍यांतील पपई उत्पादकांनी संघस्थापनेच्या माध्यमातून गटशेती सुरू केली आहे. लागवड आणि मुख्यत्वे विक्री व्यवस्था वा दर चांगला मिळवणे हा त्यामागील हेतू आहे. मार्केटमधील पपईच्या भावापेक्षा संघ ठरवेल तोच भाव संघातील प्रत्येकाला मिळावा, हेच संघस्थापनेचे उद्दिष्ट आहे. 

व्हायरससारख्या समस्या आहेत, मात्र एकीच्या शक्तीतून या पिकावर वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न मराठवाड्यातील या शेतकऱ्यांनी केला आहे. 

पपई पिकाचा प्रयोग अनेक शेतकऱ्यांनी केला आहे. या पिकात व्हायरस किंवा मार्केट रेट या दोन गोष्टींची भीती शेतकऱ्यांना नेहमी भेडसावते. मराठवाड्यातील हिंगोली, वसमत अशा तालुक्‍यांमधील शेतकऱ्यांनी मात्र पपईचा संघ स्थापन करून संघशेती वा गटशेतीतून हे पीक लागवडीच्या आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे विक्री व्यवस्थेच्या दृष्टीने फायदेशीर करण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे. संघात बहुतांश शेतकरी तरुण रक्ताचे आहेत. अध्यक्ष मात्र जुन्या पिढीचे अनुभवी पपई उत्पादक आहेत. कोणत्याही प्रतिकूल हवामानात वा बाजारपेठेच्या बेभरवशाच्या परिस्थितीत "डगमगायचे नाही' ही भावना ठेवूनच त्यांची पपई शेतीतील घौडदौड सुरू आहे. 

वसमत तालुका कृषी अधिकारी डी. एम. काळे यांचा त्यांना "फूल सपोर्ट' मिळाला आहे. त्यांच्या माध्यमातून कृषी विभागाच्या विविध योजना, कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, चर्चात्मक कार्यक्रम आदी उपक्रम पपई उत्पादकांसाठी लाभदायक ठरत आहेत. 

...अशी आहे संघाची वाटचाल 
मार्केटमध्ये पपईला जो भाव सुरू आहे, त्यापेक्षा संघ ठरवेल तोच भाव संघातील प्रत्येकाला मिळावा हेच संघ स्थापनेचे उद्दिष्ट ठेवले आहे. संघातील गिरगावचे तरुण सदस्य शिवप्रसाद उधाणे इंजिनिअर आहेत. एमईचे पहिले वर्षही त्यांनी पूर्ण केले. सुमारे चार वर्षे कंपन्यांत नोकरी केली. आजही उत्तम पगाराची संधी त्यांना मिळाली असती; पण वडिलांचे निधन झाल्यानंतर घरच्या शेतीची जबाबदारी त्यांच्यावर आली आणि शेती हेच त्यांच्या जीवनाचे करिअर झाले. आज आत्मविश्‍वासपूर्वक ते शेतीत पावले टाकत आहेत. संघशेतीतील त्यांचे प्रातिनिधिक उदाहरण येथे अभ्यासता येईल. 

लागवडीचे शास्त्र 
उधाणे यांची एकूण 40 एकर संयुक्त शेती. चार एकरवर दहा बाय पाच फूट अंतरावर ऑक्‍टोबर 2010 मध्ये पपईची (तैवान) लागवड केली. सुमारे 3250 झाडे आहेत. बागेच्या चांगल्या संगोपनातून सुरवातीच्या टप्प्यात 120 टन माल विक्री झाला. खर्च दोन लाख 13 हजार रुपये झाला. उत्पन्न सात लाख 30 हजार रुपये मिळाले. एकरी सरासरी 30 टन उत्पादन मिळाले. काढणीच्या अंतिम टप्प्यात 38 टन 527 किलो माल विक्रीला गेला. 
हंगामात पहिल्या 40 टन मालाला चार रुपये प्रति किलो, नंतरच्या 40 टनांना 10 रुपये, तर पुढील 40 टनांना पाच रुपये दर मिळाला. दिवाळीपासून रेट मंदावले; मात्र सरासरी चार रुपये दर राहिला. काही माल फरिदाबाद, दिल्ली, मथुरा या ठिकाणी गेला. मुंबई मुख्य मार्केट राहिले. अंतिम टप्प्यातील 38 टन माल नागपूर, जळगाव भागातील चेरीनिर्मितीच्या फॅक्‍टरीला 80 पैसे प्रति किलो दराने विकला. सध्या बाजारात पपईला किलोला एक ते दोन रुपये दर सुरू असताना काहीशा कच्च्या अशा शेवटच्या या मालाचा हा सौदा अनुकूल ठरल्याचे उधाणे म्हणाले. चार एकर नवी पपईबाग लावली आहे. यंदा हवामानाची परिस्थिती विषम आहे. पिकाची वाढ मंद आहे. एकूण हंगामातील 75 टक्के माल संघाच्या माध्यमातून विकला. चेरी फॅक्‍टरीला माल देतानाही संघाला विश्‍वासात घेतले. शेतीत इंजिनिअर वृत्ती जोपासली. पपई शेतीतून नवा ट्रॅक्‍टर, आंतरमशागतीसाठी पॉवर टिलर घेतला, असेही उधाणे यांनी सांगितले. 

ठळक नोंदी 
1) वसमत तालुक्‍यातील स्थानिक व्यापारी पपईची थेट ऑर्डर घेतात. आम्ही त्यांच्या संपर्कात असतो. व्यापारी माल पाहतात. त्यानंतर जागेवर माल विकला जातो. तोडणी, पेपर बाइंडिंग, लेबर त्यांचे असतात. फक्त प्लॉटमधून वाहनापर्यंत वा मुख्य रस्त्यापर्यंतची फळवाहतूक शेतकऱ्याला करावी लागते. बाकी वाहतूक खर्च नसतो. 

शेतकरी म्हणाले... 
1) उधाणे म्हणाले, की आमच्या भागात ऊस, केळी, हळद, कापूस आदी पिके होतात. पपई हे हटके पीक आहे. पाणी, हवामान यांचा परिणाम केळीवर अधिक होतो. भारनियमनामुळे केळीचे लाखोंचे नुकसान होऊ शकते. आठ दिवस वीज नसेल तरी पपईचे 100 टक्के नुकसान होत नाही. पपईत व्हायरस ही मुख्य समस्या आहे. रसशोषक किडी वा अन्य किडींच्या नियंत्रणासाठी आम्ही सुमारे 15 फवारण्या 10 महिन्यांत करतो. आमचे 90 टक्के प्लॉट व्हायरसमुक्त ठेवण्याचा प्रयत्न केला. मी स्वतःच्या रोपवाटिकेत रोपे तयार केली. शिल्लक रोपे शेतकऱ्यांना पुरवली. रमझानच्या काळात 120 टन माल विकला. केवळ संघामुळे प्रति किलो एक रुपया दर अधिक मिळाला. 
2) विजय नरवाडे म्हणाले, की संघाचे 17 सदस्य आहेत. प्रत्येकाचा असा फायदा झाला, तर एकूण सतरा लाख रुपये फायदा संघ स्थापन केल्यामुळे होऊ शकतो, तोही एका महिन्यात (रमझानच्या विक्री हंगामात). प्रत्येक पिकासाठी असा विचार केल्यास हा आकडा कोट्यवधीमध्ये जाऊ शकतो, फक्त सर्वांनी एक होणे गरजेचे आहे. 
3) सध्या व्हायरसची समस्या आहे 
नरवाडे म्हणाले, की यंदाच्या वर्षी व्हायरसची समस्या प्रत्येक सदस्याकडे थोड्या फार प्रमाणात आहे. व्हायरस कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक पिकात काही तरी समस्या असतेच; पण म्हणून कोणी ते पीक सोडून देत नाही. आम्हीही हे पीक सोडणार नाही. मार्केटिंगसाठी गटशेतीचा आम्हाला फायदा झाला आहे. 

व्यापाऱ्यांच्या चलाखीतून संघ झाला स्थापन 
पपई संघाचे अध्यक्ष व डोंगरखेडाचे (ता. कळमनुरी) भिकाजी गावंडे म्हणाले, की ऑगस्ट 2010 मध्ये संघ स्थापन केला. त्यापूर्वी प्रत्येकाची पपई शेती व विक्री स्वतंत्र होती. त्या वेळी स्थानिक व्यापारी विवेकरावांना म्हणायचे की विजयरावांपेक्षा तुमचा माल चांगला आहे. एक रुपया दर तुम्हाला अधिक वाढवून देतो; पण विजयरावांना हे सांगू नका. त्याच वेळी विजयरावांना हे व्यापारी सांगायचे, की विवेकरावांना मी अमुक भाव दिलाय, तुमची पपई त्यांच्यापेक्षा अधिक चांगली आहे, तुम्हाला त्यांच्यापेक्षा वाढवून दर देतो. मात्र, आम्ही सगळे शेतकरी एकमेकांच्या संपर्कात असल्याने व्यापारी आपल्याला कसे फसवतात हे लक्षात येत होते. आम्ही ठरवलं, की ग्रुप स्थापन केला तर व्यापाऱ्यांचा भूलथापा मारायचा आणि मधले पैसे खायचा व्यवसाय बंद होईल. दोन पैसे आपल्याला जास्त मिळतील. व्यापाऱ्यांच्या या चलाखीमधूनच संघ स्थापन झाला. याचा व्यापाऱ्यांनाही झालेला फायदा म्हणजे प्रत्येकाच्या बागेत त्यांना स्वतंत्र जाण्याची गरज राहिली नाही. एकाच ठिकाणी त्यांना गटाद्वारे भरपूर माल मिळू लागला. जे लोक आमच्या गटात आले नाहीत, त्यांना ज्या वेळी किलोला सहा रुपये भाव सुरू होता, त्या वेळी गटातील शेतकऱ्यांना 18 रुपये भाव मिळत होता. पुढे व्यापारी जेव्हा त्यांच्याकडे माल मागायचे, त्या वेळी गटात नसलेले शेतकरी आम्हाला फोनवरून भाव काय निघाला असे विचारायचे व त्यानंतर ते त्या भावाने विकायचे नियोजन करू लागले. त्यांनाही त्याचा फायदा मिळाला. 

गटातील विजय नरवाडे (गाव - बागल पारडी) म्हणाले, की संघ स्थापन केल्यानंतर आम्ही आमचा भाव ठरवायला सुरवात केली. इथल्या व्यापाऱ्यांना ही गोष्ट पटली नाही. त्यांनी आमचा माल घ्यायचा नाही असे ठरवले. माल खराब तर नाही होऊ द्यायचा, मग द्यायचा कुणाला? यावर संघाचे अध्यक्ष म्हणाले, की मी मुंबईला जाऊन बसतो. तुम्ही इथून पाठवा. एक पट्ट्याचा माल गेला; पण मुंबईला चार पट्ट्याचा माल लागतो असे कळले. बैठकीद्वारे तसा माल पाठवायचे ठरवले. पूर्वी 98 मध्ये हा एक पट्टीचा साठलेला माल व्यापारी पॅकिंग करून निर्यात करायचे. आमचा मालही दर्जेदार असल्याने एक्‍स्पोर्ट (दुबईला, रमझानसाठी) झाला आहे. गावंडे म्हणाले, की मार्केटिंगला व्यापाऱ्यांची कमी नाही. परिसरातील मालेगावला व्यापारी येतात, भाव विचारतात, माल चांगला असल्याने भावासाठी आडून बसतो. साडेतीन रुपये प्रति किलोने व्यापाऱ्याने मागितले, तर सात रुपयांच्या खाली भाव घेत नाही. किमान तीन रुपये, तर कमाल 18 रुपयांपर्यंत दर मिळतो. संघात 17 शेतकरी असून, सुमारे 2000 ते 5000 पर्यंत झाडे प्रत्येकाकडे आहेत. संघात कळमनुरी, हिंगोली, हतगाव, मुदखेड, नांदेड अशा पाच तालुक्‍यांतील शेतकरी आहेत. 

...अन्य सदस्यांचे नियोजन- 
1) भिकाजी गावंडे यांचे आठ एकर पपई क्षेत्र आहे. सन 1997-98 पासून ते पपई घेतात. आता सुधारित पद्धतीने बेडवर पपई घेतात, त्यामुळे अतिवृष्टी वा पावसात पिकाचे नुकसान होत नाही. (काळ्या जमिनीत निचऱ्याअभावी पिकाचे नुकसान होते.) फवारण्या 15 ते 20 दिवसांनी घेतल्या जातात. उत्पादन सरासरी एकरी 35 ते 40 टन आहे. प्रति झाड 150 ते 200 फळे मिळतात. सरासरी एक किलोचे ऍव्हरेज म्हटले तरी दोन क्विंटल उत्पादन प्रति झाड मिळू शकते. तैवान 786 जात आहे. किमान पाच ते कमाल 18 रुपये प्रति किलो दर मिळतो. ते म्हणाले, की आमच्या भागात हे पीक पूर्वीपासून होते. या पिकात जुनेजाणते शेतकरीही आहेत; मात्र गट स्थापन झाल्याने सर्वजण जोमाने कामाला लागले. क्षेत्र वाढू लागले. संघात युवा शेतकरी जास्त आहेत. 
2) बागल पारडीचे (ता. वसमत) विजय नरवाडे म्हणाले, की चार वर्षांपूर्वी लागवड केली. नंतर दोन वर्षे दुष्काळात गेली; मात्र पुढील वर्षी सहा बाय आठ फूट अंतराने झिगझॅग पद्धत वापरली. जुनी भीती होती की पपईवर व्हायरस येतो, झाडे शिल्लक राहत नाहीत. संघाच्या अध्यक्षांशी बोललो. त्यांनी सांगितले, की झाडांचे पोषण चांगले केले तर व्हायरस येणार नाही. पपईचे पोषण चांगले व्हावे लागते. केळीचा घड कापल्यावर काही येत नाही; मात्र पपईला सतत फळे लागत राहतात. लागवडीच्या पहिल्या वर्षी एकरी 25 टन उत्पादन मिळाले. नोव्हेंबर 2010 च्या लागवडीपासून एकरी 35 टनांपर्यंत गेलो. हे अडीच एकर क्षेत्र आहे. रमझानमध्ये प्रति किलो 14 रुपये दर माझ्या पपईला मिळाला. सध्या तो दीड ते दोन रुपयांवर आला आहे. सरासरी एकरी 50 हजार रुपये खर्च, दोन लाख रुपये उत्पन्न, तर दीड लाख रुपयांपर्यंत निव्वळ उत्पन्न या पिकातून मिळते. झाड जोपर्यंत सुरू आहे तोपर्यंत उत्पादन सुरू राहते. प्लॉट पूर्ण संपेल तेव्हा किती पैसे झाले ते लक्षात येते. 
3) बागल पारडीचेच विवेक बागल म्हणाले, की मिरची किंवा नेहमीची पिके घेत होतोच. विचार केला, की पपई घेऊन बघायला काय हरकत आहे? व्हायरसची भीती होती; पण मागील वर्षी हिमतीने दोन ते पावणेदोन एकर क्षेत्रात 1700 झाडांची लागवड केली, त्यातून 90 टनांपर्यंत माल निघाला. रमझानमध्ये सुमारे 27 टन माल गेला. किलोला आठ ते 17 रुपयांपर्यंत दर मिळाला, त्यातून चार लाख रुपये मिळाले. काढणीच्या अंतिम टप्प्यात डिसेंबरपासून किलोला तीन ते दोन रुपये दर मिळाला. एकूण मिळून सात लाखांचे उत्पन्न मिळाले. खर्च एक लाखापर्यंत आला. 2200 झाडांची नवी लागवड आहे. झाड टिकून राहिले, व्हायरस आला नाही. सर्व स्प्रे व्यवस्थित केले, बेड व ठिबकवर लागवड केली. जमीन निचऱ्याची नसेल तर व्हायरस येतो. आता आम्ही 100 टक्के ठिबकवर पोचलो आहोत. झाड टिकवून ठेवणे गरजेचे असते. प्रति झाड एक क्विंटल माल मिळाला तरी दोन रुपये प्रति किलोचा भाव नुकसान करीत नाही. 

...असे असते संघातील सदस्यांचे नियोजन - 
1) फर्टिगेशनद्वारे विद्राव्य खतांचे डोस दिले जातात. 
2) अनुभवी शेतकरी, कृषी विभाग, "ऍग्रोवन'मधील लेख, तसेच खासगी कंपनी आदींचे मार्गदर्शन घेतात. बैठकीद्वारे पिकाचे नियोजन ठरवतात. तापमान नियंत्रण, हवा खेळती राहण्यासाठी दिशांचे नियोजन करून लागवड केली, त्यामुळे तापमान नियंत्रित होऊन फूल वा फळगळ कमी झाली. 
3) गट करण्याचे अनेक फायदे झाले. उदा. व्हायरस, किडी आदी समस्यांसाठी कृषी विभाग, मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र यांच्याशी संपर्क केला तर ते फिल्डवर पोचतात. बैठकीद्वारेही त्यांचे मार्गदर्शन या पिकासाठी होते. व्यवस्थापनात कोठे चुकते ते कळते. 
4) व्हायरस रोगावर प्रत्येकाचे अनुभव, त्यांचे फवारणी नियोजन यांची देवाणघेवाण होते. 

दराची भीती नाही 
संघाचे सदस्य म्हणाले, की केळीचा घड कापला की पुन्हा येत नाही, तसे पपईचे नाही. फळे येत राहतात. आता चार रुपये भाव मिळाला तर पुढच्या कापणीला तो 12 रुपयांपर्यंतही जाऊ शकतो. प्रत्येक वर्षी रमझान कधी येतो ते पाहूनच लागवड करतो. मुख्य हंगाम या सणाचाच असतो. या कालावधीत प्रत्येक शेतकऱ्याला झालेला फायदा दहा हजार रुपयांपेक्षा कमी नाही. सरासरी एकरी 20 ते 25 हजार रुपये खर्च स्प्रेइंग व खतांवर होतो. 
रमझानच्या वेळी झालेल्या एक दोन कटिंग वेळी झालेला काही खर्च निघून जातो. झाड टिकले तर पुढे चांगला फायदा होतो. एका झाडाचे योग्य नियोजन केले तर एक ते दीड क्विंटलपर्यंत माल निघतो. पाच रुपये एका झाडाचे पकडले तरी साडेसातशे रुपये एका झाडाचे मिळू शकतात. खर्च एका झाडाचा 200 ते 250 रुपये होऊ शकतो. पाचशे रुपये एक झाड उत्पन्न देऊन जाते. झाडाची क्वालिटी ठेवली पाहिजे. आंतरपीक घेतले तर किफायतशीर होत नाही. प्लॉट टिकत नाही. केळीला कमिशन व्यापारी 13 ते 14 टक्के खातात. पपईला कमिशन घेऊ देत नाही. 

कृषी विभागाची नेहमीच मदत 
तालुका कृषी अधिकारी डी. एम. काळे म्हणाले, की शेतकऱ्यांना उत्पादन तंत्र चांगले मिळावे, त्यांनी जो माल उत्पादित केला आहे, त्याचा मोबदला त्यांना मिळावा या दृष्टीने संघ स्थापन झाला. आम्ही पूर्वी बैठक घेतली तेव्हा 15 वर्षांपूर्वी पपई घेतलेले शेतकरी मिळाले. जुन्याजाणत्यांचा फायदा नव्यांना मिळू लागला. त्यांच्या चुकांतून नवे शेतकरी काही शिकले, स्वावलंबी झाले. विद्यापीठाचे तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोचले. पपईचे योग्य व्यवस्थापन, माती परीक्षणाआधारे मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर, ठिबक यासाठी कृषी विभागाने सहकार्य केले. राष्ट्रीय फलोत्पादन अभियानातून नवा बगीचा स्थापन करण्यासाठी, तसेच ठिबकला अनुदान उपलब्ध केले. यांत्रिकीकरणात एचटीपी फवारणी यंत्र घेतले, त्यालाही अनुदान दिले. शासनाच्या योजना गटाच्या माध्यमातून प्रभावीपणे राबवता आल्या. शेतकऱ्याने नवे पीक केले तर तंत्रज्ञानाअभावी तो मागे राहू नये यादृष्टीने गटशेतीतून त्यांचा फायदा व्हावा असा आमचा प्रयत्न राहिला आहे. 

टिश्‍यू कल्चर केळीची गटशेतीही विस्तारतेय 

हिंगोली, वसमत भागात आता पपईबरोबर केळीची गटशेतीही विस्तारू लागली आहे. पूर्वी या भागातील शेतकरी पारंपरिक कंद पद्धतीने लागवड करायचे. कृषी विभागाने काही शेतकऱ्यांना तमिळनाडूला राष्ट्रीय केळी परिषदेला पाठवले. त्यात लक्षात आले, की भारतातले चांगले शेतकरी उतिसंवर्धित रोपांची (टिश्‍यू कल्चर) लागवड करतात. "क्वालिटी' व "क्वांटिटी' पाळायची तर या तंत्रज्ञानाला पर्याय नाही. तालुका कृषी अधिकारी श्री. काळे म्हणाले, की यंदा आम्हाला तालुक्‍यात टिश्‍यू कल्चरची कोणत्याच कंपनीची रोपे मिळेनात. जिथून ज्या कंपनीची मिळतील ती आणली. आम्ही टिश्‍यू कल्चर केळीचे तालुक्‍यात क्‍लस्टर केले आहे. या वर्षी 100 हेक्‍टरचे लक्ष्यांक पूर्ण केले आहे. तालुक्‍यात या वर्षी पाच हजार हेक्‍टरवर केळीची लागवड आहे. अर्थात, सर्व उतिसंवर्धित नाही. मात्र, गटशेतीमुळे त्याला चालना मिळतेय. शंकरराव चव्हाण शेतकरी प्रतिष्ठान गटशेतीचे अशोक देवराव कराळे म्हणाले, की रोपांचा तुटवडा जाणवला तेव्हा गटामार्फत जळगावच्या संबंधित प्रसिद्ध कंपनीच्या मालकांना जाऊन भेटलो व रोपांची उपलब्धता केली. एका गटामार्फत दीड लाख टिश्‍यू कल्चर रोपांची लागवड गिरगावमध्ये केली. हिंगोली जिल्ह्यातील हे पहिले गाव असेल, जिथे सर्वांत जास्त केळीची लागवड आहे. आमच्या गटातील अरुण पाटील यांचा 34 टन माल ऑफ सिझनमध्ये निघतो ही छोटी गोष्ट नाही. आमचे शेतकरी परिस्थितीनुसार बदलत आहेत. केळीतील तंत्रज्ञान व विक्री समजावून घेण्यासाठी करमाळा (जि. सोलापूर) परिसरात गेलो. तिथली केळी एक्‍स्पोर्ट होतात. तिथले काही व्यापारी आमच्याकडे आणू शकतो का ते पाहिले. 

बाजारपेठ - 
आम्हाला केळीला लोकल व्यापारी आहेत. टिश्‍यू कल्चरचा माल उत्तर भारतात (यूपी) जातो. कंदाचा माल आंध्र प्रदेशात जातो. आंध्र व चंदीगडध्ये दोनशे-अडीचशे रुपयांचा फरक आहे. यूपीकडे सहाशे रुपये मिळत असतील तर साऊथमध्ये चारशे रुपये भाव असतो. यूपीसाठी क्वालिटी मेंन्टेंट करावी लागते. 
आमचा 12 जणांचा गट स्थापन केला; पण केळी उत्पादक 100 च्या वर आहेत, सर्वांना मार्गदर्शनाची देवाण-घेवाण होते. केळीचे पीक असे आहे, की बाराही महिने माल विकला जातो. आपण जुलैमध्ये काही, सप्टेंबरमध्ये काही, नोव्हेंबर व जानेवारीत काही असा लागवड कार्यक्रम ठेवला, तर पपईसारखे कुठेना कोठे मार्केट मिळत राहते.

No comments:

Post a Comment