Wednesday, April 17, 2013

ऊस पाचटापासून गांडूळ खत कसे तयार करावे?

गांडूळ खताच्या निर्मितीसाठी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. जवळपास मोठी झाडे नसावीत, कारण या झाडांची मुळे गांडूळ खतातील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळ खत निर्मितीसाठी खड्ड्यावर दिवसभर सावली राहण्यासाठी छप्पर करावे. त्याकरिता बांबू, लाकडे, उसाच्या पाचटाचा वापर करावा. छपराची मधील उंची 6.5 फूट, बाजूची उंची पाच फूट व रुंदी दहा फूट असावी; परंतु छपराचे वरील आवरण दोन्ही बाजूस एक - एक फूट बाहेर असावे म्हणजे छपराची बाहेरील रुंदी 12 फूट असावी. छपराची लांबी आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या उसाच्या पाचटानुसार कमी - जास्त होईल. अशा छपरामध्ये मध्यापासून एक - एक फूट दोन्ही बाजूस जागा सोडून साडेतीन फूट रुंदीचे व एक फूट उंचीचे दोन समांतर वाफे वीट बांधकाम करून तयार करावेत. आतील बाजूने प्लास्टर करावे, तसेच तळाच्या बाजूस कोबा करून घ्यावा. जादा झालेले पाणी जाण्यासाठी तळाशी पाइप टाकावा. वाफे करण्यासाठी दुसरी पद्धत म्हणजे वाफे जमिनीच्या वर बांधण्याऐवजी आठ - नऊ इंच खोलीचे दोन समांतर चर काढावेत, खड्ड्यातील माती चांगली चोपून चोपून टणक करावी. 

पाचट कुजविणे 
छपरामध्ये खोदलेल्या चरामध्ये अथवा वीट बांधकाम केलेल्या टाकीमध्ये उसाचे पाचट भरावे, त्याची उंची जमिनीपासून किंवा वीट बांधकामापासून 20 ते 30 सें.मी. ठेवावी. पाचट भरताना एक टन पाचटासाठी युरिया आठ किलो, सिंगल सुपर फॉस्फेट दहा किलो, पाचट कुजविणारे जिवाणू एक किलो आणि ताजे शेणखत 100 किलो वापरावे. या सर्वांचे पाण्यात मिश्रण करावे. पाचटाचा पाच ते दहा सें.मी. थर दिल्यानंतर त्यावर शेणखत, युरिया व सुपर फॉस्फेटच्या द्रावणाचा पातळ थर द्यावा. याचबरोबर पाचट कुजविण्याची क्रिया लवकर होण्यासाठी पाचट कुजविणारे संवर्धन एक टनास एक किलो या प्रमाणात समप्रमाणात प्रत्येक थरावर वापरावे. अशा पद्धतीने खड्डा वाफा भरल्यानंतर त्यावर पुरेसे पाणी मारावे. पाण्याने भिजवून घेतलेल्या पोत्याने एक झाकून टाकावे, दररोज त्यावर पाणी मारण्याची दक्षता घ्यावी. असे एक महिना पाणी मारल्यानंतर पाचट अर्धवट कुजलेले दिसेल, शिवाय उष्णता कमी झाल्याचे आढळून येईल. असे अर्धवट कुजलेल्या एक टन पाचटासाठी 20,000 आयसेनिया फोटेडा या जातीची गांडुळे सोडावीत. गांडूळ सोडल्यानंतर सर्वसाधारणपणे अडीच ते तीन महिन्यांनी पाचटापासून उत्तम प्रतीचे गांडूळ खत तयार झालेले दिसेल.

गांडूळ खत तयार झाल्याची चाचणी
 
पसर्व पाचटापासून अंडाकृती लहान विष्टेच्या गोळ्या झाल्याचे दिसून येते. पगांडूळ खताचा सामू सातच्या दरम्यान असतो. गांडूळ खताचा वास हा पाणी दिल्यानंतर मातीचा वास येतो तसा येतो. प खताचा रंग गर्द काळा असतो. पकार्बन ः नायट्रोजन गुणोत्तर 15 ः 20.1 असे असते. 
गांडूळ खतामधील अन्नद्रव्यांचे प्रमाण हे गांडुळांच्या खाद्यासाठी वापरलेल्या सेंद्रिय पदार्थांनुसार बदलते. गांडूळ खतामध्ये नत्र, स्फुरद व पालाश या अन्नघटकांचे प्रमाण हे शेणखतामधील अन्नद्रव्यांपेक्षा जवळपास दुप्पट असते. सर्वसाधारणपणे पाचटापासून तयार केलेल्या गांडूळ खतामध्ये नत्र 1.85 टक्के, स्फुरद, 0.65 टक्के, पालाश 1.30 टक्के, सेंद्रिय कर्ब 35 ते 42 टक्के असते. एक हेक्‍टर क्षेत्रासाठी पाच टन गांडूळ खत लागणीच्या वेळी सरीमध्ये चळी घेऊन मातीमध्ये झाकून द्यावे. 

- 02169 - 265313 
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव, ता. फलटण, जि. सातारा

No comments:

Post a Comment