Sunday, January 13, 2013

जनावरांकडेही देतोय लक्ष पर्यायी चारा, जपतोय आरोग्य

पावसाच्या ताणाचा परिणाम पिकांच्या बरोबरीने जनावरांच्या आरोग्यावरही दिसू लागला आहे. चाराटंचाईवर मात करण्यासाठी पशुपालक चाराकुट्टी आणि गहू भुसा, झाडपाला यासारख्या पर्यायी खाद्यांचा वापर करत आहेत. आरोग्य व्यवस्थापनाच्यादृष्टीने शिफारशीनुसार लसीकरण आणि जंतनिर्मूलनावर पशुपालकांनी लक्ष केंद्रित केले आहे. 
चारा वाया जाणार नाही यासाठी काटेकोर 
पहिल्यापासूनच जनावरांच्या संख्येनुसार चाऱ्याच्या उपलब्धतेचे नियोजन केले असेल, तर वर्षभर हिरव्या चाऱ्याच्या उपलब्धतेच्या प्रश्‍नावर मात करता येते, हा माझा अनुभव आहे. माझ्याकडे दहा होल्स्टिन फ्रिजियन गाई, दहा कालवडी, तीन जाफराबादी म्हशी आणि 15 उस्मानाबादी शेळ्या आहेत. त्यांच्यासाठी वर्षभर हिरवा चारा मिळावा म्हणून दोन वर्षांपासून 60 गुंठे क्षेत्रावर डी.एस.एन.- 6 जातीचे नेपिअर गवत आणि लसूणघासाची लागवड करीत आहे. नेपिअरची एकदा लागवड केली की चार वर्षे उत्पादन मिळते. या चारा पिकाची उंची अन्य चारा पिकांपेक्षा चांगली आहे. त्यामुळे कमी क्षेत्रातही चाऱ्याचे चांगले उत्पादन मिळते. हा चारा पालेदार आणि रुचकर असल्याने जनावरे आवडीने खातात. दररोज 20 लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाईला 25 किलो हिरवा चारा आणि पाच किलो कोरडा चारा कुट्टी करून देतो. जनावरे संपूर्ण चारा खातात. चारा वाया जात नाही. याचबरोबरीने घरच्याघरी मका भरडा, सरकी पेंड, 150 ग्रॅम मोड आलेले सोयाबीन असे मिश्रण करून प्रत्येक जनावराला चार किलो खाद्य देतो. दुधाळ जनावरांची संख्या लक्षात घेऊन चारा लागवडीचे नियोजन ठेवले आहे. सध्याच्या परिस्थितीत गरजेइतकाच चारा कुट्टी करून देतो. चारा वाया जाणार नाही आणि जनावरांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल याकडे कायम लक्ष ठेवले आहे. महत्त्वाचे म्हणजे चार वर्षांपासून मुक्त संचार पद्धतीने गोठा नियोजन ठेवले आहे. यामुळे जनावरे गरजेनुसार चारा, पाणी घेतात. त्यांना चांगला व्यायाम होतो. त्यांचे आरोग्य चांगले राहून दूध उत्पादनातही वाढ मिळाली आहे. वेळोवेळी पशुवैद्यकांकडून जनावरांची तपासणी केली जाते. 
उस्मानाबादी शेळीपालनही मुक्त संचार पद्धतीने केले आहे. या शेळ्यांना सध्या कुट्टी केलेला चारा आणि शेवरीचा पाला देतो. माझ्याकडे सुधारित देशी जातीच्या 200 कोंबड्या आहेत, त्याही मुक्त गोठ्यात आहेत. या कोंबड्या जनावरांच्या अंगावरील कीटक व सांडलेले धान्य, भरडा खातात. त्यांच्यासाठी स्वतंत्र खाद्य व्यवस्थापन नाही. या कोंबड्यांपासून अतिरिक्त नफा मिळतो आहे. 

- बाळासाहेब शेंडगे 
सरडे, ता. फलटण, जि. सातारा 
9767457948 

शेळ्या - मेंढ्यांसाठी कुट्टी, गव्हाचे भूस 
माझ्याकडे 37 उस्मानाबादी शेळ्या, 83 दख्खनी मेंढ्या आहेत. यंदा पावसाच्या ताणाने चाऱ्याचा प्रश्‍न गंभीर झाला. पाण्याचीही टंचाई आहे. अशा काळात शेळ्या - मेंढ्यांसाठी चारा नियोजन अवघड झाले. सध्या चाऱ्याची कुट्टी, गव्हाचा भुसा, कमी प्रतीच्या गव्हाचा भरडा असे मिश्रण करून त्यांना देत आहे. 25 एकर ---- खोडवा आहे. या शेतात शेळ्या - मेंढ्या चरायला सोडल्या जातात. शेतातील तण, पाला शेळ्या - मेंढ्या खातात. सध्या स्वच्छ पाण्याच्या उपलब्धतेचा प्रश्‍न आहे. मिळेल ते पाणी पिल्याने मेंढ्यांमध्ये जंताचा प्रादुर्भाव दिसून आला. तातडीने महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पशुवैद्यकांच्या सल्ल्याने उपचार सुरू केले आहेत. ज्याप्रमाणे जनावरांसाठी चारा डेपो शासनाने सुरू केला आहे, त्याप्रमाणेच शेळी - मेंढीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही चाऱ्याची उपलब्धता झाली पाहिजे. शेळ्या - मेंढ्या आजारी पडण्याचे प्रमाण पाहता पशुसंवर्धन विभागाने काही उपाययोजनांना सुरवात करावी. 

- सुरसिंग पवार, 
खडांबे (बु), ता. राहुरी, जि. नगर 
संपर्क - 9422224577 

खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापन महत्त्वाचे... पशुपालन हा माझा मुख्य व्यवसाय आहे, त्यामुळे वर्षभर हिरव्या चाऱ्याची उपलब्धता आणि आरोग्य व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित केले आहे. 15 होल्स्टिन फ्रिजियन गाईंसाठी मुक्त संचार पद्धतीने गोठा नियोजन आहे. तीन एकर क्षेत्रापैकी दोन एकरांवर नेपिअर गवत, लसूणघास, कडवळ अशा चारा पिकांची वर्षभर टप्प्याटप्प्याने लागवड केली आहे. सध्या कूपनलिकेच्या माध्यमातून चारा पिकांना पाणी नियोजन केले आहे. योग्य नियोजनामुळे वर्षभर चाऱ्याची उपलब्धता होते. वीस लिटरपेक्षा जास्त दूध देणाऱ्या गाईंना दररोज 35 किलो चारा कुट्टी आणि अडीच किलो खाद्य मिश्रण दिले जाते. दुधाळ जनावरांच्या आरोग्याच्यादृष्टीने पुरेशी खनिजमिश्रणे मिळणे आवश्‍यक आहे. सध्याच्या परिस्थितीत रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी पशुतज्ज्ञांच्या शिफारशीनुसार रोगांच्या नियंत्रणासाठी लसीकरण आणि जंतनिर्मूलन केले आहे. 
- संदीप पवार, 
राजाळे, ता. फलटण, जि. सातारा 
संपर्क - 9922818520 

अन्य शेतकऱ्यांना शेळ्या दिल्या संगोपनासाठी 
आदर्श बंदिस्त शेळीपालनासाठी प्रसिद्ध असलेले जालना जिल्ह्यातील हरतखेडा (ता. अंबड) येथील नानासाहेब रामदास शेरे म्हणाले, की सध्या आमच्या भागात पावसाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. जूनमध्ये दोन पाऊस झाले, त्यानंतर अलीकडे एकच पाऊस झाला. शेळीपालनासाठी चारा अजिबात शिल्लक नाही. पाणीही देणे मुश्‍कील झाले आहे. यातून उपाय शोधण्याचा प्रयत्न केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाऊस चांगला झाला. तेथील काही शेतकऱ्यांकडे शेळ्या संगोपनासाठी दिल्या आहेत. सुमारे शंभर शेळ्या प्रत्येकाला 10 ते 20 या प्रकारे पाच ते सात शेतकरी सांभाळत आहेत. त्यातून शेळ्यांना चारा उपलब्ध होईल. शेळ्यांना दोन पिल्ले झाली तर प्रत्येकी एक वाटून घ्यायचे असे ठरले आहे. सध्या मी 40 पर्यंत शेळ्यांचे संगोपन करतो आहे. काही शेळ्या नाइलाजाने विकाव्या लागल्या, काहींची मरतूकही झाली; पण धीर सोडलेला नाही. चारा महाग झाला आहे. मात्र, 20 ते 30 हजार रुपये देऊन देऊळगाव राजा येथून तो विकत आणला आहे. शेळ्यांसाठी पाणीही टॅंकरने घेतले, त्यासाठी 10 ते 15 हजार रुपये दिले. बोअरला थोडे पाणी आहे. शेळ्या जगवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक शेळीपालकाकडील शेळ्यांची संख्या मोजून त्याप्रमाणे चारा पुरवण्याची व्यवस्था करण्यासाठी शासनाने काही योजना सुरू केल्या पाहिजेत. अशा परिस्थितीत शासनाची मदतच सर्वांत महत्त्वाची आहे. 

संपर्क - नानासाहेब शेरे - 9422992121

No comments:

Post a Comment