Friday, January 11, 2013

अधिक उत्पादनासाठी मका लागवडीची सूत्रे

व्यापारीदृष्ट्या मका पीक फायदेशीर करायचे असेल तर लागवड ही मध्यम ते भारी, काळ्या आणि पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीतच करावी, कारण हलक्‍या जमिनीत अपेक्षित उत्पादन मिळत नाही. आपली जमीन मका पिकासाठी योग्य वा अयोग्य, निचऱ्याची आहे किंवा नाही, जमिनीत अन्नद्रव्यांचे किती प्रमाण उपलब्ध आहे हे माती परीक्षणाद्वारे समजते. तेव्हा माती परीक्षणास प्राधान्य द्यावे. मका हे पीक पाण्याला अतिशय संवेदनशील आहे. पेरणीनंतर सुरवातीच्या 20 दिवसांपर्यंतच्या कालावधीत पिकात जास्त पाणी वा दलदलीची स्थिती असल्यास कोवळी रोपे पिवळी पडून त्यांची मर होते. निचरा न होणाऱ्या दलदलीच्या जमिनीत लागवड केली तर खोडकुजवा रोगाचा प्रादुर्भाव होतो. या गोष्टी लक्षात घेता जमिनीची निवड काळजीपूर्वक करावी. मका लागवडीपूर्वी सर्वच शेतकरी शेतात शेणखत टाकतात. शेणखतामध्ये हुमणीच्या अळ्या असतात. शेतकरी 15 मेनंतर शेतात शेणखत टाकतात. या वेळी त्यातील हुमणीच्या अवस्था शेणखताबरोबर मातीत जाऊन पिकाचे नुकसान करतात. हुमणीमुळे मका पिकाचे 40 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होऊ शकते. तेव्हा असे न करता शेणखत हे मार्चअखेर किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच टाकायला हवे. असे केल्याने शेणखतातील हुमणीच्या अळ्या एप्रिल आणि मे महिन्याच्या 40 अंश से. पुढील तापमानात तग धरू शकत नाही. पर्यायाने त्या मरतात. हुमणीच्या प्रतिबंधासाठी शेणखत टाकण्यापूर्वी शेणखतावर क्‍लोरपायरिफॉसची फवारणी करावी. असे केल्याने हुमणीचा नायनाट होईल व हुमणी शेणखताद्वारे जमिनीत जाणार नाही. (नवी दिल्ली येथील मका संशोधन संचालनालयाच्या शिफारशीनुसार) बियाण्याचे प्रमाण ः मक्‍यासाठी हेक्‍टरी 15-20 किलो बियाणे पेरणीची शिफारस आहे. परंतु शेतकरी 18 ते 20 किलो प्रति हेक्‍टरी बियाणे वापरतात. जास्तीचे बियाणे वापरल्यामुळे भांडवली खर्च वाढतो. असे न करता बियाण्याचे प्रमाण शिफारशीप्रमाणेच वापरावे. मक्‍याच्या एकेरी संकरित वाणाची लागवड केली तर उत्पादनात दीड ते दोन पटीने वाढ होऊ शकते. वेळेतच पेरणीचे महत्त्व ः शिफारस केल्याप्रमाणे मक्‍याची पेरणी ही वेळेतच व्हायला हवी. कारण पेरणीची वेळ टळून गेल्यानंतर दिवसाला एक क्विंटल प्रति हेक्‍टरी उत्पादनात घट येते असे संशोधनात आढळले आहे. खरिपात जून ते जुलैचा दुसरा आठवडा यादरम्यान पेरणी उरकावी. पुढील बाब लक्षात घेतली तर हे गणित समजेल. मका पिकास पुंकेसर व स्त्रीकेसर ही दोन्ही फुले एकाच झाडावर येतात. पुंकेसर साधारणपणे 50 दिवसांनी येते त्याच वेळी 52 व्या दिवशी स्त्रीकेसर येण्यास सुरवात होते. पुंकेसरमधील परागकण चार ते पाच दिवस फलधारणेसाठी क्रियाशील असतात. परागकण स्त्रीकेसरावर पडल्यानंतर कणसात फलधारणा होते. पीक 60 दिवसांचे झाल्यानंतर मक्‍याच्या तुऱ्यामधील परागकण संपुष्टात येतात. म्हणजेच शिफारशीनंतर पेरणीस एक दिवस जरी उशीर केला तरी उत्पादनात हमखास घट येते. तेव्हा पेरणीच्या वेळेकडे लक्ष द्यावे. शिफारशीनुसार करावी लागवड ः खरीप हंगामात उशिरा आणि मध्यम पक्व होणाऱ्या होणाऱ्या जातींसाठी 75 सें.मी. अंतराच्या मार्करच्या साह्याने ओळी आखून 20 ते 25 सें.मी. अंतरावर दोन बिया चार ते पाच सें.मी. खोल टोकण करून बियाणे झाकून घ्यावे. तसेच लवकर तयार होणाऱ्या वाणासाठी दोन ओळींत 60 सें.मी. व दोन रोपांत 20 सें.मी. अंतर ठेवून वरील प्रमाणे टोकण करावी. सरी वरंब्यावर पेरणी करावयाची असल्यास 75 सें.मी. सरीच्या बगलेत मध्यावर एका बाजूलाच (दोन्ही बाजूला पेरणी करू नये) वाणपरत्वे अंतर ठेवून करावी. याप्रमाणे लागवड करण्याची शिफारस असताना शेतकरी अतिशय कमी अंतरावर (45 x 10 सें.मी.) लागवड करतात. त्याचा परिणाम पिकाची शाकीय वाढ खुंटते. तसेच त्याचा फुलोऱ्यावर देखील विपरीत परिणाम होतो. कणसांचा आकार आखूड होतो. त्यामुळे दाण्यांची संख्या कमी होते आणि उत्पादन घटते. तेव्हा लागवड शिफारशीनुसारच करावी. मका पिकावर पुन्हा मका पीक घेऊ नये. त्यामुळे जमिनीची प्रत खराब होते. मका + भुईमूग, मका + तूर आणि मका + चवळी या आंतरपीक पद्धतीत 6ः3 या प्रमाणात मका पीक फायदेशीर आढळून आले आहे. छोट्या मात्र महत्त्वाच्या गोष्टी ः 1) एका कणसाचे दाणे काढल्यास त्यांचे वजन साधारण 150 ग्रॅम भरायला हवे. परंतु कणसे आखूड झाल्याने एका कणसातील दाण्यांचे वजन फक्त 70-75 ग्रॅम भरते. येथेच शेतकऱ्यांचे 50 टक्के उत्पादन घटते. 2) काही शेतकरी मक्‍याची सरी वरंब्यावर पेरणी करावयाची शिफारस असताना सपाट वाफ्यात लागवड करतात. त्याचा परिणाम ज्या वेळी पाण्याचा ताण पडतो त्या वेळी संरक्षित पाणी देण्यात अडचणी येतात. तसेच पावसाचे पाणी शेतात एकसारखे झिरपत नाही. सरी वरंबा पद्धतीत पावसाचे पाणी सरीत थांबून एकसारखे झिरपते. 3) शेतकरी बळिराम नांगराने सरी पाडतात. त्या नांगरटीच्या मागे स्त्री मजुराकरवी मक्‍याचे बी फेकून पेरणी केली जात असल्याचे चित्र पहावयास मिळते. परंतु या पद्धतीत बी शिफारशीत अंतरावर पेरले जात नाही, त्यामुळे दोन झाडांतील अंतर एकसारखे राहत नाही. परिणामी हेक्‍टरी रोपांची संख्या (जी 83 हजार हवी असते) जास्त होते. पेरणीनंतर घ्यावयाची काळजी ः मका उगवणीनंतर आठ-दहा दिवसांनी एका चौफुल्यावर जोमदार एकच रोप ठेवून रोपांची विरळणी करावी. पेरणीनंतर पिकात जास्त पाणी किंवा दलदलीची स्थिती राहू देऊ नये. मका पीक पाण्याला अतिशय संवेदनशील आहे. त्यास पाण्याचा ताण पडला तर तुरा (पुंकेसर) येतो, मात्र स्त्रीकेसर येत नाही. (कोल्हापूर खरीप 2009 मध्ये घेतलेल्या प्रयोगाचे निष्कर्ष). दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मक्‍याला ऊस पिकासारखे पाणी देऊ नये. काही शेतकरी सरी तुडुंब भरून पाणी देताना दिसतात. परंतु सरी तुडुंब भरून पाणी देऊ नये. सरीच्या निम्म्या उंचीपर्यंतच पाणी द्यायला हवे. कारण जास्त पाणी दिले तर मूळ कुजण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मक्‍याची शाकीय वाढ जास्त होते, मात्र हे फायद्याचे नाही. शास्त्रीय दृष्टिकोनातून पिकाची वाढ ही मध्यमच असावी. यावरून एकच निष्कर्ष निघतो, की मका पिकास जास्त तसेच कमी पाणी देऊ नये. मध्यम स्वरूपाचे पाणी द्यावे. पावसाळ्यात पाऊस जास्त पडला असेल तेव्हा पिकातील पाणी बांध फोडून, चर खोदून शेताबाहेर काढावे. शक्‍यतो शेताच्या खोल भागाकडे चर काढावा. मक्‍याचा तुरा काढणे फायदेशीर ः अनेक शेतकरी मक्‍याचा तुरा काढावा का, असे विचारतात. मक्‍याचा तुरा काढल्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोनातून मक्‍याच्या तुऱ्याचा ऍपिकल डॉमिनन्स संपुष्टात येतो. त्यामुळे उपलब्ध अन्नद्रव्ये कणसातील दाणे भरण्याच्या प्रक्रियेत उपयुक्त ठरतात. परिणामी कणसातील संपूर्ण दाणे भरले जातात. त्यामुळे उत्पादनवाढीमध्ये भर पडू शकते. खत व्यवस्थापन ः माती परीक्षणावरून विद्यापीठाने शिफारस केल्याप्रमाणे खतांचे नियोजन करणे सोपे होते. मका पिकासाठी शिफारस केलेली खताची मात्रा 120ः60ः40ः25 (नत्र ः स्फुरद ः पालाश ः झिंक सल्फेट) अशी आहे. ही मात्रा 180ः80ः80ः25 अशी वाढवत न्यावी. पेरणीच्या वेळी 40 किलो नत्र, 60 किलो स्फुरद, 40 किलो पालाश प्रति हेक्‍टरी मात्रा द्यावी. पेरणीवेळी रासायनिक खते पाच-सात सें.मी. खोलवर आणि जमिनीत चांगली मिसळून द्यावी. पेरणीनंतर 30 दिवसांनी 40 किलो नत्र, तसेच 40 ते 45 दिवसांनी 40 किलो नत्र प्रति हेक्‍टरी द्यावे. जमिनीत झिंकची कमतरता असल्यास हेक्‍टरी 20 ते 25 किलो झिंक सल्फेट द्यावे. उभ्या पिकात नत्र खतमात्रा (युरिया) मका ओळीपासून 10-12 सें.मी. दूर ओळीमधून द्यावी. खरिपात मका पिकाला पेरणीनंतर 30 दिवसांनी नत्र खताचा दुसरा हप्ता देताना, पाऊस असेल तेव्हा शेतात तुडुंब पाणी भरलेले असल्यास जमिनीतून खताची मात्रा देता येणे शक्‍य होत नाही. तेव्हा पिकावर दोन टक्के युरियाची फवारणी करावी. कोळपणी आवश्‍यकच ः मका पिकात एक महिन्यानंतर कोळपणी करणे आवश्‍यक असते. परंतु पाहणीत असे दिसून आले आहे, की अनेक शेतकरी मक्‍यात कोळपणी करतच नाहीत. बैल कोळप्याने कोळपणी केल्यास मका पिकातील तणांचा प्रादुर्भाव कमी होईलच, पण त्याबरोबर जमिनीतील ओलावा देखील टिकून राहण्यास मदत होईल. कोळपणीनंतर पाऊस पडला तर पावसाचे पाणी शेतात एकसारखे झिरपते.

No comments:

Post a Comment